मुंबई : राज्यात अनेक दिवसांनंतर कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मागील महिन्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. जुलै महिन्यात कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. या रुग्णाला ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटची लागण झाली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
तसेच मृत्यू झालेल्या संबंधित व्यक्तीला यकृताचा कर्करोग झाला होता. त्यात त्याला कोरोनाची लागणही झाली. मात्र, कोरोनाचा संसर्ग होणे हे त्याच्या मृत्यूचे कारण नसल्याचे डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या ही सध्या ११,६४,१०८ वर पोहोचली आहे. मात्र, रुग्ण बरे होण्याचा दर देखील वाढत असल्यामुळे सध्या मुंबईकरांसाठी चिंतेचे कारण नाही. सध्याच्या घडीला मुंबईत सुमारे ४७ सक्रिय रुग्ण असून मुंबईतील एकूण बरे झालेल्यांची संख्या ही आतापर्यंत ११,४४,२८५ वर पोहचली आहे.