सुप्रसिद्ध स्थापत्यशास्त्रतज्ज्ञ(R.C.C. Consultant,Structural Engineer) महादेव रामनगौडा पाटील आज शनिवार, दि. १२ ऑगस्ट रोजी वयाच्या ८१व्या वर्षात पदार्पण करित आहेत. त्यानिमित्ताने त्यांचे बंधू आर. आर. पाटील यांनी त्यांच्या भावाला दिलेल्या शुभेच्छा...
माझा मोठा भाऊ महादेव रामनगौडा पाटील म्हणजेच एम. आर. पाटील याचा जन्म दि. १२ ऑगस्ट, १९४३ या दिवशी झाला. त्याचे शालेय शिक्षण पार्ले टिळक विद्यालय येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण पार्ले कॉलेज (साठ्ये महाविद्यालय) येथे तर अभियांत्रिकी स्थापत्य (Civil Engineering) पदवी शिक्षण सरदार पटेल इंजिनिअरिंग कॉलेज येथे झाले. तो शालेय, महाविद्यालय तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयातही प्रत्येक वर्षी प्रथम वर्गात उत्तीर्ण होत आला. भावाला केंद्र सरकार, राज्य सरकार, बृहन्मुंबई महानगरपालिका इत्यादी महत्त्वाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापनात अभियंता म्हणून नोकरी मिळत होती. मात्र, त्या नोकर्या त्याने नाकारल्या. मात्र, ‘ड्युबॉन इंजिनिअरिंग’ या खासगी कंपनीत अभियंता या नात्याने नोकरी स्वीकारली. या कंपनीचे एक प्रमुख भागीदार रतन दुभाष यांच्या अधिपत्याखाली प्रशिक्षण घेत अनुभव घेत सेवा प्रदान करीत राहिला. तेही जवळ जवळ दहा वर्षे. या काळात भावाने लहान-मोठ्या विविध पद्धतीच्या विविध क्षेत्रातील इमारतींचे आराखडे (Designs)तयार केले. माझा भाऊ ‘ड्युबॉन इंजिनिअरिंग’ कंपनीत कार्यरत असतानाच ‘आरसीसी कन्सल्टंट’ या नात्याने फावल्या वेळेत स्वतंत्र व्यवसाय करू लागला. त्यास दुभाष यांची प्रेरणा होती, प्रोत्साहन होते. प्रथम काही वर्षे भावाने त्याच्या सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहाध्यायी सुरेश पडवळ यांच्यासोबत व्यवसाय केला. मात्र, काही वर्षांनंतर भावाने स्वतंत्रपणे व्यवसाय सुरू केला व आजही कार्यरत आहे.
भावाने ‘एम. आर. कन्सल्टिंग इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड’ ही स्वत:ची कंपनी स्थापन केली. त्या आधी त्याने ‘एम. आर. पाटील असोसिएशन’ या नावाने व्यवसाय केला. भाऊ ‘आरसीसी कन्सल्टंट’ या नात्याने गेली जवळ जवळ ६० वर्षे व्यवसाय करीत असून, तो हजारांहून अधिक विविध पद्धतीच्या विविध क्षेत्रांतील निवासी, व्यापारी, औद्योगिक, पंचतारांकित हॉटेल्स, देवालये, चर्चेस स्टेडियमस, शाळा, महाविद्यालये,कार्यालये, रुग्णालये, चित्रपटगृह, कारखाने, कोठारे इत्यादी विविध प्रकारच्या आस्थापनांच्या इमारतींचे अगदी गगनचुंबी आराखडे (Designs)करीत आला आहे. तो वेळोवेळी प्रत्यक्ष बांधकाम होत असताना स्वतः निरीक्षण करीत आला आहे. आजपर्यंत, भावाने रचना केलेल्या एकाही इमारतीला न कधी तडा गेला आहे. ना एकही इमारत पडली आहे, हे त्याच्या कामाचे कौशल्य तसेच वैशिष्ट्य. तो वै. एम. एस. बेळेकर, सुधीर रेडकर, जयंत वैद्य इत्यादी मान्यवर वास्तुविशारद (Architects)सोबत सातत्याने सेवा साहाय्य देत व घेत आला आहे.
