२०२५ पर्यंत भारताचे पाच अब्ज डॉलर्स किमतीच्या संरक्षण निर्यातीला स्पर्श करण्याचे उद्दिष्ट आहे. हा सौदा फक्त शस्त्रास्त्रांच्या व्यापाराचा नाही आहे, तर चीनविरुद्ध उभे ठाकण्यासाठी संरक्षण उपकरणाची विक्री करण्याची भारताची भूमिका आहे. भारतीय क्षेपणास्त्रांमुळे फिलिपाईन्सला दक्षिण चीन समुद्रात त्यांचा हक्क मिळू शकेल. भारताने फिलिपाईन्सला सैन्याला सायबर सुरक्षा प्रशिक्षण देऊ केले आहे.
भारत दौर्यावर आलेले फिलिपाईन्सचे परराष्ट्रमंत्री एनरिक मॅनालो यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याशी दि. २९ जून रोजी महत्त्वपूर्ण चर्चा केली. फिलिपाईन्स भारताकडून ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रे खरेदी करणार आहे. भारतात येण्यापूर्वी एनरिक यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, ”भारत आणि फिलिपाईन्स यांच्यासाठी चीन हे सर्वात मोठे आव्हान आहे. कारण, त्यामुळे या भागात तणाव निर्माण होत आहे.” दक्षिण चीन समुद्र हा महत्त्वाचा व्यापारी मार्ग, नैसर्गिक वायू आणि तेलाचे साठे मासेमारीसाठी समृद्ध मानला जातो. पॅरसेल्स आणि स्प्रॅटलीस या दोन साखळी बेटांवर चीन, तैवान, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, मलेशिया यांच्यात वाद आहे.
एनरिक मॅनालो दिल्ली येथे दि. २८ जून बोलताना म्हणाले की, ”आम्हाला भारताशी भक्कम संरक्षण संबंध हवे आहेत. चीन आमच्या सागरी क्षेत्रात घुसखोरी करत असून, त्याची ही कृती आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. याविषयी आम्ही चीनला स्पष्टपणे सांगितले आहे. आमचे म्हणणे आहे की, जगातील प्रत्येक सागरी क्षेत्र कुणासाठीही मोकळे असावे. केवळ हिंदी महासागर आणि दक्षिण चीन समुद्रच का? येथूनच व्यापार होतो आणि त्यावर कोणत्याही देशाचा अधिकार असू शकत नाही.” दक्षिण चीन समुद्रात चीनच्या कारवायांमुळे तैवान, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, मलेशिया आणि ब्रुनेई हे देश त्रस्त आहेत. ‘भारत आणि अमेरिका यांनी या छोट्या देशांना पाठिंबा द्यावा आणि चीनचा हस्तक्षेप संपवावा, यासाठी फिलिपाईन्स प्रयत्नशील आहे.फिलिपाईन्सचे भौगोलिक सामरिक स्थान भारतासाठी महत्त्वाचे आहे. दक्षिण चीन समुद्राच्या परिसरात हा एक महत्त्वाचा देश आहे. भारतासमवेतच त्यांच्या सैन्यानेही अनेक वेळा संयुक्त सैनिकी सराव केले आहेत.
भारतासाठी फिलिपाईन्सचे स्थान महत्त्वाचे
यापूर्वी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी तीन दिवसीय फिलिपाईन्स दौरा केला होता. दहशतवादविरोधी आणि संरक्षण तसेच सागरी सुरक्षा, संरक्षण क्षमता तसेच लष्करी प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण करण्यासाठी सहभाग मजबूत करण्याच्या दिशेने आणखी काम करण्यास उभय मंत्र्यांनी सहमती दर्शवली होती. फिनटेक, ब्लू इकोनॉमी, पुनर्नवीकरणीय ऊर्जा, अंतराळ क्षेत्र, सायबर सुरक्षा आणि पारंपरिक औषध यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या उपक्रमांबद्दलही मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले होते. डॉ. जयशंकर यांनी फिलिपाईन्समध्ये भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना लवकरात लवकर परत येण्यासाठी फिलिपाईन सरकारचे लक्ष वेधण्याची मागणी केली होती, जी नंतर पूर्ण झाली. दोन्ही मंत्र्यांनी इंडो-पॅसिफिक प्रदेशातील दोन लोकशाहीच्या विकासाच्या आकांक्षा आणि सामायिक प्राधान्यक्रमांना सुलभ करणार्या बहुआयामी भागीदारीसाठी दृढ वचनबद्धतेची ग्वाही दिली. डॉ. जयशंकर यांनी मनिला इथल्या भारतीय समुदायाशीही संवाद साधला होता.
परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या या फिलिपाईन्स दौर्यात इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्यासह उभय देशांनी इतर आघाड्यांवरही एकमेकांना साहाय्य करण्याचे मान्य केले आहे. चीनच्या वर्चस्ववादी कारवायांपासून फिलिपाईन्सला संभवणारा धोका लक्षात घेता, या देशाचे भारताबरोबरील हे सहकार्य धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे ठरते.
’ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र करार
भारत व फिलिपाईन्स संरक्षण व सागरी क्षेत्रातील सहकार्य वाढवणार आहेत. काही दिवसांपूर्वीच फिलिपाईन्सने भारताकडून ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र खरेदी करार केला होता. हा करार फिलिपाईन्सच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रे फिलिपाईन्सच्या नौदलाची क्षमता वाढविणारी ठरतील. फिलिपाईन्सच्या लष्करालाही ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रे हवी असल्याचे पुढे आले. तसेच, दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चर्चेत उभय देशांमधील सहकार्याची व्याप्ती वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच, दोन्ही देशांच्या सहकार्याची नवी दालने विकसित करण्याची तयारी परराष्ट्रमंत्र्यांनी या चर्चेत दाखविली. यामध्ये अंतराळ, सायबर सुरक्षा, सागरी क्षेत्राशी निगडित अर्थव्यवस्था, अक्षय ऊर्जा आणि अर्थकारण आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय असलेल्या फिनटेक यांचा यामध्ये समावेश आहे. भारत व फिलिपाईन्स यांच्यामध्ये क्षेत्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींवरही विचारविनिमय झाला. याबरोबरच संरक्षण, अर्थकारण आणि कृषी क्षेत्रांबाबत सहकार्य करण्यावर उभय देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची सहमती झाली आहे.
केवळ फिलिपाईन्सच नाही, तर व्हिएतनाम तसेच आग्नेय आशियाई क्षेत्रातील इतर देशदेखील भारताबरोबरील आपले सहकार्य व्यापक करण्यासाठी उत्सुक आहेत. फिलिपाईन्सच्या पाठोपाठ व्हिएतनामदेखील भारताकडून ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रांची खरेदी करण्याची तयारी करीत आहे. ही बाब भारताच्या शस्त्रविषयक निर्यातीसाठी ‘गेमचेंजर’ ठरेल. भारताच्या फिलिपाईन्सबरोबरील या सहकार्याचे फार मोठे धोरणात्मक महत्त्व आहे.
चीनला उघड-उघड संदेश
शस्त्रास्त्र निर्यातदार होण्यासाठी भारताने मोठे पाऊल उचलले आहे. फिलिपाईन्ससोबत बचावात्मक साहित्य आणि उपकरणे यांच्या विक्रीचा भारताने करार केला आहे, ज्यात ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राचा समावेश आहे. दोन कारणांसाठी ही बाब महत्त्वाची ठरते. पहिलं म्हणजे क्षेपणास्त्र प्रणालीसाठी फिलिपाईन्स हा भारताचा पहिला ग्राहक असेल आणि दक्षिण चीन समुद्रात (साऊथ चायना सी) चीनपासून फिलिपाईन्सचा बचाव होण्यात भारताचा हात असेल. दक्षिण चीन समुद्र हा केवळ आशियातच नव्हे, तर संपूर्ण जगात एक ज्वलनशील बाब बनून राहिला आहे. संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर चीनने दावा ठोकला आहे. या दाव्याचा परिणाम फिलिपाईन्स, मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनेई आणि व्हिएतनाम या पाच देशांवर होतोय आणि हेच दक्षिण चीन समुद्रातील संघर्षाचे मुख्य कारण आहे आणि म्हणूनच फिलिपाईन्स चीनच्या विरोधात आहे. भारत फिलिपाईन्सला शस्त्रास्त्रांची निर्यात करतो आहे. या कराराचे सामरिक महत्त्व स्पष्ट आहे. स्वावलंबनाने चीनच्या धोक्याला फिलिपाईन्स आज सामोरा जातोय. भारत आणि फिलिपाईन्स यांनी अंमलबजावणी करार केला आहे. हा करार आणि त्याच्या अटी सरकार ते सरकार करारावर आधारित आहेत.
