एकमेकांपासून दूर असताना आपल्या माणसांशी संवाद साधण्याचं एकुलतं एक माध्यम म्हणजे पत्र. माणूस बोलू लागला तशी भाषेची आणि संवादाची गरज निर्माण झाली. आपला आवाज पोहोचू शकणार नाही, अशा व्यक्तीसमोर व्यक्त होण्याच्या इच्छेतून लिपीचा जन्म झाला. कुणापर्यंत तरी पोहोचण्यासाठी माणूस आता लिहू लागला, हा पत्राचा जन्म. या पत्राने केवळ अंतरावरच नाही, तर काळावरही विजय मिळवला. आपण ज्या माणसांना पाहिलेही नाही, पाहू शकणारही नाही, अशा माणसांपर्यंत आपले विचार पोहोचविण्यासाठी तो त्याच्या बुद्धीला सुचेल त्या माध्यमांचा कागद करून पत्रलेखन करू लागला. शिलालेख, भित्तिचित्रे, वीरगळ, पुढील पिढीला वारसा आणि कथा सांगणारी ही सर्व पत्रेच. साहित्याचा सर्वात प्राचीन प्रकार तो हाच. ‘शब्दमल्हार प्रकाशन‘च्या स्वानंद बेदरकर यांनी या संकल्पनेवर आधारित ’शब्द कल्पिताचे / न पाठवलेली पत्रे’ हा ५० पत्रांचा ग्रंथ संपादित केला आहे. या ग्रंथाचा हा परिचय.
या पुस्तकाची संकल्पना जितकी अफलातून आहे, तेवढीच प्रस्तावनासुद्धा! ‘अथातो पत्रजिज्ञासा‘ म्हणत स्वानंद प्रस्तावनेला सुरुवात करतात. पत्राचे कालानुरूप बदलत गेलेले रूपडे, त्याचा विषयानुरूप बदलणारा भाव आणि अनादी काळापासून आजतागायत तेच राहिलेलं निखळ स्वरूप अगदी खुलवून लिहिलं आहे. पुढच्या ५० पत्रांना वाचताना ती समजून घेण्यासाठी प्रस्तावना मार्गदर्शन करते. आपल्या आवडत्या व्यक्तीला किंवा आवडत्या व्यक्तीने लिहिलेले पत्र वाचण्याच्या घाईत प्रस्तावनेकडे दुर्लक्ष करू नये, असा आग्रह आहे. स्वानंद या प्रस्तावनेतून ग्रंथाचे केवळ गुणगान करत नाही, तर चिकित्सासुद्धा करतात. काही पत्रांना निबंधासारखा कोरडेपणा आला आहे, असे प्रामाणिकपणे ते प्रस्तावनेत विशद करतात. या ग्रंथात महाकवी कालिदासांपासून ते अलीकडच्या ढसाळांपर्यंत अनेकांना पत्रे लिहिली आहेत. संताना, राजांना, समाजसुधारकांना जे-जे भारतीय विचारांचा अमूल्य ठसा उमटवून गेले, त्या-त्या गतकाळातील अनेकांना आजच्या पिढीतील विचारवंतांनी लेखकांनी पत्रे लिहिली आहेत. काळ सांधणारी ही पत्रे वाचणे म्हणजे पर्वणीच!
पत्रांकडे येण्यापूर्वी संपादकाचे कौतुक करावेसे वाटते, ते आज समाजात दिसून येणार्या दोन्ही महत्त्वाच्या आणि परस्परविरोधी विचारधारांना दिलेला न्याय. म्हणूनच हा पत्रप्रपंच आजच्या काळातील समाजाच्या भावविश्वाचा दस्तावेज आहे, असे मला वाटते. एखादी विचारधारा समजण्यासाठी विरोधी दृष्टिकोन जाणून घेणे महत्त्वाचे असते, या प्रकारे एकामागोमाग एक पत्रे वाचताना एक आशयघन तणाव राहतो. त्यातून आपलं एक वैचारिक मंथन होतं. काही विशेष उल्लेखनीय पत्रे आहेत. त्यातलंच एक म्हणजे गोपाळ गणेश आगरकरांना अरुणाताईंनी लिहिलेलं पत्र. अरुणा ढेरे मनाचे असंख्य कंगोरे व्यवस्थित उलगडून दाखतात. त्यांनी व्यक्तिचित्रणेच लिहावीत. त्या ज्याप्रकारे व्यक्तिवेध घेतात, आपण अनेक मितींतून त्या व्यक्तीला पाहू शकतो. तत्कालीन समाजमानसिकतेमुळे एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला असेल, तर पुढे काळही त्या व्यक्तीकडे त्याच जुन्या चष्म्यातून पाहतो. या काचा स्वच्छ करणं आणि वाचकाला दिव्य दृष्टी देण्याचं काम त्यांनी या पत्रातून केलंय, असा उल्लेख करणं गरजेचं आहे. या पत्रात आगरकरांची ओळख आहे, त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या जीवनाचा आढावा आहे, त्यांची आणि टिळकांची मैत्री तसेच त्यांच्यातल्या वादाची संभाव्य कारणेसुद्धा त्या लिहितात.
