ठाणे : त्रास आणि दुःख सहन केल्यानंतरच सुख येते. केवळ पुस्तकी अभ्यास करून यश मिळत नाही. तेव्हा,पुस्तकी ज्ञानासोबतच अंगी कलाकौशल्य व प्रशिक्षण असेल तरच यश मिळेल. असे मौलिक मार्गदर्शन दै. मुंबई तरूण भारत च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी केले. गुरुपौर्णिमेनिमित्त समतोल फाऊंडेशन, शारदा विद्यालय आणि शिक्षक कर्मयोगी यांच्यातर्फे मागील पाच वर्षांत पुनर्वसन केलेल्या मुलांचा मेळावा सोमवारी ठाण्यातील शारदा विद्यालयात आयोजित केला होता. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन साळवी बोलत होत्या. याप्रसंगी, समतोल फाऊंडेशनचे संस्थापक, सचिव विजय जाधव, खजिनदार एस. हरिहरन, राजेंद्र गोसावी, रविंद्र औटी, शारदा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनिषा जाधव,योग शिक्षिका ज्योती वारुडे, मांजरेकर,भाजपच्या माधुरी मेटांगे,विठ्ठल गाडगीळ आदी उपस्थित होते. यावेळी मनपरिवर्तन केंद्रातील दहा मुलांचे पुनर्वसन करण्यात आले.
गुरुपौर्णिमेनिमित्त ठाण्यात आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन बोलताना योगिता साळवी यांनी, समतोल फाऊंडेशनच्या माध्यमातुन आयुष्याची दिशा लाभलेल्या मुलांनी " मुझे कुछ कहना है" या संवादरूपी उपक्रमाची स्तुती करीत उपस्थित विद्यार्थ्याचे प्रबोधन केले. त्रास आणि दुःख सहन केल्यानंतरच सुख येते. केवळ पुस्तकी अभ्यास करून यश मिळत नाही तेव्हा,पुस्तकी ज्ञानासोबत अंगी कला कौशल्य व प्रशिक्षण असेल, तरच यश मिळेल.असा मौलिक सल्ला दिला. आयुष्यात एकच ध्येय ठरवा ...आणि स्वामी विवेकानंदाप्रमाणे त्या ध्येयप्राप्तीसाठी कार्यरत राहा.असे सांगताना साळवी यांनी, समतोलचा एक प्रकल्प १२ प्रकल्पांमध्ये परावर्तित करणाऱ्या विजय जाधव सरांचे काम अद्वितीय आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले या संतवचनानुसार मार्गक्रमण करीत त्यांनी हजारो मुलांना स्वप्ने दाखवुन प्रत्यक्षात आणल्याचे नमुद केले. यावेळी संतोष वाघे,अक्षय जावळे, आयुष बालुटीया ' अविनाश भुजड आदी विद्यार्थ्यानी मनोगत व्यक्त करून आपले हदयस्पर्शी अनुभव व समतोलच्या दायित्वामुळे जीवन कसे बदलले याच्या गाथा उपस्थितांसमोर उलगडल्या.कलाकार संतोष खानितकर यांनी कंगवा आणि कागदाच्या साह्याने संगीत पेश केले.
श्री स्वामी समर्थ नाटकातील बाल कलाकार हर्ष सुभाष काळे याने गुरुपौर्णिमेचे महत्व बाळबोध भाषेत सांगितले.कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थापक सचिव विजय जाधव यांनी प्रास्ताविकात समतोलच्या कामकाजाची माहिती विषद करून आज समाजात कुणीही अनाथ न राहता स्वनाथ व्हायला हवीत, हे ध्येय संस्थेने बाळगल्याचे स्पष्ट केले.तर, प्रथितयश उद्योजक असलेल्या समतोलच्या एस. हरिहरन यांनी १३ महिने रस्त्यावर काढल्याने त्यावेळी रस्त्यावरील परिस्थितीने सर्व शिकवल्याचे नमुद करीत, आम्ही प्रेरणा देतो, ज्यांना शिकायचे आहे त्यांनी शिकत राहावे...खर्चाची चिंता करू नका. असे आश्वासित केले. तर कार्यक्रमाचे निवेदन राजेंद्र गोसावी आणि दिपाली बागुरे यांनी केले.