स्वामी विवेकानंद कुणाची मक्तेदारी नाही!

    29-Jul-2023
Total Views |
Article On Swami Vivekananda Ideology

‘लोकसत्ता’मध्ये योगेंद्र यादव यांनी शुक्रवार, दि. ७ जुलैच्या अंकात स्वामी विवेकानंदांच्या आडून संघ-भाजपवर हल्ला करणारा, तसेच दि. १६ जुलैच्या अंकात दत्तप्रसाद दाभोळकर यांनी ‘रॉक मेमोरिअल’च्या उद्दिष्टांवरच अप्रत्यक्षपणे प्रश्न उपस्थित केला आहे. त्या लेखांमधील दिशाभूल करणार्‍या मुद्द्यांचे खंडन करुन सत्य वाचकांसमोर आणण्यासाठीचा हा लेखप्रपंच...

दि. ७ जुलै रोजी योगेंद्र यादव यांनी ‘असे स्वामीजी स्वीकारणार का?’ या शीर्षकाचा लेख ‘लोकसत्ता’ मध्ये लिहून स्वामी विवेकानंदांना संघाने विचार जुळत नसूनही ‘हायजॅक’ केले आहे, अशा आशयाचा संघ आणि भाजपवर टीकात्मक लेख लिहिलेला आहे. त्यावर दि. १६ जुलैच्या ‘लोकरंग’मध्ये दत्तप्रसाद दाभोळकरांचा पूर्वीचाच एक लेख ‘स्वामीजींच्या विचारांचे विकृतीकरण कोण करतंय,’ या शीर्षकाखाली स्वामीजींची काही वाक्ये संदर्भरहित पद्धतीने उचलून, त्यात स्वतःची भर घालून स्वामीजींविषयी बरेच गैरसमज पसरविणारी विधाने लिहिलेला लेख छापला आहे. विवेकानंद केंद्राची कार्यकर्ती म्हणून स्वामी विवेकानंद हा पहिल्यापासूनच जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय असल्याने स्वामीजींच्या बाबतीतील आक्षेपार्ह विधाने, त्यांच्या विधानांची मोडतोड करून किंवा त्यांचे चुकीचे अन्वयार्थ लावून त्यांच्याविषयी तसेच ‘विवेकानंद रॉक मेमोरिअल’ संदर्भात गैरसमज पसरविणार्‍या लेखांना उत्तर देणे गरजेचे वाटते. म्हणून हा लेखप्रपंच.

योगेंद्र यादवांनी स्वामीजींच्या बाबतीत खालील आक्षेपार्ह विधाने लिहिलेली आहेत. १) स्वामीजींना आत्मत्याग वगैरे मान्य नव्हता. ते खुलेपणाने धुम्रपान आणि मांसाहार करीत. २) योगसाधना वगैरे करायला त्यांना अजिबात आवडत नसे. त्याचबरोबर योगेंद्र यादव आणि दाभोळकर दोघांनीही स्वामीजींच्या येशू ख्रिस्तासंदर्भातील विधानांचा तसेच सरफराज हुसैन या त्यांच्या मुसलमान शिष्याला लिहिलेल्या पत्रात इस्लामविषयी जे लिहिले आहे, त्यातून स्वामीजींनी इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मांची भलावण केली असल्याचे चुकीचे निष्कर्ष काढलेले आहेत. दोघांचाही होरा स्वामीजींच्या प्रत्यक्ष विधानांचा जसा आहे, तसा परामर्श घेणे, याकडे नसून त्यांचा स्वतःला सोयीचा तो अर्थ काढून त्याद्वारे संघ, हिंदू यांच्यावर टीकास्त्र सोडणे, याकडेच अधिक आहे. दत्तप्रसाद दाभोळकरांनी तर स्वामीजींनी कन्याकुमारी येथील समुद्रात उडी मारलीच नव्हती पासून ते स्वामीजींचे अमेरिकेतून परतल्यावर भारतात स्वागत झालेच नाही, अशी असत्य माहिती लिहिली आहे. वि. रा. करंदीकर यांनी आपल्या ‘तीन सरसंघचालक’ या पुस्तकात जे लिहिलेलं नाहीये, ते त्यांच्या नावावर दत्तप्रसाद दाभोळकर खपवतात. या लेखात मी या सगळ्याचा सप्रमाण समाचार घेणार आहे. त्यासाठी मी प्राध्यापक शैलेंद्रनाथ धर (एस. एन. धर) यांच्या ‘स्वामी विवेकानंद समग्र चरित्र’ या तीन खंडात प्रसिद्ध असलेल्या पुस्तकाचा आधार घेतलेला आहे. हा ग्रंथ अतिशय विस्तृत आणि संदर्भांनी परिपूर्ण विश्लेषणाने युक्त असा आहे.

