‘मस्क शिपिंग’ कंपनीत कार्यरत असलेला नवीन गोरे यास उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे कंपनीच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘सी एक्स चॅम्पियन’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
जागतिक पातळीवरील ’टॉप वन’वर असलेल्या ‘मस्क शिपिंग कंपनी’तर्फे देण्यात येणारा ’सी एक्स चॅम्पियन’ हा पुरस्कार डोंबिवलीमधील नवीन प्रवीण गोरे याला प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार भारतातून नवीनला देण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, या पुरस्काराने जबाबदारी आणखी वाढली असल्याची प्रांजळ कबुली नवीन याने दिली. नवीनचा या पुरस्काराच्या निमित्ताने प्रवास जाणून घेऊया.
नवीनचा जन्म डोंबिवलीत झाला. त्याने शालेय शिक्षण विद्यानिकेतन शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर ’बी.कॉम’ची पदवी पेंढरकर महाविद्यालयातून घेतली. नवीन हा अभ्यासात सर्वसाधारण होता. त्याला खेळांची प्रचंड आवड होती. त्यामुळे खो-खो, क्रिकेटमध्ये तो नेहमी सहभागी होत असे. आंतरशालेय स्पर्धेमध्येदेखील आपला सहभाग नोंदवित असे. खो-खो मध्ये नवीनने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. नवीनच्या वडिलांनी त्याला पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करायचे, असे निक्षून सांगितले होते. नवीननेही वडिलांच्या शब्दाचा मान ठेवत पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पदवी मिळाल्यानंतर नवीन नोकरीच्या शोधात होता; पण नोकरी मिळवण्यासाठी केवळ पदवी असून चालणार नाही, ही बाब त्याच्या ध्यानात आली. नवीनने नवी मुंबईत ऐरोली येथे नोकरी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला हॉटेल असोसिएट म्हणून त्याने काम केले. चार वर्ष त्यांनी हॉटेल असोसिएट म्हणून काम केले आहे. हे काम करीत असतानाच नवीन पदवीचे शिक्षण घेत होता.
पदवीची परीक्षा जवळ आल्यावर नवीनने नोकरीतून ब्रेक घेतला. नोकरी करत असतानाच त्याने ‘एमबीए’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नवीनने मार्केटिंगमध्ये ’एमबीए’चे शिक्षण पूर्ण केले आहे. नोकरी करीत असल्याने नवीनला स्वतःचा खर्च भागविणे, सहज शक्य झाले. नवीनने पहिली नोकरी ’अॅक्सिस’ बँकेमध्ये केली. नवीन सातवी, आठवीला असतानाच वडिलांच्या मोबाईलच्या दुकानात बसत असे. त्याठिकाणी मोबाईल रिचार्ज करीत असताना त्याला नंबर पाठ होत होते. नवीनने ‘एचडीएफसी’ बँकेत नोकरी स्वीकारली. एका बाजूला ’एमबीए’चे प्रशिक्षणही सुरू होते. त्यानंतर त्याने २०१६ मध्ये ‘फुलर्टन इंडिया’ या कंपनीत काम स्वीकारले. या ठिकाणी दीड वर्ष काम केल्यावर त्यांनी ‘ड्रीम इलेव्हन’ या कंपनीमध्ये नोकरी केली. त्यानंतर नवीनला ’मस्क’ कंपनीची संधी चालून आली. त्या संधीचे नवीनने खर्या अर्थाने सोने केले आहे. नवीनला या कंपनीतर्फे दरवर्षी देण्यात येणारा ‘सी एक्स चॅम्पियन रेड कार्पेट’ पुरस्कार डेन्मार्क येथील कोपनहेगन येथे देण्यात आला. मार्क डेग्रीयल, क्रार्सटन किंडॅल यांच्या हस्ते हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यासाठी नवीन व त्याची पत्नी मनाली दोघे ही कोपनहेगन येथे गेले होते.
नवीनने हा पुरस्कार मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. नवीनने जानेवारी २०२२ पासून केलेल्या कामांची नोंद घेण्यात आली आहे. कंपनीचे दररोजचे काम, ई-मेल, चॅटिंग, कॉल त्या व्यतिरिक्त काही विशेष बाबी कराव्या लागतात. त्यात कंपनीला कुठे तोटा होत आहे, हे पाहणे. त्यात कंपनीला फायदा कसा होईल, यागोष्टी अंतर्भूत असतात. ग्राहकांना वस्तू विकून कंपनीकरिता व्यवसाय आणायचा असतो. ग्राहक स्कोअर देत असतो. त्यामध्ये ग्राहकाला एक ते दहामध्ये स्कोअर देता येत असतो. नवीनला ७१ ग्राहकांनी दहाचा स्कोअर दिला आहे. त्यामध्ये इंग्लंडमधील ग्राहकांचा समावेश आहे. दहा हजार युरोचा व्यवसाय नवीनने कंपनीला आणून दिला आहे, अशा अनेक गोष्टी पुरस्कारासाठी निवड करताना पाहिल्या जातात.
एकूणच पुरस्कार देताना वर्षभराचे काम पाहिले जाते. त्यांनी किती बिझनेस दिला हेदेखील पाहिले जाते. त्यासाठी एक चाचणीदेखील घेतली जाते. या कंपनीचे संपूर्ण जगात एक लाख कर्मचारी काम करीत आहेत. त्यासाठी २० हजार अर्ज आले होते. त्यातून संपूर्ण जगातून १४ जणांची निवड करण्यात आली. त्यामध्ये भारतातून नवीनची निवड करण्यात आली. त्यांच्यासोबत इजिप्त, चीन, अमेरिका अशा विविध ठिकाणच्या व्यक्तींचा समावेश होता. ’रेड कार्पेट अॅवार्ड’ हा जगातील मोठा सन्मान असलेला पुरस्कार असल्याचे मानले जाते. पुरस्कार प्राप्त व्यक्तीला डेन्मार्क कोपनहेगनमध्ये सात दिवसांची ट्रीपदेखील दिले जाते. संपूर्ण वर्षभरात नवीनला एकाही समारंभाला कधी उपस्थित राहता आले नाही. काहीतरी वेगळे करून दाखवायचे होते. नवीनने वर्षभर केलेल्या मेहनतीचे चीज या पुरस्कारच्या रुपाने त्याला मिळाले आहे. या पुरस्काराने जबाबदारी खूप वाढली आहे, असे नवीन सांगतो.
नवीनचे वडील प्रवीण हे ज्योतिष अभ्यासक आहेत. त्यांचे एक साप्ताहिक आहे. त्यांची आई नूूतन ही गृहिणी आहे. नवीनचा भाऊ चिन्मय हादेखील शिपिंगमध्ये काम करीत आहे. नवीनच्या या पुरस्कारात आईवडील आणि त्यांची पत्नी यांचा मोलाचा वाटा आहेे. आता नवीनला वरिष्ठ व्यवस्थापक या पदावर जाण्याची इच्छा आहे. नवीनच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.