अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहराच्या किनारपट्टीवर मृत समुद्री सिंह आणि डॉल्फिन विक्रमी संख्येने वाहून आल्याची घटना नुकतीच घडली. हे जलचर आजारी पडून, निर्जीव होऊन किनार्यावर वाहून आले. याबाबत स्थानिक शास्त्रज्ञांनी आता चिंता व्यक्त केली आहे. जून महिन्यात सुमारे एक हजारांहून अधिक समुद्री सिंह या व्यतिरिक्त ११० डॉल्फिनदेखील मरण पावले. यामध्ये समुद्रात किंवा चॅनेल बेटांवर मरणार्या जलचरांचा समावेश नाही. या घटना कॅलिफोर्नियाच्या सांता बार्बरा किनार्यापासून दक्षिणेकडे लॉस एंजेलिसमधील सांता मोनिका समुद्रकिनार्यांपर्यंत आणि पुढे ऑरेंज काऊंटीमधील लागुना बीचपर्यंत घडल्याचे वृत्त आहे.
सांता बार्बरा येथील ‘सागरी सस्तन प्राणी बचाव संस्था’, ‘चॅनल आयलंड मरीन अॅण्ड वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट’ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत एका तासाला ३० ते ६० घटना आणि दिवसाला ३००हून अधिक मृत समुद्री सिंह आणि डॉल्फिनच्या नोंदी झाल्या आहेत. मरीन-लाईफ तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, हे मृत्यू समुद्रातील ‘अल्गल ब्लूम’मुळे होत आहेत. ‘अल्गल ब्लूम’ म्हणजे जलचर प्रणालीमध्ये एकपेशीय वनस्पतींच्या संख्येमध्ये झपाट्याने होणारी वाढ. हे मृत्यू ‘स्यूडो-नित्शे’ नावाच्या एका समुद्री एकपेशीय वनस्पतीमुळे होत आहेत. ही वनस्पती ‘डोमोईक अॅसिड’ नावाचे न्यूरोटॉक्सिन तयार करते. हे अॅसिड पोटात गेल्यामुळे, या प्राण्यांना विषबाधा होते आणि ते मृत होऊन किनार्यावर वाहून येतात.
समुद्री पक्षी आणि माशांनी ‘स्यूडो-नित्शे’चे सेवन केल्यामुळे त्यांना विषबाधा झाली. पुढे ते अन्नसाखळी ओलांडून डॉल्फिन, समुद्री सिंह आणि अगदी मोठ्या समुद्री प्राण्यांपर्यंत प्रवास करते. विशेषतः या परिसरात विषाची उच्च पातळी आढळल्यानंतर सांता बार्बरा काऊंटीमधील किनार्यालगत कापणी केलेले शिंपले, क्लॅम किंवा स्कॅलॉप खाऊ नये, अशी सूचना कॅलिफोर्नियाच्या आरोग्य विभागाने जारी केली आहे. ‘कॅलिफोर्निया हार्मफूल अल्गी रिस्क मॅपिंग (सी-हार्म) सिस्टम’द्वारे सांता बार्बराला या घटनांचा ‘हॉटस्पॉट’ मानले गेले आहे. ही प्रणाली समुद्रातील ’डोमोईक अॅसिड’ तयार करणार्या शैवालांचा मागोवा घेते. गेल्या वर्षी अशाच प्रकारच्या घटनांमुळे डझनभर समुद्री सिंह आणि इतर सागरी जीव आजारी पडले होते. गेल्या ३५ वर्षांत, या वर्षी अशाप्रकारच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे.
साधारण जून-ऑगस्ट हे महिने समुद्री सिंहांसाठी विणीचा हंगाम. याच काळात बहुतांश समुद्री सिंह किनारपट्टीलगतच्या समुद्रात वास्तव्यास येतात. हा उद्रेक नैसर्गिकरित्या होत असतो. मात्र, याच्या वाढलेल्या प्रमाणाबाबत शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. अन्नसाखळीच्या तळाशी असलेल्या फिल्टर माशांसाठी समृद्ध पोषक आणि ’फॅटी अॅसिड’ तयार करणार्या महासागरातील अनेक एकपेशीय जीवांप्रमाणे, ‘स्यूडो-नित्शे’ सामान्य परिस्थितीत निरुपद्रवी असू शकतात. परंतु, महासागरातील प्रवाह बदलामुळे एकपेशीय वनस्पतींचे उत्पादन वाढते. परिणामतः ’डोमोईक अॅसिड’चे प्रमाण वाढते, ज्यामुळे हानिकारक परिस्थिती निर्माण होते. काही सागरी जीवसृष्टीवर ’डोमोईक अॅसिड’चा अजिबात परिणाम होत नसला, तरी अन्नसाखळीतील खाल स्तरातील प्राण्यांमध्ये न्यूरोटॉक्सिन जमा होऊ शकते.
फिल्टर मासे हे मुख्य अन्न स्रोत म्हणून शेवाळ खातात. समुद्री सिंह, जे पिल्लांसाठी दूध बनवण्यासाठी किंवा गर्भधारणा टिकवून ठेवण्यासाठी वर्षाच्या या वेळी प्रभावित फिल्टर मासे किंवा इतर जीव भरपूर प्रमाणात खातात. याचाच त्रास होऊन हे समुद्री सिंह मृत्युमुखी पडत आहेत. या वर्षाच्या प्रारंभी प्रकाशित झालेल्या अभ्यासात, २००३ ते २०२० या कालावधीत ५९.२ टक्क्यांंनी वार्षिक सरासरी संख्येत वाढ झाली आहे. या वाढत्या ‘ब्लूम फ्रिक्वेन्सी’चा महासागराच्या तापमानाशी लक्षणीय संबंध आहे. हा उद्रेक नेमका कशामुळे होत आहे किंवा त्यांची तीव्रता का वाढत आहे, याचे उत्तर गुंतागुंतीचे आहे.
महासागराचे पाणी मुख्यतः क्लोराईड, सोडियम, सल्फेट, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियम यांचा समावेश असलेल्या नाजूक रसासारखे दिसते, ज्यामध्ये वनस्पती आणि सागरी जीवनासाठी योगदान देणारे इतर घटक असतात. फॉस्फरस आणि नायट्रोजन जे मुख्यतः वनस्पती आणि एकपेशीय वनस्पतींच्या वाढीस कारणीभूत असतात. कार्बन, बोरॉन, स्ट्रॉन्टियम आणि ब्रोमाईडसारख्या असंख्य इतर पदार्थांसह असतात. तेव्हा, यावर अधिक संशोधन करुन उपाययोजना करणेही तितकेच गरजेचे आहे.