महाविद्यालयात असल्यापासूनच स्वामी विवेकानंद श्रीरामकृष्ण परमहंसांकडे येत असत आणि त्यांचा गुरू म्हणून स्वीकार करण्याआधी त्यांची तीन वेळा परीक्षाही घेतलेली होती. पण, श्रीरामकृष्णांना पहिल्या दिवसापासूनच नरेंद्र कोण आहे? त्याच्या आयुष्याचं ध्येय काय आहे? या सर्व गोष्टी माहिती होत्या. नरेंद्राचं लहानपणापासूनच उत्तम ध्यान लागत असल्याने, तो पूर्वीपासूनच योगसाधनेत निपुण होता. रामकृष्णांकडे आल्यावर त्याच्या योगसाधनेला एक दिशा मिळाली. रामकृष्णांनी अनेकवेळा त्यांच्या इतर शिष्यांसमोर नरेंद्रमधला आणि त्यांच्यातला फरक काय, हे सांगितले होते. नरेंद्राने आहार-विहारातले कोणतेही नियम पाळले नाहीत, तरी त्याची क्षमता वेगळी असल्याने त्याच्या योगसाधनेत बाधा येणार नाही. पण, तुम्ही सगळ्यांनी आहार-विहाराचे नियम पाळणे गरजेचे आहे.

नरेंद्रला कित्येकवेळा त्यांनी निर्विकल्प समाधीपासून रोखले होते. कारण, त्यांना कल्पना होती की, एकदा का नरेंद्रला स्वतःचे स्वरूप समजले की, तो देहत्याग करेल. स्वामी विवेकानंदांनी परिव्राजक अवस्थेत भारतभ्रमण करताना हठयोगाची साधनादेखील केलेली होती. त्यामुळे स्वामीजींना योगसाधना अजिबात आवडत नसे, या विधानात काहीही तथ्य नाही. तरुण वयात स्वतःचे घर-कुटुंब सोडून संन्यास घेऊन देश बांधवांचे प्रश्न समजण्यासाठी परिव्राजक अवस्थेत हिमालय ते कन्याकुमारीपर्यंत फिरणे याला आत्मत्याग म्हणायचा नाही, तर काय म्हणायचं? स्वामी विवेकानंद हे बंगाली सारस्वत असल्याने मांसाहारी होतेच. अमेरिकेसारख्या अतिशीत हवामानाच्या वातावरणात त्याकाळातील उपलब्धतेप्रमाणे त्यांनी मांसाहार घेतला आणि धुम्रपान केले, तर बिघडले कुठे? याच बरोबर यादवांनी हेदेखील सांगायला हवे होते की, स्वामीजी बहुतांश ठिकाणी जे मिळेल, ते किंवा खिचडी करून खात असत. त्यातून त्यांची संन्यस्त वृत्ती कशातही अडकून न राहण्याची प्रवृत्तीच दिसून येते.

