‘साहित्य अकादमी’चा ‘उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार-२०२३’ बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांच्या ‘छंद देई आनंद’ या पुस्तकास नुकताच घोषित झाला. त्यानिमित्त त्यांच्या साहित्यप्रवासाचा घेतलेला वेध...
आपल्या मुलांना शाळेत जाण्यापूर्वी पुस्तकांचं खूप आकर्षण असतं! जुनियरमध्ये जाण्यापूर्वी हातात मिळेल, ते पुस्तक, रोजनिशी, जमल्यास वृत्तपत्र घेऊन ते मिळेल त्या पेन-पेन्सिलने त्यावर रेघोट्या मारतात. ही तर सर्जनाची उर्मी! आपण काहीतरी करू शकतो, समोर तयार झालेले आकार पूर्णपणे आपण तयार केलेले आहेत, हे कौतुक त्यांच्या बाललीलांतून ओसंडत असतं. मग आपण त्यांना चित्रकलेची वह्या-पुस्तकं आणून देतो. या गोल-गोल न तुटणार्या रेघा नक्की काय असतात? शब्दांचं माध्यम अवगत नसल्याने उमटलेल्या भावनाच! मात्र, शब्द शिकताना, वाक्यांकडे पळताना आणि व्याकरणात गुरफटताना, ही पुस्तकांची मैत्री सुटते. ओढ उरत नाही का?
‘चांदोबा’, ’ठकठक’, ’चंपक’ ही मासिकं चित्रकलेच्या वह्यांना वाङ्मयीन पुस्तकांशी जोडणारे दुवे असतात आणि म्हणूनच ती जास्त महत्त्वाची असतात. बालसाहित्याला माध्यमांच्या मर्यादा नाहीत. शब्द, चित्र, काव्य, व्यंगचित्र, छायाचित्र सर्व माध्यमांतून काही सांगता येतं. प्रश्न विचारायची सवय मुलांना असतेच; पण त्या प्रश्नांमागे उत्कंठा तयार व्हायला मदत होते, ती याच ज्ञानतृष्णेने. तरीही समाजाचा बालसाहित्यकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित व्हायची आपण वाटच पाहतोय. नुकतेच ‘साहित्य अकादमी’चे पुरस्कार जाहीर झाले. त्यातला बालसाहित्याचा पुरस्कार मिळाला, तो एकनाथ आव्हाड यांना. त्यांच्याविषयी लिहिलेला हा लेख.
लहानांना समजेल अशा भाषेत कथा, कविता, नाट्यछटा, चरित्र, काव्यकोडी असं विविध प्रकारचं लेखन एकनाथ आव्हाड यांनी केलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत गेली ३० वर्षे ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. कथाकथनाचे ५००हून अधिक कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. कथाकथनाच्या कार्यशाळा त्यांनी घेतल्या आहेत. ’बोधाई’, ’गंमत गाणी’, ’अक्षरांची फुले’, ’शब्दांची नवलाई’, ’छंद देई आनंद’ हे बालकवितासंग्रह, ‘आनंदाची बाग’, ’एकदा काय झालं!’ ‘खळाळता अवखळ झरा’ हे बालकथासंग्रह, ‘मजेदार कोडी’, ‘आलं का ध्यानात?’, ’खेळ आला रंगात’ हे काव्यकोडी संग्रह, ’मला उंच उडू दे’ हा नाट्यछटासंग्रह, ’मिसाईल मॅन’ हे चरित्र त्यांनी लिहिलंय. त्यांच्या कित्येक पुस्तकांचे इतर भाषांत आणि ब्रेल लिपीतसुद्धा अनुवाद झालेले आहेत.
त्यांचं बालपण गावात गेलं आणि त्यानंतर ते मुंबईत आपल्या आईवडिलांसोबत वास्तव्यास आले. आपल्याला वाचनाची आवड लागण्यामागे कुणाचातरी हात असतो, तो इयत्ता सातवीत शिकवणार्या भोसले बाईंचा होता, असे ते म्हणतात. सुरुवातीला लहान गोष्टी मग थोडं मोठ्यांचं साहित्य वाचण्याची सवय लागली आणि त्यांचा वाचनप्रवास बहरत गेला. महाविद्यालयीन काळात समृद्ध झाला.
’डीएड’ला शिकताना पाठ घेण्याची पद्धत असते. त्यावेळी मुलांना गोष्टी सांगताना त्यांना समजले की, आपल्याकडे गोष्टी सांगण्याचे अंग आहे. अनेकांनी याचे कौतुकही केले. पुढे त्यांनी कविता आणि कथांमधून मुलांमध्ये मूल्ये रुजवण्याचे काम चालूच ठेवले आणि त्यातून फार मोठ्या प्रमाणावर बालसाहित्याची निर्मिती झाली. मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या ’संगीत कला अकादमी’च्या संगीत अभ्यासक्रमात त्यांनी लिहिलेल्या चार बालगीतांचा समावेश केला आहे. तसेच, इयत्ता सहावी सुलभभारतीच्या पाठ्यपुस्तकात ’बाबांचं पत्र’, इयत्ता दुसरी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात ’चांदोबाच्या देशात’ ही बालकविता, इयत्ता पहिली बालभारती उर्दू माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात ’शेतकरीदादा’ या बालकवितांचा समावेश आणि ‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या अमराठी भाषिकांसाठी असलेल्या मराठीच्या अभ्यासक्रमात त्यांच्या पाच बालकवितांचा समावेश झालेला आहे.
याव्यतिरिक्त चौथी व आठवीच्या बालभारती स्वाध्याय पुस्तकांच्या लेखन संपादनासाठी पाठ्यपुस्तक मंडळाचे सदस्य म्हणून काहीकाळ ते कार्यरत होते. तसेच, इयत्ता पहिली ते पाचवीच्या पाठ्यपुस्तकांचे लेखन संपादनासाठी पाठ्यपुस्तक मंडळावर सदस्य म्हणूनही कार्यरत होते. बालकथा कोशाच्या आणि बाळकविताकोशांच्या एक ते पाच खंडांत पाच बालकथा व पाच बालकवितांचा समावेश झालेला आहे. माडगूळकर, विजया वाड यांसारख्या अनेक दिग्गजांची कौतुकाची थाप त्यांना मिळाली आहे. आजपर्यंत झालेल्या ऩऊ ‘बालसाहित्य संमेलनां’च्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. गिरगावातील ‘मराठी साहित्य संघा’च्यावतीने तरुणांसाठी दरवर्षी युवा संमेलने ते आयोजित करत असतात.
अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. जोडाक्षर विरहित बालकवितासंग्रह ’गंमत गाणी’ या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा ‘वा. गो. मायदेव राज्य’ पुरस्कार, मराठी भाषेची गोडी लावणारा बालकवितासंग्रह ’शब्दांची नवलाई’ या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा ’बालकवी’ पुरस्कार, मुलेच परीक्षक होऊन पुस्तकाची निवड करतात. अशा अक्षरांची फुले या पुस्तकास भारत विद्यालय बुलढाणा येथील ‘शशिकलाताई आगाशे उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार’, मुलांच्या चित्रांनी सजलेला बालकवितासंग्रह ’तळ्यातला खेळ’ या पुस्तकात आपटे वाचन मंदिर इचलकरंजीचा ‘उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार’ त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच, इतर विविध संस्थांचे ४० पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांनी पुढील काळातही मुलांसाठी मूल्याधिष्टित साहित्यनिर्मिती करावी आणि उद्याच्या समाजाला योग्य दिशा द्यावी, अशी इच्छा व्यक्त करत दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे त्यांना अनेक शुभेच्छा!
मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.