मालवणी मुलुखातील मुसाफिर...

    11-Aug-2023   
Total Views |
Article On Poet Dr. Mahesh Keluskar

कथा, कादंबरी, कविता, चित्रपट, आकाशवाणी यांसह पत्रकार म्हणून सजग तसेच संस्था, माणसं, पुस्तकं अशा विविध कलाकृतींच्या मागे पहाडासारखे उभे राहणारे मालवणी मुलुखातील मुसाफिर डॉ. महेश केळुसकर यांच्याविषयी...

डॉ. महेश केळुसकर यांचा जन्म दि. ११ जून १९५९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथे झाला. त्यांचे वडील व्यापार्‍यांचे दिवाणजी होते. मूळचे सिंधुदुर्गचे असणारे महेश केळुसकर यांचे कुटुंब शेतीत रमणारे. त्यांची आई शेती, भाजीपाला करण्यासह गाई, म्हशी पालन करून संसाराला हातभार लावत असे. महेश यांचे प्राथमिक शिक्षण फोंडाघाटच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यावेळचे सहदेव अनंत कातकर गुरुजी आणि मुख्याध्यापक अ. ला. सावंत यांसारख्या व्यक्तिमत्त्वामुळे ते कवितेच्या प्रेमात पडले. शालेय वयातच नकळत त्यांच्यावर कवीमनाचे संस्कार झाले. आठवीपर्यंत फोंडाघाट येथे शिक्षण घेतल्यानंतर पुढील माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी सावंतवाडीच्या आरपीडी हायस्कूल आणि एसपीके महाविद्यालयातून पूर्ण केले. महाविद्यालयामध्येही कवी वसंत सावंत यांची साथसोबत लाभली. त्यांच्या कार्यक्रमांना ते महेश केळुसकरांना घेऊन जात असत. तसेच, कार्यक्रमात एखादी कविता वाचायला लावत.इथेच त्यांच्या काव्यप्रतिभेला स्फुरण चढले.

‘एमए’, ‘पीएचडी’पर्यंतचे शिक्षण घेऊन साहित्य, संस्कृती व ग्रंथव्यवहारासाठी भरीव योगदान देणार्‍या केळुसकर यांनी आपल्या साहित्याने, लेखनाने वाचकांच्या मनात घर केले आहे. १९७६ साली सावंतवाडीच्या ‘कोजागिरी कविसंमेलना‘त कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या उपस्थितीत १५ वर्षांच्या महेश केळुसकर यांनी ‘बाळगो नि मालग्या’ ही मालवणी कविता पहिल्यांदा मंचावर वाचून साक्षात बा. भ. बोरकर यांच्याकडून पाठीवर कौतुकाची थाप मिळवली होती. मालवणी भाषेतल्या त्यांच्या अनेक कविता लोकप्रिय आहेत. केळव्याच्या ‘कोकण साहित्य संमेलना‘त, तर मंगेश पाडगावकरांनी त्यांना कडकडून मिठी मारून वर म्हटलं होतं की, “कविता प्रेझेंट करण्याच्या बाबतीत माजो हात धरणारो आजून कोण जन्माक येवक नाय; पण आज तुझी ‘झिनझिनाट’ आयकताना मी थरारून गेलंय....”
 
