जंगलाच्या 'टेरिटरी'ची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर
31-Jul-2023
Total Views | 37
मुंबई : विदर्भातील जंगलाच्या 'टेरिटरी'ची थरारक कहाणी मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. नुकताच जागतिक व्याघ्र दिन झाला आणि याच दिनाच्या औचित्य साधत वने, सांस्कृतिक आणि मत्स व्यवसाय कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 'टेरिटरी' या चित्रपटाचे पोस्टर विधान भवन येथे प्रदर्शित करण्यात आले. जंगलांचे कमी होणारे प्रमाण आणि त्यामुळे जंगलातील वन्यजीवांचे हरपले जाणारे छप्पर हा चिंतेचा विषय होत चालला आहे. नरभक्षक झालेला वाघ जंगलातून गायब होतो आणि त्याला शोधण्याची थरारक मोहीम या कथासूत्रावर ‘टेरिटरी’ हा चित्रपट बेतला आहे.
कलकत्ता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, गंगटोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, ग्रीन अॅकॅडमी अॅवॉर्ड्स, गोल्ड फर्न फिल्म अॅवॉर्ड्स अशा विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये चित्रपट दाखवला गेला आणि पारितोषिकप्राप्त ठरला आहे. तसेच पुणे इंटरनशनल फिल्म फेस्टिवल, कान्स फेस्टिवल मार्केट,मेटा फिल्म फेस्टिवल,दुबई आणि मुंबई इंडि फिल्म फेस्टिव येथे देखील या चित्रपटाची निवड झाली होती. संदीप कुलकर्णी, किशोर कदम अशी तगडी स्टारकास्ट आहे. जंगल, वन्यजीव अशा विषयांवर काही मोजके अपवाद वगळता फार चित्रपट झालेले नाहीत. त्यामुळे टेरिटरी हा चित्रपट अतिशय महत्त्वाचा आहे.