स्वामीजींना अमेरिकेत ‘सर्वधर्म परिषदेसाठी जा’ असे रामनद संस्थानच्या महाराजांनीच सूचविले होते. त्यांनी त्यासाठी त्यांचा पूर्ण खर्च करण्याची तयारीही दर्शवली होती. पण, स्वामीजींनी ती आर्थिक मदत आपण त्यांच्या पैशावर जाऊ म्हणजे, आपण आपल्या देशवासीयांचे प्रतिनिधी म्हणून जाणार नाही. त्यांचे प्रतिनिधी म्हणून जाऊ, या विचाराने विनम्रपणे नाकारली होती. त्यामुळे दाभोळकरांच्या ‘स्वामी विवेकानंदांना कोणीही अर्थसाहाय्य केले नाही’ या विधानात काहीही तथ्य नाही. स्वामी विवेकानंदांना आपल्या गुरुंचा आणि परमेश्वराचा संकेत मिळाल्यावरच त्यांनी सर्वधर्म परिषदेत जाण्याचे ठरविले. त्यावेळी आपण केवळ एका पंथाचे प्रतिनिधी म्हणून जाण्यापेक्षा भारतीय बांधवांकडून निधी गोळा करून त्या निधीवर त्यांचे प्रतिनिधी म्हणून जाऊ, असा विचार करून विविध ठिकाणी व्याख्याने देऊन तसेच अगदी सामान्य देशबांधवांकडून देखील अल्पदेणगी स्वरुपातदेखील निधी स्वीकारला. त्यामुळे ’सर्वधर्म परिषदे’मध्ये भारतीयांचे, सामान्य हिंदूंचे प्रतिनिधित्व करत होते.

अमेरिकेत शिकागोला त्यांची व्याख्याने खूप लोकप्रिय झाल्याने त्यांचे यश अनेक ख्रिस्ती मिशनरी तसेच तिथे उपस्थित काही स्वकियांना रुचले नाही. म्हणून त्यांनी स्वामी विवेकानंदांविषयी गैरसमज पसरवायला सुरुवात केली. त्यातील पहिली अफवा म्हणजे ते हिंदूंचे खरे प्रतिनिधी नाहीत. ते कोलकात्यातील एक अभिनेते आहेत, बहुरूपी आहेत, इ. हे वेगाने पसरवले गेलेले गैरसमज दूर करण्यासाठी स्वामीजींनी आपल्या भारतातील शिष्य आणि हितचिंतकांना भारतात एक परिषद घेऊन त्यात ‘स्वामी विवेकानंद हे आमचे प्रतिनिधी आहेत’ असा प्रस्ताव पास करण्यास सांगितला होता आणि त्याचे वृत्त स्थानिक इंग्रजी वर्तमानपत्रांत छापून आणण्यास सांगून त्याची कात्रणे अमेरिकेत पाठविण्यास सांगितले होते. त्या काळात दळणवळणाची साधने फारच कमी होती. स्वामीजींचा अमेरिकेतील पत्ता त्यावेळी सारखा बदलत होता. त्यामुळे त्यांच्या मद्रासमधील शिष्यांनी तसेच कोलकात्यातील गुरुबंधूंनी अशा परिषदा घेऊन वृत्तांची कात्रणे जरी त्यांना पाठवली, तरी काही ना काही कारणाने ती कात्रणे स्वामीजींपर्यंत पोहोचायला वेळ लागला. पण, स्वामीजींना त्यांच्या देशबांधवांनी काहीही मदत केली नाही, यात काहीही तथ्य नाही.

स्वामीजींना न्यूयॉर्कमध्ये राहत असताना लक्षात आले की, हिंदू धर्म आणि संस्कृती यांविषयी मिशनरी लोकांनी अनेक गैरसमज पसरवून ठेवले आहेत. त्यामुळे त्यांनी हिंदू धर्म, आपली संस्कृती, भारतीय स्त्रिया, वेदांत तत्त्वज्ञान, हिंदू धर्मातील पुनर्जन्माची संकल्पना इत्यादी विषयांवर व्याख्याने दिली. अमेरिकेत त्यांना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, पाश्चात्य देश आणि भारत यांमध्ये ऐहिक समृद्धीसाठीचे ज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान यांची देवाणघेवाण होऊ शकते. त्यांना आपल्या देशातील बांधवांच्या दुरवस्थेची कारणे माहिती होती, तरी परदेशात त्यांनी कायमच आपला देश आणि संस्कृती यांच्याविषयी कधी टीकास्त्र सोडलं नाही. पण, अशा गोष्टी पंडिता रमाबाई, ’ब्राह्मो’ समाजाचे सत्येंद्रनाथ मजुमदार इत्यादींकडून झाल्या होत्या. स्वामीजींना येशू ख्रिस्त एक व्यक्ती म्हणून खूपच आदरणीय होता. पण, ख्रिस्ताच्या अनुयायांनी त्याच्या शिकवणुकीचा मांडलेला बाजार आणि त्याचा केलेला पराभव याविषयीही ते अनेकवेळा बोलले आहेत. त्याकाळातही धर्मांतरे हा प्रश्न होताच आणि सध्याही तो आहेच.

