विद्यार्थी घडविता-घडविता साहित्यविश्वात अनोखी प्रकाशवाट शोधणारे प्रकाशक प्रा. डॉ. संतोष लक्ष्मण राणे यांच्याविषयी...
प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती असते, जिच्यामुळे त्या व्यक्तीचे आयुष्य आमूलाग्र बदलून जाते. अशाच प्रकारे हजारो विद्यार्थी, लेखक, मैत्र, सहकारी आदींच्या आयुष्यात परिवर्तन घडवणारे अमृतमयी व्यक्तिमत्त्व असलेल्या ठाण्यातील प्रा. डॉ. संतोष राणे यांचा जन्म मुंबईतील सांताक्रूझ येथे १९७२ साली झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण महापालिकेच्या शाळेत झाले. राणे यांचे वडील गिरणी कामगार होते. एका नामांकित गिरणीमध्ये मोठ्या पदावर ते कार्यरत होते. नोकरी सांभाळत त्यांनी जोपासलेली वाचनाची आवड संतोष यांच्यामध्ये बालपणापासूनच रुजली. मुंबईत बैठ्या चाळीत शेजारच्या काकूंनी सुरू केलेल्या ग्रंथालयाचे सभासदत्व वडिलांनी त्यांना घ्यायला लावले अन् तेव्हापासून त्यांची पुस्तकांशी मैत्री जडली.
सर्व काही सुरळीत सुरू असताना एकाएकी गिरण्यांचा संप झाल्याने त्याचा फटका राणे कुटुंबीयांनादेखील बसला. तेव्हा कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी वडिलांच्या जोडीने संतोष यांची आईही ठामपणे उभी राहिली. संतोष यांनीही घरची आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी लहान वयातच आपल्यापरीने हातभार लावला. फूलवाल्याकडे हार बनवणे, लॉटरीची तिकिटे, अगरबत्ती विकण्याचे काम त्यांनी केले. हे करत असताना त्यांनी शिक्षण आणि साहित्याची कास मुळीच सोडली नाही. आवडती पुस्तके वाचून अनेक साहित्यिकांना अभिप्रायासाठी पत्रे लिहिण्याबरोबरच घरची जबाबदारीही सांभाळली.
पुढे शिक्षणाच्या निमित्ताने ते ठाण्यात स्थलांतरित झाले. तेव्हाही शिक्षण घेत असताना घरोघरी वर्तमानपत्रे टाकण्यापासून मिळेल ती कामे केली. ज्ञानसाधना महाविद्यालयातून पदवी मिळवल्यानंतर मुंबई विद्यापीठातून ‘एमए’ केले. दरम्यानच्या काळात विविध वृत्तपत्रातदेखील संतोष यांनी काम केले. सेवासदन उल्हासनगर येथून त्यांनी ‘बीएड’ झाल्यानंतर १९९७ साली ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पोटापाण्याची सोय झाली होती, तरीही शिकण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. महाविद्यालयात विद्यादान करीत असताना सेंट झेवियर्समधून पत्रकारितेचा कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेचा अभ्यासक्रमदेखील पूर्ण केला. ’सेट’ सारखी कठीण परीक्षा ते उत्तीर्ण झाले. नुकतीच त्यांनी सर्व जबाबदार्या आणि कर्तव्य सांभाळत जोशी-बेडेकर महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाचा ’एमएसीजे’ (मास्टर इन जर्नालिझम अॅण्ड कम्युनिकेशन) पूर्ण केले. ’लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या केसरी वृत्तपत्रातील निवडक अग्रलेखांचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर संशोधन करून विद्यावाचस्पती (पीएचडी ) पदवी प्राप्त केली.
आईवडिलांचे आशीर्वाद, पत्नी, मुलगा तसेच अनेकांनी त्यांच्या वाटचालीत साथ सोबत केली. प्रा. प्रवीण दवणे, प्रा. प्रदीप ढवळ, कवी राम कदम, प्रा. मोहन पाठक, संजय चोणकर यांसारख्या अनेकांनी त्यांना वेळोवेळी उत्तम संस्कार करीत मार्गदर्शन केले. या सर्व प्रवासात ’विद्या प्रसारक मंडळा’चे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक यांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन फार मोलाचे ठरल्याचे ते आवर्जून नमूद करतात.
सध्या ठाण्याच्या जोशी बेडेकर कला-वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागप्रमुखपदाची जबाबदारी सांभाळत असलेले विद्यार्थीप्रिय राणे सर त्यांच्या ’शारदा प्रकाशन संस्थे’चे संस्थापक प्रकाशक आहेत. एका विख्यात प्रकाशन संस्थेत नोकरी करत असताना प्रकाशन व्यवसाय कसा करावा, कसा हाताळावा, हे शिकून घेतले होते. त्यांच्या अभ्यासू आणि समोरच्याला आश्वस्त करण्याच्या स्वभावाने अनेक लेखक, लेखिकांनी त्यांना पुस्तक प्रकाशित करण्याविषयी विचारणा केली. त्याकरिता नवोदितांना व्यासपीठ खुले करून देण्याच्या ध्येयाने त्यांनी ‘शारदा प्रकाशन’ या संस्थेची निर्मिती केली. प्रकाशन संस्थेचा वटवृक्ष त्यांनी त्यांच्या मातोश्रींच्या नावे रुजवला आहे.
संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, मल्याळम आणि तेलुगू भाषेत एक हजारपेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, एकाच वेळी २५ पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. लेखक-कवींना प्रकाशवाट दाखविणारा प्रकाशक असे कौतुक कविवर्य मंगेश पाडगावकरांनी एका कार्यक्रमात केल्याचे ते सांगतात. महाविद्यालयात सहप्राध्यापक आणि मराठी विभाग प्रमुख अशी जबाबदारी सांभाळत ते ग्रंथ प्रकाशन आणि ग्रंथ वितरण क्षेत्रातही आपले योगदान देत असून, ते एक उत्तम निवेदकही आहेत. अनेक राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक कार्यक्रमांचे यशस्वी निवेदन त्यांनी आतापर्यंत केले आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रासह राजकारण्यामध्येही ते परिचित आहेत.
प्रा. राणे यांच्या या कार्याचा आतापर्यंत अनेक संस्थांनी गौरव केला आहे. ’सहजीवन फाऊंडेशन’तर्फे ’ग्रंथमित्र पुरस्कार’, ’एकता कला अकादमी’तर्फे ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’, ठाणे महापालिकेचा ’ठाणे गुणीजन’, नाशिकचा ’साहित्य सेवा पुरस्कार’, ’आदर्श शिक्षक, ‘सांदीपनी पुरस्कार’ अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अशा या हरहुन्नरी, साहित्य सेवेसाठी आणि ज्ञानदानासाठी सदैव तत्पर असलेल्या डॉ. प्रा. संतोष राणे यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
९३२००८९१००
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.