फिलिपाईन्सला ‘ब्राह्मोस’ची गरज का?
‘ब्राह्मोस’ हे जगातील सर्वात वेगवान ’सुपरसॉनिक’ म्हणजे ध्वनीच्या वेगापेक्षा वेगवान क्षेपणास्त्र मानले जाते. क्षेपणास्त्रांच्या या श्रेणीत ‘ब्राह्मोस’ अग्रस्थानी आहे. ते ध्वनीच्या वेगाच्या तीनपट वेगाने प्रवास करते. या क्षेपणास्त्राचा मारा जहाजे आणि पाणबुड्यातून केला जाऊ शकतो. विमाने आणि जमिनीवरून ते २९० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकते. फिलिपाईन्सन किनारपट्टीवरील संरक्षण आणि जमिनीवरून हल्ला करण्यासाठी ‘ब्राह्मोस’चा वापर करायचा आहे. दक्षिण चीन समुद्रातील चीनची वाढती आक्रमकता लक्षात घेता सुरक्षेचा उपाय त्यांना हवा आहे. परदेशी जहाज दिसल्यावर गोळीबार करण्याचा कायदा चीनने जानेवारीमध्ये संमत केला.
फिलिपाईन्सने या निर्णयावर कडक निषेध नोंदविला. ‘युद्धाची नांदी‘ असे ट्विट परराष्ट्रमंत्र्यांनी केले आहे. याच कारणामुळे फिलिपाईन्सला समुद्रकिनार्यावर आपले संरक्षण वाढवण्याची गरज भासतेय. म्हणूनच फिलिपाईन्ससाठी ‘ब्राह्मोस’ एकदम योग्य आहे, असे तज्ज्ञांना वाटते. फिलिपाईन्स ही क्षेपणास्त्रे केवळ जमिनीवरूनच नाही, तर जहाजावरूनही प्रक्षेपित करू शकतो. ही क्षेपणास्त्रे भारताने चीनच्या नियंत्रण रेषेवरील अनेक मोक्याच्या ठिकाणी तैनात केली आहेत. ‘सुखोई’ लढाऊ विमानांवरही ते वापरण्यात येईल. भारत या कामीही फिलिपाईन्सला मदत करत आहे. भारताने फिलिपाईन्सला क्षेपणास्त्रांचे अधिग्रहण करण्यासाठी १०० दशलक्ष डॉलर्सचे कर्ज दिले होते. आवश्यकता भासल्यास त्याची मुदत वाढवण्यात येईल.
जागतिक संरक्षण बाजारात महत्त्वाचा निर्यातदार
या करारामुळे भारताला बराच फायदा होईल. शस्त्रास्त्रांचा निर्यातदार म्हणून तो भक्कमपणे पाय रोवू शकेल. या करारामुळे ‘जागतिक संरक्षण बाजारात प्रतिस्पर्धी निर्यातदार म्हणून भारताची ओळख होण्याच्या दिशेने भारताचे पाऊल पडेल. फिलिपाईन्सशिवाय व्हिएतनाम आणि संयुक्त अरब अमिराती हे ‘ब्राह्मोस’ खरेदी करण्यास उत्सुक आहे. अर्जेंटिना, ब्राझील, इंडोनेशिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांसमवेतही भारताची बोलणी झाली आहेत. २०२५ पर्यंत पाच अब्ज डॉलर्स किमतीच्या संरक्षण निर्यातीला स्पर्श करण्याचे उद्दिष्ट आहे. हा सौदा फक्त शस्त्रास्त्रांच्या व्यापाराचा नाही आहे, तर चीनविरुद्ध उभे ठाकण्यासाठी संरक्षण उपकरणाची विक्री करण्याची भारताची भूमिका आहे. भारतीय क्षेपणास्त्रांमुळे फिलिपाईन्सला दक्षिण चीन समुद्रात त्यांचा हक्क मिळू शकेल. भारताने फिलिपाईन्सला सैन्याला सायबर सुरक्षा प्रशिक्षण देऊ केले आहे. मनिला येथे दूतावासात सुरक्षा अधिकारी तैनातीवर चर्चा करत आहे. यामुळे भारत फिलिपाईन्स संबंध अजून मजबूत होणार आहेत.
(नि.) ब्रि. हेमंत महाजन