तसेच, सुंदर दुसरं पत्र म्हणजे आशुतोष अडोणी यांनी डॉ. हेडगेवारांना लिहिलेलं. थोडं अपूर्ण वाटलं, तरीही हे पत्र केवळ व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारं असलं, तरी त्यातून परिस्थितीवर परखड भाष्य केलं आहे. तत्कालीन राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक अशा सर्वच मुद्द्यांवर चर्चा आहे. काँग्रेसची कार्यप्रणाली आणि क्रांतीचे मार्ग, हिंदू आणि ब्रिटिश राजवट, या सर्वांचा सामान्य माणसांवर होणारा परिणाम त्यांनी दाखवला आहे. ’वैभवशाली इतिहास आणि देदीप्यमान परंपरा लाभलेला आपला देश, डोळे दिपवून टाकणार्या क्रांतिकारकांच्या प्रेरणा आणि आभाळाच्या उंचीचं सत्याग्रही नेतृत्व लाभूनही देश परतंत्र का?’ असा प्रश्न उपस्थित करत, त्यांनी हेडगेवारांचं कार्य सांगितलं. त्यांची ओळख होतीच, ती अजून वेगळ्या आयामातून झाली. व्यक्तिनिर्माणातून राष्ट्र निर्माण करणारे... लहानपणी आपण मोळीवाल्याची गोष्ट ऐकलेली असते. अनेक लाकडांची मोळी सहज तुटत नाही, या गोष्टीचे मर्म आपण गोष्ट संपल्यावर विसरूनच जातो.
ते अमलात आणण्याचं स्वप्न पाहिलं ते डॉक्टरांनी. पत्राच्या शेवटास मात्र ते नेहरूंची डॉक्टरांशी तुलना करतात. कुणाच्या विचारांसाठी संपूर्ण आयुष्य मोजायला लोक तयार आहेत. त्यावरून विचारांचे मर्म जाणून घ्यावे, असे ते म्हणतात. आसावरी काकडेंचं तुकोबांना लिहिलेलं पत्रही छान झालंय. पत्र म्हंटल की, कसं ते अनौपचारिक असावं. प्रबंध लिहिल्यासारखी ठाशीव भाषा त्याची नसावी. आपल्यापेक्षा सर्वच दर्जावर उजवं व्यक्तिमत्व असेल, तरीही ते एका व्यक्तीने कुणा एका व्यक्तीला लिहिले असतं, त्यात मोकळं व्हायचं असतं. एक स्वतंत्र व्यक्ती या नात्याने थोडी बरोबरी करायची असते, तशा त्या निखळ लिहितात, त्याला जाब विचारतात, त्याच्या निर्णयांवर अविश्वास दाखवतात. लाहो यांच्या पत्रात आणि त्याचे त्यांनी शोधलेले अर्थ. पत्र इथे समृद्ध होतं. पत्र सर्व मर्यादा पार करून केवळ अभिव्यक्त होण्यातील सार सांगतं त्याची प्रचिती येते. आसावरीचं भाषेवर प्रभुत्व आहे. त्यांची शब्दसंपदा अफाट आहे. त्यांच्या लेखणीत एक प्रवाह आहे, ही जादू तुकोबांचीही. ही एकरूपता आपल्याला पत्राच्या शेवटपर्यंत वाहून नेते. तसेच एक पत्र पी. विठ्ठल यांनी ढसाळांना लिहिलेले. उत्तम, उल्लेखनीय...
श्रीनिवास हेमाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लिहिलेले पत्र खरेतर महात्मा जोतिबा फुलेंना लिहिल्यासारखेच झाले आहे. शिवाजी महाराजांचे प्रत्येक कार्य कसे जोतिरावांशी मिळते जुळते आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी शिवाजी महाराजांना पत्र लिहिण्याऐवजी जोतिबांनाच लिहिले असते, तर तर उत्कृष्ट झाले असते. ’तुमची स्वराज्याची इच्छा ही मावळ्यांची होती आणि जिजाऊंची होती, ती श्रींची नव्हतीच मुळी’ असं ठासून सांगताना शिवबांच्या श्रद्धेला अगदी मातीमोल ठरवून टाकले. तसेच, शिवाजी महाराजांच्या राज्याचे दाखले देत प्रशासनावर आणि समाजव्यवस्थेवर टीकाही केली आहे. हे पत्र म्हणजे माझ्या लेखी अपूर्ण अभ्यास आणि संकुचित विचारसरणीतून ओकलेली गरळ आहे, थोडक्यात न पटलेले पत्र.
बहुतांश पत्रांमध्ये त्या-त्या व्यक्तीची ओळख करून दिली आहे, असे मला वाटते. अर्थात, ही माणसे नावाजलेली आहेत, समाजाला त्यांची ओळख असतेच, पत्रांतून एकतर वेगळा दृष्टिकोन किंवा आपलं सांगणं सांगायला हवंय, आपली आजची ओळख द्यायला हवीय. काही अपवाद वगळता सर्वच पत्रातून केवळ त्या काळाचे आणि त्या व्यक्तीचे गुणगान गायलेले दिसते. कालानुरूप घडणार्या बदलांना आपण स्वीकारतच नाही आणि याच नकारात्मकतेतून तक्रारीच खूप केल्या आहेत. चांगले दिवस येत नसतात, ते आणावे लागतात, आपण पुढाकार घ्यावा लागतो.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे सर्वच लेखकांची शब्दसंपदा आणि लेखन कौशल्ये वाखाणण्याजोगी आहेत. ग्रंथाची रचना उत्कृष्ट झाली आहे. कागदाची गुणवत्ता, आखणी, मांडणी उत्तम असल्याने वाचनाचा अनुभव उत्तम आहे. आपल्या घराच्या ‘बुकशेल्फ‘मध्ये असावंच असं हे पुस्तक!
मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.