आपल्या देशात ख्रिस्ती मिशनर्‍यांनी आणि मुसलमान कट्टरपंथीयांनी जो धर्मांतराचा उच्छाद मांडला आहे, तो सगळ्यांना माहिती आहेच. स्वामी विवेकानंदांनी धर्मांतराबाबत ‘प्रबुद्ध भारत’ (एप्रिल १८९९) मध्ये छापून आलेल्या त्यांच्या एका मुलाखतीत म्हटले होते की, “हिंदू धर्मातून बाहेर गेलेल्यांना परत हिंदू धर्मात घेतलेच पाहिजे. तसे केले नाही, तर आपली संख्या दिवसेंदिवस कमी होत जाईल.“ फरिश्ता हा प्राचीन मुसलमान इतिहासकार सांगतो की, “मुसलमान पहिल्यांदा या देशात आले, त्यावेळी हिंदूंची संख्या ६० कोटी होती. आज आपण अवघे २० कोटी उरलेलो आहोत. पुन्हा हिंदुत्वातून बाहेर पडणारा मनुष्य हिंदूंची संख्या केवळ एकाने कमी करतो. एवढेच नव्हे, तर शत्रूची एकाने वाढवितो. मद्रासमधील एका भाषणात (समग्र वाङ्मय, खंड चार) ते म्हणतात, “मिशनरी लोक हे हिंदूंची नीतिहीनता, बालहत्या आणि हिंदू विवाहपद्धती यांविषयी जेवढे कमी बोलतील तेवढे चांगले. हिंदू समाजात काही दोष नाहीत, असे मी कसे म्हणेन? शतकानुशतकांच्या आघातांनी या देशात कोणत्या विकृती निर्माण झाल्या आहेत, याची जाणीव माझ्याइतकी क्वचितच कोणाला असेल. इतर देशांच्या तुलनेत हिंदू नीतिमत्ता ही कितीतरी पट श्रेष्ठ आहे. असे खरे तर स्वामीजींनी हिंदू धर्माविषयी जे चांगले विचार मांडले आहेत, त्याचे अनेक दाखले देता येतील. पण, इथे जागेअभावी ते शक्य नाही.

स्वामी विवेकानंद अमेरिका- युरोपातून परतल्यावर बोटीने सर्वप्रथम कोलंबो येथे उतरले. तिथे त्यांचे जंगी स्वागत झालेले होते. तिथून प्रत्येक ठिकाणी त्यांचे सगळ्यांनी स्वागत केले, त्यांच्या स्वागतासाठी मोठमोठ्या सभा झाल्या. त्यात मान्यवरांनी भाषणेही केली आणि त्या स्वागतपर भाषणांना स्वामीजींनी उत्तर देताना भाषणे केली आहेत. हे सर्व आपल्याला ‘कोलंबो ते अल्मोरा’ या पुस्तकात वाचायला मिळते. तसेच, स्वागत सभांचे तपशील एस. एन. धर यांच्या द्वितीय खंडात उपलब्ध आहेत. स्वामी विवेकानंदांची पत्रे यामध्ये स्वामीजींनी इतरांना लिहिलेली पत्रेच किंवा कुणाच्या पत्रांना लिहिलेली उत्तरे दिलेली आहेत. पण, त्यांना आलेली पत्रे उपलब्ध नाहीत. त्यामुळे सरफराज हुसैन यांच्या पत्रातील कोणत्या मजकुरास धरून स्वामीजींनी समतेचा संदेश इस्लामच देतो आणि व्यवहारात उतरवतो, असे लिहिले त्याचा संदर्भ लागत नाही.

