ज्ञानवापीस ‘मशिद’ म्हटले तर वाद होणारच : योगी आदित्यनाथ
मुस्लिमांना ऐतिहासिक चूक सुधारण्याचे आवाहन
31-Jul-2023
Total Views | 116
नवी दिल्ली : ज्ञानवापीमध्ये काय आहे, हे जगजाहिर आहे. मात्र, मुस्लिमांनी ऐतिहासिक चूक न सुधारता ज्ञानवापीस ‘मशिद’ संबोधले; तर वाद होणारच असे रोखठोक प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एशियन न्यूज इंटरनॅशनल (एएनआय) या वृत्तसंस्थेस मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी सध्या सुरू असलेल्या ज्ञानवापी – काशी विश्वनाथ प्रकरणी अतिशय स्पष्टपणे भूमिका मांडली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ज्ञानवापीस ‘मशिद’ कोणी संबोधत असेल तर त्यास आक्षेप घेतला जाईल आणि त्यामुळे नक्कीच वाद निर्माण होतील. ज्ञानवापी ही मशिद असल्याचा दावा करणाऱ्यांनी तेथे त्रिशुळ कसे आहे, तेथे ज्योतिर्लिंग आणि हिंदू देवतांच्या प्रतिमा कशा आल्या याचे उत्तर द्यावे. या सर्व गोष्टी तर आम्ही (हिंदूंनी) तेथे ठेवलेल्या नाही. ज्ञानवापीच्या भिंती तर सर्वकाही अतिशय स्पष्टपणे सांगत आहेत. त्यामुळे देवाने प्रत्येकास दृष्टी दिली असून त्याद्वारे ज्ञानवापीकडे बघण्याची गरज आहे. खरे तर ज्ञानवापीविषयी तोडगा काढण्याचा प्रस्ताव मुस्लिम समाजाकडून येण्याची गरज होती. आमच्याकडून ऐतिहासिक चूक झाली असून आता त्या चुकीस सुधारण्याची आमची ईच्छा आहे, असे मुस्लिमांनी म्हणण्याची गरज होती; असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या या प्रतिपादनास मुस्लिमांनी तत्काळ आक्षेप घेतला आहे. समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क म्हणाले की, मुस्लिमांकडून कोणतीही चूक झालेली नाही आणि मुस्लिमांन कधीही संघर्ष केलेला नाही. त्यांनी (हिंदू) जाणीवपूर्वक छेडछाड करून त्यास मंदिर असे संबोधण्यास सुरूवात केली असल्याचे बर्क यांनी म्हटले आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वक्तव्य हिंदू समाजासाठी महत्त्वाचे असून काशीसह श्रीकृष्णजन्मभूमीसाठी शुकसंकेत असल्याचे मत काशी विद्वत परिषदेचे पश्चिम भारत प्रभारी कार्ष्णी नागेंद्र महाराज यांनी म्हटले आहे.
आता तरी अतिक्रमण हटवा – दिनेश शर्मा, श्रीकृष्णजन्मभूमी याचिकाकर्ते
श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणातील याचिकाकर्ते दिनेश शर्मा म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यानंतर ज्ञानवापी आणि श्रीकृष्णजन्मस्थान येथील बेकायदा बांधकाम काढून घेण्यासाठी मुस्लिमांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. श्रीकृष्णजन्मभूमी येथील अतिक्रमण हटविल्यास न्यासातर्फे मुस्लिमांना मेवात येथे १० एकर जमीन देण्याची तयारी असल्याचेही शर्मा यांनी म्हटले आहे.