भावाच्या व्यवसायात प्रशिक्षण होत राहते. तरुण अभियंते प्रशिक्षण घेऊन स्वतंत्रपणे व्यवसाय करू लागले आहेत. तसेच, तरुण ड्राफ्टसमन तर प्रशिक्षण घेऊन कामात तरबेज होतात. तद्वतच शिपाईदेखील प्रशिक्षण घेऊन ड्राफ्टसमन तयार झाले आहेत. नोकरी सोडून स्वतंत्र व्यवसाय करणारे अभियंते भावाच्या संपर्कात असतात, त्याचे मार्गदर्शन घेत असतात. भावाला केंद्र सरकार, राज्य सरकार, बृहन्मुंबई महानगरपालिका येथे अभियंता म्हणून सुरुवातीस दरमहा रुपये हजारावर पगार, भत्ते, सवलती, फायदे कायम नोकरी मिळू शकत होते, असे असले तरी त्यांनी ‘ड्युबॉन इंजिनिअरिंग’ कंपनीत २५० रुपये पगारावर सुरुवात केली ती १९६४ साली.
भावाने या खासगी नोकरी स्वीकारल्याबाबत काहींनी त्याची थट्टा केली. उपहास केला, आश्चर्य व्यक्त केले. मात्र, तो त्याच्या निर्णयावर खंबीर होता, किंबहुना त्या खासगी कंपनीची इंग्रजी दैनिकात छोटी बातमी आली होती. भावाने ही नोकरी स्वीकारावी, असे आमचे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांनी भावास स्वतः सांगितले होते. भावाचा श्री महाराजांवर अतूट विश्वास होता व आजही आहे. आजचे त्याचे अपूर्व यश पाहून त्याची थट्टा करणारे, उपहार करणारे गप्प बसले. खरे तर घरामध्ये, नातेवाईकांमध्ये कोणीही अभियंता नव्हते. परंतु, त्याची तशी इच्छा होती व केवळ इच्छा झाली नाही, तर तो यशदायी फलदायी ठरला आहे. त्याने हे अपूर्व यश शून्यातून निर्माण केले, स्वकष्टाने उभारले. अर्थात तो या अपूर्व यशाचे सर्व श्रेय श्री महाराजांना देत आला आहे.
वडील वै. रामन गौडा पाटील हे महाराष्ट्र राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था या विभागात व सेवेत असतानाच त्यांच्यावर त्यांच्याच कार्यालयातील एका माथेफिरुने अकारण हल्ला केल्याने नियोजित वयोमानापूर्वी यांना सेवानिवृत्त करण्यात आले होते. कारण, त्यांच्या श्रवणशक्तीवर गंभीर परिणाम झाला होता. आई, वै. लक्ष्मीबाई गृहिणी होत्या. आमच्या दोहोंमधला भाऊ रामचंद्र २३ वर्षांपूर्वी गावी शेती करीत असताना कर्करोगाने मृत्युमुखी पडला. वडिलांच्या तुटपुंज्या निवृत्तीवेतनावर घरचा संसार चालला होता. आम्हा तीनही भावंडाचे शिक्षण त्यावरच झाले. आमचे घरचे सर्व श्री महाराजांचे अनुग्रहित शिष्य. आई-वडील हयात असतानाच आम्हा, तिघा भावंडांची लग्ने झाली होती. भावाचे लग्न नलवडीच्या लक्ष्मण भद्रापूर यांच्या गीता या कन्येशी झाले होते.
वहिनी ४१ वर्षांच्या असताना दि. २९ जुलै, १९९६ या दिवशी घरी हृदयविकाराचा तीव्र झटक्याने इहलोक सोडून गेल्या. त्यावेळी त्यांची मोठी मुलगी सुनीता २३ वर्षांची होती, तर लहान मुलगी दिपाली १७ वर्षांची होती. वहिनींच्या आकस्मिक मृत्यूनंतर भावाच्या काही मित्रांनी त्यास दुसरे लग्न करण्यास सांगितले. त्यावेळी भावाचे वय ५३ वर्षे होते. मात्र, त्यास घरी विरोध होता. मुख्यत्वे त्यावेळी दिपाली अविवाहित होती व अध्ययन करीत होती. आमच्या पोद्दार इस्टेट येथील एका शेजार्याने पुनर्विवाह केल्यावर त्याच्या पहिल्या पत्नीकडून झालेल्या मुलांची दुर्धर परिस्थिती झालेली पाहिल्यावर आम्ही घरच्यांनी तसा निर्णय घेतला होता. भावाने पुन्हा लग्न न करण्याचे मानले, ते मुख्यत्वे आपल्या मुलींवर अन्याय होऊ नये म्हणूनच!
वहिनींच्या निधनानंतर सुनीता पती जगदीशसह भावाच्या घरी येऊन राहिली व आजतागायत आहे. जगदीश लग्न झाल्यापासून भावाच्या व्यवसायात सहभागी झाला आहे. सुनीता घर व भावाच्या कार्यालयाचे कामकाज हाताळत आली आहे. तिची मुलगी मृणाल स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यास करून गेली दोन वर्षे नेदरलॅण्ड येथे विशेष प्रशिक्षण घेत आहे. दिपाली पती हरीशसह बंगळुरु येथे वास्तव्य करून आहे, त्यांना श्रेयस नावाचा मुलगा आहे. भावाने केवळ मुंबई महानगर क्षेत्रातच नव्हे, तर अन्य राज्यांतील इमारतींचे आराखडे (Designs)केले आहेत. कच्छमध्ये भूकंप झाला, तेव्हा तेथील बर्याच इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या. त्यांच्या पुनर्बांधणीच्या इमारतीचे आराखडे भावाने तयार केले व त्या इमारती आजतागायत सुरक्षित आहेत. भाऊ ‘इंजिनिअरिंग ऑफ इन्स्टिट्यूट’ (India) या स्वायत्त संस्थेचा ‘फेलो’ असून, मुंबई महानगरपालिकेचे त्यास अधिकृत प्रमाणपत्रलाभलेले आहे. त्याने विविध परिषदेत स्थापत्यशास्त्राविषयी मार्गदर्शन करीत आला आहे.
आमचे वडील त्यांच्या वयाच्या ८१व्या वर्षी ३७ वर्षांपूर्वी गावी असताना देवाघरी गेले. आई तिच्या वयाच्या ९८व्या वर्षी तीन वर्षांपूर्वी ‘कोविड-१९’ काळात माझ्या घरी राहात असताना देवाघरी गेल्या. त्या अगोदर दोन वर्षांपूर्वी गावाहून माझ्याकडे आली होती. आई माझ्या घरी वास्तव्य करून होती. तेव्हा, भाऊ दर आठवड्यास आईला भेटावयास येत असे. भावाच्या अध्यात्म, व्यवसाय, कुटुंब, समाज या सर्वांवर आपला जम बसवला आहे. तद्वतच स्वत:च्या शरीर स्वास्थ्याकडे लक्ष देऊन असतो. वडिलांनी आम्हा तिघा भावंडांना अध्यात्म बरोबरच व्यायाम कष्ट करणे, स्वावलंबन करणे, काटकसर करणे यांची आवड लावली. वडिलांनी आम्हा तिघा भावंडाना सूर्यनमस्कार, योग शिकविले. कोल्हापूर येथील सिद्दगिरी मठात गेली काही वर्षे, भाऊ तेथील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये इत्यादी इमारतींचे आराखडे तयार करीत आला आहे. मठाधिपती काढसिद्देश्वर स्वामींचे भावाबरोबर भावनिक नाते आहे.
भावाला पर्यटनाची तसेच खेळाचीही आवड आहे. मालाड पूर्व पोद्दार इस्टेटमध्ये राहत असताना तो दर रविवारी तिथे क्रिकेट खेळत असे. भावाला चित्रपट, नाटके पाहण्याची, गाणी ऐकण्याचीही आवड आहे. मालाड पूर्वेला पोद्दार इस्टेटमध्ये आम्ही सर्व एकत्र राहत असताना, मालाड पश्चिम, स्टेशनलगत कृष्णबागमध्ये श्री महाराजांचे स्थान आहे. तेथे आमच्या सर्वांचे जाणे होत असे. श्री महाराजांनी स्वत:हून भावाला ’अण्णा’ असे संबोधन केल्यावर श्री महाराजांचे सर्व शिष्य, भक्त आमचे सर्व नातेवाईक, त्याचे काही मित्र भावाला ’अण्णा’ म्हणूनच हाक देऊ लागले, संबोधन करीत आले आहेत. श्री महाराजांचे भावावर अपार प्रेम, भाऊ अभ्यासातही हुशार तसेच वाक्चातुर्य यामुळे तो सर्वात लोकप्रिय झाला आहे. त्याची लोकप्रियता शेजारीपाजारी, नातेवाईक, कार्यस्थळी, समाजात वाढतच राहिली आहे. मात्र, त्याला ’ग’ ची बाधा कधी झाली नाही. तो नेहमी प्रसिद्धीपराड्मुख राहत आला आहे.