आकाशवाणीतील प्रदीर्घ सेवेनंतर डॉ. महेश केळुसकर २०१९ मध्ये सेवानिवृत्त झाले. १९८३ पासून ते आकाशवाणीत कार्यरत होते. रत्नागिरी, दमण, विविध भारती, सांगली, मुंबई या केंद्रांवर काम करताना त्यांनी २६ अभिवाचन मालिका केल्या. त्यातील ’महानायक’ ही अभिवाचन मालिका खूप गाजली. त्याचबरोबर त्यांनी ‘प्रभाते मनी’, ’ऐसी अक्षरे रसिके’, ’चिंतन हा चिंतामणी’ आदी लोकप्रिय कार्यक्रम दिले. त्यांची निर्मिती असलेल्या दोन आकाशवाणी कार्यक्रमांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. त्यांची आकाशवाणीमधील कारकिर्द असंख्य आठवणींची आहे. मराठी साहित्य विश्वाचा इतिहास, त्यांना मुखोद्गत असून, त्याबद्दल त्यांनी लेखनही केले आहे. स्वतः कविता लिहित लिहिता त्यांनी संपादन करून कवितेचा अमूल्य ठेवा जतन करण्यात दिलेले योगदान मोलाचे आहे.
आतापर्यंत त्यांचे बहुविध साहित्य प्रकारांतील लेखन प्रकाशित झाले आहे. ज्यात ‘मोर’ (१९८६), ’पहारा’ (१९९६), ’झिनझिनाट’ (१९९७) हे कवितासंग्रह, ’रोझ डे’ व ’मी’ (आणि) ’माझा बेंडबाजा’ हे युवा कविता संग्रह, ‘डोंगर चालू लागला’ हा बालकथासंग्रह, ’साष्- टांग नमस्कार’ (२०००) ही विनोदी गद्य पत्रे, ’कमलबंदी’ (२००२) हे आस्वाद समीक्षा लेखन तसेच ’यू कॅन अ‍ॅल्सो विन’ व ’क्रमशः’ या कादंबरीचा समावेश होतो. आतापर्यंत कविता, कथा, कादंबरी, संशोधन, संपादन, बालसाहित्य इ. त्यांची एकूण ३७ पुस्तके प्रसिद्ध झालीत. ’नागरिक’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचे कथा-पटकथा-संवाद लेखन त्यांनी केले असून, या चित्रपटाला १४ महत्त्वाचे पुरस्कार मिळाले होते.
 
फेब्रुवारी १९९१ मध्ये ‘गोमांतक मराठी अकादमी’ आयोजित केलेल्या पाचवे मराठी साहित्य संमेलनाचे ते पूर्वाध्यक्ष होते. ’मालवणी मुलुखातील प्रयोगात्म लोककला’ या त्यांच्या ‘पीएचडी’ संशोधनासाठी त्यांना मुंबई विद्यापीठाचा ‘अ. का. प्रियोळकर पुरस्कार’, ‘पद्मश्री भाऊसाहेब वर्तक पुरस्कार’ इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत. ’झिनझिनाट’ या त्यांच्या कविता संग्रहाला ’यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे पुरस्कार’ १९९८ प्राप्त झाला. ‘साष्टांग नमस्कार’ या विनोदी लेखनासाठी त्यांना ‘उत्कृष्ट वाङ्मय राज्य पुरस्कार’ तसेच ‘मसाप पुणे’चा ‘चिं. वि. जोशी पुरस्कार’ मिळाला आहे. समाजमाध्यमांवरील त्यांची रोजची टिप्पणीसुद्धा विलक्षण असते. कथा, कादंबरी, कविता, चित्रपट, आकाशवाणी यांसह पत्रकार म्हणून सजगतेने केलेले लेखन अशी त्यांची मोठी कारकिर्द.

त्यांना लाभलेला आवाज ही तर ईश्वरी देणगीच! लोककलेचा, बोलीभाषांचा अभ्यास यातून त्यांनी त्यांचा व्यासंग दाखवून दिला आहे. नवीन पिढीला संदेश देताना केळुसकर, वाचनासोबतच मराठी व्याकरणाचे ज्ञान आवश्यक असल्याचे सांगतात. तसेच, भाषा कुठलीही असो ‘त्या’ भाषेचा व साहित्याचा व्यासंग हवा, श्रवणभक्ती हवी, असे आवर्जून सांगतात. दि. ५ नोव्हेंबर रोजी त्यांची ’देवाक काळजी’ आणि ’बाळू कासारचा घोडा’ ही दोन नाटके’ ‘अनघा प्रकाशन’ तर्फे प्रकाशित होत आहेत. त्यांच्या या साहित्य घोडदौडीला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!

९३२००८९१००

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.