त्यामुळे त्या एका पत्रावरून स्वामीजींचे इस्लामविषयीचे मत अमूक होते आणि वेदांताविषयीचे मत तमूक होते, असा निष्कर्ष काढण्यात काहीही हशिल नाही. जर इस्लाम खरंच इतका समतेने आणि सद्भावनेची शिकवण देत असता, तर मुळात शिया आणि सुन्नी हे दोन प्रमुख पंथ पडण्यासाठी कारणीभूत लढाई महम्मदाच्याच पुतण्यांमध्ये झाली नसती. अगदी ताजे उदाहरण म्हणजे, अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यावर तालिबान्यांनी स्थानिक मुसलमानांवर अत्याचार केले आणि त्या भीतीपोटी लोक उडत्या विमानाच्या चाकावर बसून प्रवास करताना हवेतून पडल्याचे व्हिडिओ आपण पाहिले आहेत. सीरियामधील मुसलमान निर्वासितांना कोणत्याही मुसलमान देशाने किंवा अरब देशाने आश्रय दिलेला नाही. उलट ज्या फ्रान्सने मुसलमान निर्वासितांना आश्रय दिला, त्याच फ्रान्सच्या जीवावर, हे मुसलमान उठल्याचे आपण काही आठवड्यांपूर्वीच पाहिलं आहे. मग हीच का यांची इस्लामची समता?

स्वामी विवेकानंदांना कन्याकुमारीच्या समुद्रात पोहत जाऊन रॉकवर जाताना तेथीलच काही मासेमारी करणार्‍या लोकांनी पाहिले होते. त्यांनीच स्वामीजींसाठी तीन दिवस अन्न आणि पाणी रॉकवर ठेवले होते. त्यामुळे स्वामी विवेकानंद रॉकवर गेले होते की नाही, याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नात काहीही तथ्य नाही. सरते शेवटी मा. एकनाथजी रानडे यांनी ‘रॉक मेमोरिअल’ बांधले, त्यामागे फक्त स्वामीजींच्या जन्मशताब्दीचे निमित्त होते. वी. रा करंदीकरांनी आपल्या ‘तीन सरसंघचालक’ या पुस्तकात उल्लेख करताना असे लिहिले आहे की, ज्यावेळी ‘रॉक मेमोरिअल’ समितीने गुरुजींकडे हा विषय मांडला, त्यावेळी गुरुजींनी मा. एकनाथजींना संघकार्यातून मुक्त केले आणि पूर्णपणे त्यांचे आयुष्य स्वामीजींचे स्मृतिस्थान उभे करण्यासाठी द्यावयास सांगितले.

स्वतः गुरुजींना ही एक स्वामीजी आणि त्यांचे गुरु स्वामी अखंडानंद यांच्या ऋणातून मुक्त होण्याची सुवर्णसंधीच वाटली. त्यामुळे दाभोळकरांनी अस्तित्वात नसलेल्या गोष्टींचा उल्लेख दामटून आपल्या लेखात करून विवेकानंद केंद्राच्या मूळ उद्दिष्टावरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. मुळात स्वामीजींचे चांगले विचार आदर्श मानून, ‘शिवभावे जीवसेवा’ हे ब्रीद मानून संघ आपले देशसेवेचे काम वृद्धिंगत करतो आहे. दोन वर्षांनी अत्यंत दिमाखात शतकपूर्ती करताना संघाच्या अखिल भारतीय स्तरावर जवळ-जवळ ४० संस्था विविध क्षेत्रात काम करत आहेत आणि सेवा विषयात काम करणार्‍या संघप्रणित अशा एक हजारांच्या वर संस्था आहेत. स्वामीजींचा विस्तार हेच जीवन आणि संकुचितता हा मृत्यू, हा विचार संघाने व्यवस्थित पचवलेला आहे. त्यामुळे स्वामीजी हे संघाचे आदर्श असण्याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. स्वामी विवेकानंद आणि त्यांच्यासारखे महापुरूष हे काही कोणा एका विचारांची किंवा संघटनेची मक्तेदारी कधीच नव्हती. त्यामुळे स्वामीजींना कुणी ‘हायजॅक’ करण्याचा प्रश्नच येत नाही. हे यादव आणि दाभोळकर यांनी लक्षात घ्यावे आणि गैरसमज पसरविणारे लेखन टाळावे.

डॉ. अपर्णा लळिंगकर
aparnalalingkar@gmail.com