भाऊ अभियांत्रिकी शिक्षण घेताना व ‘बी. ई. सिव्हिल’ पदवी प्राप्त केल्यावर नोकरी करीत असताना संध्याकाळी घरी परतल्यावर रात्री-अपरात्री स्वत:च्या स्थापत्य शास्त्राचा अभ्यास तसेच व्यवसाय करीत असताना बर्याचदा त्याचा मित्र व व्यवसायी पडवळसोबत असे. त्या दोघांसाठी आई चहा करी, कांदेपोहे इत्यादी खाद्यपदार्थ करीत असे. भाऊ रात्री जागरण करुनही सकाळी वेळेनुसार महाविद्यालयात तसेच नोकरीसाठी कार्यालयात जात असे.भावाने ‘ड्युबॉन इंजिनिअरींग’ कंपनीत दहा वर्षे नोकरी केल्यावर जोडीने स्वतंत्र व्यवसाय करीत नोकरी सोडून प्रथमतः स्वतःचा स्थापत्य शास्त्राचा व्यवसाय सुरु केला तो फोर्ट येथील दलाल स्ट्रीटवरील एक्झामिनर प्रेस बिल्डिंगच्या तिसर्या आर्किटेक्ट एम. एच. बेलोगी यांच्या रिक्त कार्यालयात. काही वर्षांनी त्यांनी अंधेरी पूर्व येथील वर्टेक्स-विकास इमारतीत स्वतःच्या मालकीने जागा घेतली व तेथे आपले कार्यालय थाटले.
कालपरत्वे काम वाढल्यावर, सध्याच्या अंधेरी पूर्वेला नटराजच्या मागील मातृश्री इमारतीत स्वत:च्या मालकीची जागा घेऊन आपले प्रशस्त कार्यालय थाटले आहे. भावाने वेळोवेळी निवासस्थान बदलले. मालाड पूर्व पोद्दार इस्टेट, नंतर लग्न झाल्यावर काही वर्षांनी अंधेरी पूर्व येथे प्रथम गार्डन व्ह्युनंतर मरोळ येथे ‘मानवस्थळ’मध्ये व गेली दहा वर्षे मालाड पूर्व येथील रहेजा हाईट्सच्या ’डी’ इमारतीत. ‘कोविड-१९’च्या काळात भाऊ व त्याच्या कार्यालयातील अभियंते आपापल्या घरी बसून इमारतींचे आराखडे तयार करीत होते. ‘कोविड’मध्ये सूट मिळाल्यावर भाऊ न निवडक अभियंते कार्यालयात येऊन काम करीत होते व पूर्ण मोकळीक मिळाल्यावर कार्यालय पूर्ववत सुरू झाले. दरम्यानच्या काळात भावाने आपले अभियंते व अन्य कर्मचार्यांच्या आर्थिक गरजा भागविल्या. ‘कोविड’ काळात बांधकाम क्षेत्राला पर्यायाने त्यावर अवलंबून असणार्या सर्वांना त्याचा चांगलाच आर्थिक फटका पडला होता.
व्यवसायाच्या निमित्ताने त्याच्या राजकीय नेत्यांच्या भेटी होतात, अर्थात त्या कामापुरतेच महामहिम माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी भाऊ व त्याचा आर्किटेक्ट मित्र जयंत वैद्य यांना मुंबई येथील राजभवनात भेटीस बोलाविले होते. ते ही प्रतिभाताईंच्या बंगल्याच्या कामानिमित्ताने. भावाच्या लग्नाला तसेच व्यवसायाला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वर्षे १९९९ मध्ये जुहू, मुंबई येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एक हृदयपूर्वक सोहळा पार पडला होता. त्यावेळी नातेवाईक, शेजारी, व्यवसाय संबंधित मंडळी उपस्थित होते. भावाच्या वयाला ६० वर्षे पूर्ण झाली. तसेच, आईच्या वयाला ८० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने गावी एक हृदयपूर्वक सोहळा आयोजित केला गेला. त्यावेळी सर्व नातेवाईक उपस्थित होते. त्या दिवशी सकाळी, ब्राह्मणांकरवी वैदिक मंत्राने यज्ञयोग संपन्न झाला. सुग्रास जेवणाचा थाट होता, आईच्या हस्ते सर्व नातेवाईकांना चांदीची श्रीगणेशाची मूर्ती भेटीदाखल दिली गेली.
भावाला वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने सुनीताने खास कार्यक्रम अंधेरी येथील एका पंचतारांकित हॉटेलात आयोजित केला गेला. सुग्रास जेवणाचा बेतही तेथे आयोजित केला होता. भावाची धान्याने अमृततुला करून ते धान्य काही गरजू संस्थांना दान म्हणून दिले गेले. भावाला उदंड, उत्तम स्वास्थ्याचे आयुष्य लाभो ही सदिच्छा!
आर. आर. पाटील
९१६७०६४४५५
ramakrishna.patil@gmail.com