‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात गडकरींची फटकेबाजी!
05-Jul-2023
Total Views | 125
मुंबई : राज्यातील सध्याची राजकीय परिस्थितीत पाहता मतदारांना किंमत आहे की नाही असा प्रश्न सामान्य लोकांकडून विचारला जात असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मतदारांनाच थेट जबाबदार धरले आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या नवीन भागात नितीन गडकरी येणार आहेत. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालक अवधुत गुप्ते यांनी सद्यस्थितीतील राजकारणावर प्रश्न विचारला असता गडकरींनी मतदारांना खुपणाऱ्या गोष्टींना मतदारच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, गडकरी म्हणाले, “या देशात विचारभिन्नता ही अडचण नसून विचारशून्यता ही खरी अडचण आहे. तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या विचाराचे असाल, कम्युनिस्ट असाल, समाजवादी असाल पण तुमच्या विचारांशी तुम्ही प्रामाणिक राहायला पाहिजे. तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टींना तुम्हीच जबाबदार आहात” असे ते म्हणाले.
नितीन गडकरींनी मतदारांबद्दल अधिक सजगतेने आपले मत मांडत लग्नाचे उदाहरण देत, “तुम्ही तुमच्या मुलीसाठी मुलगा शोधताना किती विचार करता. मुलगा कसा असला पाहिजे, मुलीची सासू कशी असली पाहिजे, त्याचे आई-वडील कसे असले पाहिजे, घर कसे असले पाहिजे? मग मत देताना का गांभीर्याने विचार करत नाहीत? तुम्ही म्हणता हा माझ्या जातीचा आहे म्हणून त्याला मत देतो, हा माझ्या भाषेचा आहे म्हणून मत देतो. ज्या दिवशी जनता हे ठरवेल की आम्ही देणारे मत विचारपूर्वक देऊ, आम्ही चुकीच्या माणसाला आमचे मत देणार नाही, त्यादिवशी राजकारणात आपोआप बदल होतील,” असे स्पष्टपणे गडकरी व्यक्त झाले.