राहुल गांधींची 'मोहब्बत की दुकान' चालणार नाही - असदुद्दीन ओवेसी
10-Aug-2023
Total Views | 49
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपा सरकार विरोधात विरोधी पक्षांच्या आघाडीने अविश्वास ठराव आणला आहे. या ठरावावरील चर्चेत असदुद्दीन ओवेसी यांनी सुद्धा भाग घेतला. आपल्या भाषणात त्यांनी केंद्र सरकार मुस्लिमांसोबत भेदभाव करत असल्याचा आपला जुनाच आरोप केला.
त्यांनी हरियाणा हिंसाचारावर बोलतांना हिंसेला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. सोबतच राज्य सरकार मेवातमधील मुस्लिमांवर अत्याचार करत असल्याचा आरोप त्यांनी लावला. त्यांनी महिलांवर लादल्या जाणाऱ्या हिजाब प्रथेचे ही समर्थन आपल्या भाषणात केले. हिजाब घालण्याची परवानगी नाकारल्यामुळे हजारों मुस्लिम मुली शिक्षणापासून वंचित राहील्या आहेत, असा दावा ओवेसींनी आपल्या भाषणात केला.
आपल्या भाषणात ओवेसींनी समान नागरी कायद्याचा विरोध केला. ओवेसी म्हणाले की, समान नागरी कायदा हा हुकुमशाहीकडे नेण्याचा मार्ग आहे. आपल्या भाषणात त्यांनी राहुल गांधींवरही टीका केली. ते म्हणाले की, "राहुल गांधींनी जी दुकानदारी सुरु केली आहे. ती चालणार नाही. या दुकानदाराला मुस्लिमांची काहीही चिंता नाही. त्यांना फक्त राजकारण करायच आहे".