हिंद-प्रशांत भागातील चीनचे वाढते वर्चस्व आणि आक्रमकतेने या भागातील अनेक देश चिंतीत आहेत. चीनचा सामना करण्यासाठी हे देश आता एकत्र येतं आपसातील संबंध मजबूत करीत आहेत. २०२० साली गलवान खोर्यातील वादावरून भारत-चीन संबंधही तणावपूर्ण झाले. चीनला रोखण्यासाठी भारतदेखील येथील मित्रदेशांसोबत संरक्षणविषयक भागीदारी करू पाहत आहे. या यादीत व्हिएतनाम या देशाचाही समावेश. व्हिएतनामची भौगोलिक स्थिती महत्त्वाची असून, ती भारतासाठी फायदेशीर ठरणारी आहे.
याच कारणामुळे काही दिवसांपूर्वी भारताने ‘आयएनएस कृपाण’ ही युद्धनौका नौदलातून निवृत्त करून ती व्हिएतनामला भेट म्हणून दिली. विशेष म्हणजे, भारताने कार्यरत युद्धनौका एखाद्या देशाला देण्याची ही पहिलीच वेळ आहे. व्हिएतनाममध्ये आयोजित एका सोहळ्यात भारतीय नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत या युद्धनौकेची हस्तांतरण प्रक्रिया पार पडली. ही हस्तांतरण प्रक्रिया म्हणजे हिंद-प्रशांत भागात व्हिएतनाम भारताचा आवडता संरक्षण भागीदार असल्याचे प्रतीक आहे, असे यावेळी कुमार म्हणाले. दरम्यान, भारताने पूर्णतः कार्यरत असलेली युद्धनौका व्हिएतनामला का दिली, हे जाणून घेऊया.
‘आयएनएस कृपाण’ ही भारताने बनवलेली स्वदेशी युद्धनौका असून, याद्वारे क्षेपणास्त्राचा मारा करता येऊ शकतो. जवळपास ९० मीटर लांब, १०.४५ मी रुंद आणि १ हजार, ४५० टन वजन असलेली ही युद्धनौका १९९१ साली भारतीय नौदलात सामील करण्यात आली. १२ अधिकारी आणि १०० नौसैनिक तैनात असणारी ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी युद्धनौका ३२ वर्षांनंतर नौदलातून निवृत्त झाली. दक्षिण चीन सागर परिसरात चीनच्या वाढत्या हस्ताक्षेपाच्या पार्श्वभूमीवर ही युद्धनौका व्हिएतनामला देणे महत्त्वपूर्ण ठरते. भारत आणि व्हिएतनामचे चीन सोबत फार मधुर संबंध नाहीत. त्यामुळे भारत आणि व्हिएतनाममधील मैत्रीचा नवा अध्याय ही युद्धनौका लिहिणार, यात काही शंका नाही. दक्षिण चीन परिसरात चीनसोबत क्षेत्रीय वाद आणि समुद्री सीमेवरून तणाव आहे. त्यामुळेच भारताने व्हिएतनामला मैत्री स्वरूपात युद्धनौका भेट दिली. यामुळे व्हिएतनामला सतावणारी चीनची चिंता कमी करण्यात आणि चीनची वाढती सैन्य ताकद संतुलित करण्यात मदत होईल. हिंद-प्रशांत क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन व्हायला हवे. तसेच, समुद्री व्यापारात अडथळे आणू नयेत, असे भारत नेहमी सांगत आला आहे.
परंतु, चीनची भूमिका याउलट आहे. त्यामुळे चीनला रोखण्यासाठी येथे मित्रदेश आणि त्यांच्यासोबत सहकार्य वाढवणे भारतासाठी गरजेचे आहे. १९७२ साली भारत आणि व्हिएतनामध्ये राजनैतिक संबंध स्थापित झाले. ज्याला जानेवारी २०२२ मध्ये ५० वर्षे पूर्ण झाली. २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिएतनाम दौर्याने दोन्ही देशांतील संबंधांना व्यापक स्वरूप मिळाले. पुढे डिसेंबर २०२० साली भारत-व्हिएतनाम व्हर्च्युअल शिखर संमेलनाने संबंधांना आणखी गती मिळाली. यामध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही विविध विषयांवर चर्चा केली. मागील वर्षी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्हिएतनामचा दौरा केला होता. यावेळी दोन्ही देशांत अनेक महत्त्वपूर्ण करार झाले. व्हिएतनामला ५० कोटी डॉलरचे संरक्षण कर्ज देण्यासही यावेळी अंतिम रूप देण्यात आले. १२ हायस्पीड गार्ड नौकाही भारताने व्हिएतनामला सोपवल्या.
२०२३ पर्यंत भारत-व्हिएतनाम संरक्षण सहकार्यावर एक संयुक्त लॉजिस्टिक विशेष सहकार्य करार करण्यात आला. हिंद-प्रशांत परिसरात चीन आणि रशियाचे बर्यापैकी प्राबल्य असतानाही भारताने व्हिएतनामसोबत मजबूत संबंध प्रस्थापित केले. अशात भारताने व्हिएतनामला दिलेली युद्धनौका ही अनेक देशांना सूचक इशारा आहे. चीन सध्या अंतर्गत संघर्षाने त्रस्त आहे. जागतिक स्तरावरील दबदबाही कमी होत चालला आहे. त्यामुळे चीन विस्तारवादी भूमिकेकडून रणनीतीद्वारे पुढे चालला आहे. पण, चीनी ड्रॅगनचे मनसुबे आजतागायत कधीही लपून राहिलेले नाही. चीनला अटकाव करणे, अनेक देशांच्या शांतता आणि समृद्धीसाठी आवश्यक असल्याने आता अन्य देश एकत्र येऊ लागले आहेत. भारतानेही चीनला कंटाळलेल्या देशांसोबत मैत्रीचा आणि सहकार्याचा हात पुढे केला आहे. चीनला रोखण्यासाठी आणि जशास तसे उत्तर देताना व्हिएतनामची भारताला मोठी मदत होणार आहे. त्याचे निमित्त ‘कृपाण’ ही युद्धनौका ठरेलं, हे मात्र नक्की...
७०५८५८९७६७
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.