बेधडक दादा

    05-Jul-2023   
Total Views |
Sharad Pawar and Ajit Pawar factions of the Nationalist Congress Party

अजितदादांच्या कालच्या बेधडक भाषणातून अजूनही ते दैवत मानत असलेल्या शरद पवारांचा राजकीय हटवादीपणाच अधोरेखित झाला. शिवाय, घराणेशाहीत रक्ताची नाती ही कर्तृत्वापेक्षा मोठी ठरतात, यावरही शिक्कामोर्तब झाले. तसेच, अजितदादांचे कालचे भाषण हे सर्वार्थाने महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाला नवीन दिशा आणि कलाटणी देणारे ठरावे. यापूर्वीही बेधडक, बिनधास्त दादांना महाराष्ट्राने कित्येकदा पाहिले-ऐकले आहेच. परंतु, कालच्या भाषणात अजितदादा हे केवळ राष्ट्रवादीचे नेते म्हणून नव्हे, तर एक खंबीर नेतृत्व म्हणून पुन्हा एकदा जनतेसमोर आले. अजितदादांमधील ही काहीशी सुप्त राजकीय परिपक्वता त्यांनी नव्यानेे पक्षाच्या स्वीकारलेल्या सर्वस्वी जबाबदारीचाही कदाचित परिपाक म्हणतायेईल. पण, त्यांच्या सर्वसमावेशक भाषणामुळे आणि रोखठोक भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य नेमके कुठल्या पवारांच्या हाती आहे, याची प्रचिती यावी. अजितदादा गेल्या तीन दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय. लोकप्रतिनिधी म्हणून विविध पदे दादांनी भूषविली. प्रशासनावर मजबूत मांड ठोकणारा नेता अशीही त्यांची राज्याच्या राजकारणात ख्याती. राज्याच्या अगदी कानाकोपर्‍यात तितकाच दांडगा जनसंपर्क. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसमधील भुजबळ, वळसे-पाटलांनंतरची पुढची फळी उभी करण्यात दादांचे योगदान हे कदापि अव्हेरून चालणार नाहीच. दादांकडे मुख्यमंत्रिपदाची संधीही संपुआच्या काळात चालून आलीच, पण पवारांनी कायमच राष्ट्रवादीपुढे काँग्रेसला झुकते माप दिल्याला इतिहास साक्ष आहे. पवारांचे कन्याप्रेमही कधी लपून राहिले नाहीच म्हणा आणि आज या रक्ताच्या नात्यापुढं दादांचं कर्तृत्वही फिकं पडलं. याचं बोचर्‍या वेदनेला काल पहिल्यांदाच अजितदादांनी वाट मोकळी करून दिली. पहाटेच्या शपथविधीनंतर अजितदादांविषयी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, राज्याच्या राजकारणात जे अविश्वासाचे वलय निर्माण झाले, त्यामागे शरद पवारांच्या खेळीचाही दादांनी खुलासा केला. त्यावरही दादांनी कालच्या भाषणात शिक्कामोर्तब करून त्यांना ‘व्हिलन’ बनवण्याचा प्रयत्न कसा केला गेला, त्याची कथा आणि व्यथाही मांडली. एकूणच अजितदादांच्या मनातील गेल्या कित्येक वर्षांची खदखद ही त्यांच्या भाषणातील प्रत्येक शब्दात अगदी स्पष्टपणे झळकलेली महाराष्ट्राने पाहिली.

निर्ढावलेले काका
 
कालच्या भाषणातून अजितदादांचा सात्विक संताप, इतक्या वर्षांतील राजकीय उद्विग्नता सर्वांसमक्ष आली. पण, त्याहीपेक्षा वयाची ८० वर्षं ओलांडलेल्या, राजकीय कारकिर्द मनसोक्त उपभोगलेल्या नेत्याने आता विश्रांती घ्यावी आणि पुढील पिढीकडे कार्यभार सोपवावा, ही अजितदादांची अपेक्षाही तितकीच रास्तच. त्यात अजितदादांचे काही चुकले, असे मुळीच नाही. अजितदादांचे वय ६३. आजवरच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पाचवेळा उपमुख्यमंत्रिपदी आणि विरोधी पक्षनेतेपदीच त्यांना समाधान मानावे लागले. त्यामुळे विरोधकांच्या ऐकतेचा सूर आळवणार्‍या शरद पवारांच्या मार्गाने गेल्यास पक्षाचेही भवितव्य उज्जवल नाही आणि आपणही वाढत्या वयोमानानुसार अखेर कुचकामी ठरू, ही अजितदादांची भावना मान्य करावीच लागेल. परंतु, प्रारंभीपासूनच पक्षातील भावी नेतृत्वाविषयी शरद पवारांनी कायमच संभ्रम ठेवला. मे महिन्यातले राजीनामा नाट्यही त्याच कडीचा भाग. त्यामुळे शरद पवार एक मुरब्बी राजकारणी असले तरी त्यांना राष्ट्रवादीतील फूट टाळता आली नाही, हेच खरे. अजितदादांनी आपल्या भाषणात त्यांच्यासोबत असलेल्या केवळ आमदारांना, कार्यकर्त्यांना भावनिक सादच घातली नाही, तर राजकीय वास्तवाचीही जाणीव करून दिली. भाजपबरोबर सत्तेत सहभागी होणे हे राज्यासाठी, विकासासाठी किती महत्त्वाचे आहे, ते दादांनी पटवून दिले. एवढेच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशविदेशातील लोकप्रियता, त्यांना राबविलेली ध्येय-धोरणे यांचेही कौतुक करत दादांनी आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे एखाद्या राजकीय पक्षातील बहुसंख्यांचे मत डावलून, ते फार काळ दाबून ठेवले की, त्याचा कसा उद्रेक होतो, हे शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंना उपदेशाचे डोस पाजणारे शरद पवारही समजू शकले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गेल्या काही वर्षांतील सुमार कामगिरीमुळे राष्ट्रीय पक्ष ते प्रादेशिक पक्ष म्हणून झालेल्या घसरणीवरही अजितदादांनी काल नेमके बोट ठेवले आणि पक्षवास्तवाचे उपस्थितांच्या डोळ्यात अंजन घातले. पण, ते काहीही असले तरी पवारांच्या सावलीतून बाहेर पडून अजितदादांनाही राजकीय कसोटीवर स्वत:ला सिद्ध करावेच लागेल, हेच खरे!


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची