दि. १९ जानेवारी १९७२ रोजी अरुणाचल प्रदेशचे नामकरण करून या राज्याला प्रारंभी केंद्रशासित प्रदेश म्हणून दर्जा देण्यात आला. (पुढे २० फेब्रुवारी १९८७ रोजी अरुणाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त झाला.) या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अरुणाचल प्रदेशच्या ५० वर्षांच्या प्रवासावर प्रकाश टाकणार्या ‘अरुणाचल : एक सफरनामा’ या नाटकाची निर्मिती कऱण्यात आली आहे. ‘अरुणाचल रंग महोत्सव’ निमित्ताने भारताच्या प्रमुख चार शहरांत हे नाटक सादर करण्यात येत आहे. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या विद्यार्थ्यांनी यानिमित्त ‘अरुणाचल : एक सफरनामा’ हे नाटक दि. २६ जुलै रोजी बुधवारी मुंबईतील प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिर येथे सादर केले. या नाटकात अरुणाचल प्रदेशचा इतिहास, सामाजिक परिस्थिती, समज-गैरसमज आणि संस्कृतीवर भाष्य करण्यात आले आहे. तेव्हा, या नाटकाच्या माध्यमातून अरुणाचलच्या अद्भुत संस्कृतीचा झालेला हा अल्प परिचय...
'कोण आहेस तू? तुझी ओळख काय? तुझ्या अस्तित्वाचा अर्थ काय?’ हे प्रश्न कानावर आले, तर आपली प्रतिक्रिया काय असेल? रंगमंचावर झोपलेल्या एका मुलाला स्वप्नात हे प्रश्न आठवतात आणि तिथून नाटकाची सुरुवात होते. पण, खरंच आपल्याला साधे वाटणारे हे प्रश्न अरुणाचल प्रदेश येथील आजच्या रहिवाशांसाठीही तितकेसे सोपे नाहीत. टोळ्यांतून राहणार्या या जमातींना त्यांच्या स्वतंत्र भाषा आहेत, प्रथा-पद्धती आहेत, मूल्य आहेत, तत्त्व आहेत. आजच्या ‘अरुणी’ मुलांना आपल्या आईवडिलांच्या भाषा येत नाही. काळाच्या प्रवाहात ही विविधता कुठेतरी हरवतेय का, ही भीती त्यांना सतावताना दिसते.
भारतात सूर्याची किरणे ज्या भागावर प्रथम पडतात, त्या अरुणदेवाच्या छायेखालचा तो अरुणाचल! १९७२ साली केंद्रशासित प्रदेश म्हणून इंदिरा गांधींनी घोषित करून या प्रदेशाचे नामकरण केले. असा हा अरुणाचल प्रदेश आज अनेक आघाड्यांवर लढत देतोय. गरिबीशी, अंतर्गत कोलाहलाशी आणि व्यसनाधीन तरुणाईशीसुद्धा. त्यातच या भूभागावर डोळे गढून बसलेला चीनसारखा शेजारी! भारताचे अरुणाचलवासीयांशी असलेले संबंध आणि भारतीयांचे अरुणाचल वासीयांशी असलेले संबंध यात तफावत दिसून येते. आजही ‘तू चिनी आहेस का,’ असा अगदी सहज वाटणारा प्रश्न उर्वरित भारतीयांकडून पूर्वोत्तरच्या नागरिकांना उपहासाने विचारला जातो. साहजिकच अशा प्रश्नांचा, हेटाळणीचा अरुणाचलवासीयांवरही नकळत मोठा प्रभाव पडतो. हा सर्व तणाव या नाटकाच्या अगदी सुरुवातीच्या भागातच स्पष्ट जाणवतो.
अनेक घटना दाखवून अरुणाचलकडे पाहण्याचा आपला एक दृष्टिकोन तयार झाला की, नाटक मुख्य कथानकात शिरकाव करते. ’तकर’ नावाच्या एका मुलाची ही कथा आहे. त्याचे आईबाबा टोळीतील इतरांचा विरोध पत्करून त्याला श्लोन्ग (शिलाँग) मध्ये उच्च शिक्षणासाठी पाठवतात. एका खांद्यावरून गुंडाळलेलं एक विटकं फटकूर आणि हरवलेली नजर असलेला हा मुलगा रंगीबेरंगी कपडे घातलेल्या मुलामुलींच्या घोळक्यात येऊन पडतो. महाविद्यालयाची उंच इमारत, वाहनांचे आवाज यात गोंधळलेला तकर रुळतो आणि आपली टोळी विसरतो! काही वर्षांनी आपल्या मैत्रिणीसोबत नृत्य करत असताना असताना त्याचा टोळीबांधव येतो, तेव्हा तकर त्याला ओळखही दाखवत नाही. शेवटी त्याच्या मैत्रिणीच्या मध्यस्थीने बोलणं होतं आणि ते तिघेही शहरातून अनेक भेटवस्तू घेऊन वस्तीवर परततात. या तिघांना बघूनच घाबरलेले त्यांचे आईवडील रेडिओ आणि विजेरीला भीतात, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटत नाही. हा रेडिओ त्यांना पुन्हा शिलाँगला खेचून नेतो, जिथे नव्या राज्याची घोषणा केली जाते. नाटक इथे संपतं.
या नाटकाचं कथानक तसं पाहिल्यास अगदी सरळ आहे. पण, यात जवळपास ५० वर्षांत झालेली सर्व स्थित्यंतरं स्पष्ट दिसून येतात. बदलणार्या केशभूषा, वेशभूषा, आणि त्याहीपेक्षा स्पष्ट दिसून येतात, ते अरुणाचलवासीयांचे बदललेले विचार. स्त्री-पुरुषांचे एकमेकांशी असलेले खेळीमेळीचे संबंध मात्र पूर्वीपासून तसेच आहेत. तेवढेच निखळ. भांडताना, चिडताना, बोलताना भेटताना त्यांचा अविर्भाव, त्यातून व्यतीत होणार्या भावना आणि आपलेपणा... नातेसंबंधांच्या गोष्टी, समाजातील स्त्रीचं स्थान, पुरुषाचं स्थान, त्यांना मिळणारी मोकळीक हे सर्व या प्रयोगातून आपल्या डोळ्यासमोरून सरकतं.
एखादी नवी गोष्ट आपल्यासमोर येते, तेव्हा आपली प्रतिक्रिया काय असते? आपण त्या क्रांतीकडे कसं पाहतो? कसं स्वीकारतो? नव्या वस्तूचा स्वीकार, ते आपलं त्यावर असलेलं अवलंबित्व, यातला प्रवास आपण पाहतच नाही. आपल्या केवळ विचारपद्धतीतच नाही, तर आपल्या असण्यात आमूलाग्र बदल होतो. नाटकाचा परिचय देताना केवळ काय पाहिलं, याबद्दल सांगून तो पूर्ण होणार नाही, तर नाटकाचे लेखक दुयू ताबीओ आणि दिग्दर्शक रिकेन नाग्मोल यांनी त्याबद्दल काय म्हंटलं तेही विचारात घ्यायला हवं. रिकेन ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चा विद्यार्थी आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आज तो मुलांना अभिनय शिकवतो. अभिनय शिकवण्यामागे केवळ अर्थार्जन हा हेतू नाही, तर त्याच्या प्रदेशाची, खारगा जमातीची आणि इतर जमातींच्या व्यथा त्याला दिसतात. त्यांना व्यासपीठ मिळावं म्हणून आपल्याकडून प्रयत्न व्हावेत, म्हणून हा सगळा खटाटोप. अभिनय हे त्याचं माध्यम असल्याने संस्कृती संवर्धनाचे प्रयत्न त्याला अभिनयाच्या माध्यमातून करायचे आहेत. पूर्वजांची जीवनपद्धती नव्या पिढीकडे वारसा म्हणून जावी, यासाठी तो प्रयत्नरत आहे. नाटकांच्या माध्यमातून मूल्य, तत्त्व कोवळ्या वयाच्या मुलांवर बिंबवण्याचा त्याचा प्रयत्न खरंच कौतुकास्पद.
दुयूची गोष्टच वेगळी. त्याला संपूर्ण भारत सांधायचाय. ‘तू चिनी आहेस का?’ या एका वारंवार विचारल्या जाणर्या प्रश्नाने त्याचे कित्येक दिवस नैराश्यात गेले. त्यातून चीनविषयी वाटणारा द्वेष आणि आपल्या माणसांकडूनच नाकारले गेलो असल्याची भावना... जेव्हा त्याला कळलं की, हे प्रश्न कुत्सित नाहीत, स्वाभाविक आहेत, तेव्हा भारताकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलून गेला. मुंबईतील रसिकांबद्दल त्याला आत्मीयता वाटली. तो म्हणतो, “चार वेगवेगळ्या शहरांत प्रयोग करताना मुंबईत प्रयोग ठरला, इथे आलो आणि ही माणसं वेगळी वाटलीच नाहीत, आपलीच आहेत असं वाटतं.” सुनील देवधर यांनी प्रचारक असताना ‘माय होम इंडिया’ संस्थेची स्थापना केली होती. त्यांचा प्रतिनिधीसुद्धा नाटक पाहायला आला होता. संस्थेचे कार्य आणि उद्दिष्टे सांगत, त्यांनी मुंबईतील स्थायिक पौर्वात्य राज्यांतील सर्व बांधव कशाप्रकारे एकत्र राहून आपली विविधता जपत आहेत, हे सांगितले. तीन घंटा, पडदा, नेपथ्य वगैरे कसलाही घाट न घालता थेट नाटकाला सुरुवात झाली.
गंभीर विषयाला विनोदी शैलीत आणि मुख्य म्हणजे एका लयीत सांधण्याचे रिकेन या दिग्दर्शकाचे कौशल्य वाखाणण्याजोगेच म्हणावे लागेल. नाटकाच्या नेपथ्याचे कौतुक. तिसरी घंटा, पडदा किंवा सामानसुमान असा कसलाही गोंधळ नाही. पार्श्वभागी एक स्क्रीन लावून सर्व प्रकारचे वातावरण केवळ त्या डिजिटल पडद्यावरून सरकते. कलाकारांची चपळाई मात्र मराठी रंगभूमीच्या तुलनेत डावीच! अर्थात, सर्वच कलाकार अभिनयाचे शिक्षण घेतलेले नव्हते. संवादफेक आणि संभाषणातील चापल्य वाखाणण्याजोगं. स्थानिक वातावरणाचा परिणाम आवाजावरही दिसून येतो.
भाषेचा लहेजा आणि आवाज दोन्ही काहीसे उच्च पट्टीत. शब्दांची अनवट वळणं मोहात पडतात. संपूर्ण प्रयोग हिंदीत केला असला तरीही ही ‘अरुणी-हिंदी’ ऐकत राहावी अशी! सर्वच कलाकार त्यातही विशेषतः मुली म्हणजे बाहुल्याच! कमालीच्या सुंदर, नाजूक आणि तेवढ्याच बोलक्या डोळ्यांच्या. कलाकारांनी रंगमंचच नव्हे, तर संपूर्ण नाट्यगृहाचा उत्तम वापर करवून घेतलेला. दोन्ही बाजूंनी असणारा तीन विंगांचा रंगमंच केव्हाच मागे पडला आहे. ही प्रेक्षकांना दिसणारी सर्व जागाच आमची, तिचा पुरेपूर वापर करून एक सुंदर नाट्यानुभव रसिकांना देण्यास आम्ही बांधील आहोत, अशा अविर्भावात सर्वच कलाकार प्रेक्षकांमधून वावरत होते. त्यासाठी वेगळ्या प्रकाशयोजनेची व्यवस्था केली होती.
प्रयोगात दोन संगीतबद्ध केलेली स्थानिक भाषेतील गीते आहेत, त्यावर पारंपरिक नृत्ये आहेत. तशीच नव्या वळणाची नृत्येही आहेत. जवळपास दोन तासांची एकांकिका झाली, तरीही कंटाळा येत नाही. तोचतोचपणा, रटाळपणा कुठेही जाणवत नाही. प्रयोगाच्या शेवटाला ‘वंदे मातरम्’ म्हणत शाळेच्या गणवेशात हातात झेंडे घेऊन मुलं समोर उभी राहतात, तेव्हा आतापर्यंत वाटत राहिलेला परकेपणा क्षणार्धात पळून जातो. ‘परकेपणा’ हा शब्द जाणूनबुजून वापरण्याचं कारण म्हणजे, भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक विविधता आहे की जिचा परस्पर संबंध असला तरीही आपल्याला ती अनोळखीच वाटते. ‘कोण आहेस तू? तुझी ओळख काय? तुझ्या अस्तित्वाचा अर्थ काय?’ या प्रश्नांचा अर्थ आत्ता लागतो. उत्तरं नसतातच! आपल्या अस्तित्वाची ओळख आपण केवळ जपून ठेवायची नसतेच, आपलं मी पण असं खुलवत न्यावं, समृद्ध करावं, नव्या ओळखी निर्माण कराव्या. जगाशी जोडलं जावं. हे होण्याची गरज आहे. अजूनही!
मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.