रंगकर्मी महानुभाव प्रा. धनंजय वर्मा यांच्या अमर कलास्मृती...

    28-Jul-2023
Total Views | 134
Article On Prof. Dhananjayasingh Verma

प्राध्यापक धनंजयसिंह गुलाबसिंह वर्मा (राजपूत) उपाख्य प.पू.महंत कुलभूषण वैद्यराजबाबा यक्षदेव महानुभाव यांचे गुरुवार, दि. २० जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या रूपाने एक ज्येष्ठ चित्रकार, अनुभवी कलाशिक्षक, प्रगल्भ व्याख्याता आणि महानुभाव अनुयायी इहलोकीची यात्रा संपून गेला. त्यांच्या कलाप्रवासाचा आढावा घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा हा लेख...

खरं म्हणजे एखादी व्यक्ती ही केवळ व्यक्ती न राहता, जेव्हा ’विचारप्रवाह’ बनते, तेव्हा अशा व्यक्ती केवळ जडदेहाने जरी आपल्यात नसल्या तरी त्या त्यांच्या विचारांनी आणि कलाकृतींनी अजरामर असतात. प्रा. धनंजय वर्मा सर हे पेशाने, चित्रकार आणि विचाराने, साधक-अनुयायी म्हणून कायम स्मरणात राहणारे व्यक्ती! त्यांच्या निधनाने मराठवाडा-विदर्भासह कलाजगताला दुःख झाले. त्यांच्या स्मृती जागवतांना, त्यांच्या जीवनकार्याचा आपण मागोवा घेऊया.

रंगसाधनेच्या प्रवासातून परमेश्वराला शोधत, महानुभाव पंथातील अध्यात्माचा परिसस्पर्श ज्यांना लाभला, असे प्रा. धनंजय वर्मा यांचे व्यक्तिचित्रण अत्यंत प्रभावी होते. त्यांच्या रंगातील ‘सोबर’पणा त्यांच्या स्वभावात आणि विचारातही होता. सालस, शांत आणि विचारपूर्वक बोलण्याची त्यांची शैली, त्यांच्या रंगलेपनातही दिसायची.

परतवाडा जवळील वागेडा शुक्लेश्वर येथे ते श्री दत्तमंदिर संस्थानचे संचालक म्हणून कार्य करायचे. त्यांनी महानुभाव अनुयायी म्हणून जीवनाची सांगता केली. अचलपूर येथील अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलनाध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. दि. १८ जानेवारी, १९४६ला, वागेडा शुक्लेश्वर येथे जन्म झालेल्या धनंजय यांची कलेकडील गती त्यांना ’व्यक्तिचित्रणकार’ या उपाधीपर्यंत घेऊन गेली. त्यांचे शालेय शिक्षण, कलानिकेतन आणि भारतीय विद्यालय अमरावती येथे पूर्ण झाले. पुढे कलेतील उच्च शिक्षणासाठी त्यांनी १९६३ला मुंबईच्या सर जे. जे. स्कूल येथे प्रवेश घेतला. १९६८ला ते जी. डी. आर (रेखा व रंगकला) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यावेळी ते महाराष्ट्रात सर्वप्रथम आले. त्यामुळे त्यांना १९६८-६९ साली ‘फेलोशिप’ प्राप्त झाली. स्नातकोत्तर ‘म्युरल डेकोरेशन’ ही महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्तीही त्यांना मिळाली.

दृश्यकला शिक्षणात ते ’ललितकला पारंगत’ M.F.A. (Portrait PTG) प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. दृश्य कला शिक्षण घेताना त्यांना, प्रा. डी. जी. संगवई, प्रा. सुखडवाला, प्रा. विश्वनाथ सोलापूरकर, प्रा. संभाजी कदम, प्रा. बाबुराव सडवेलकर, प्रा. शंकर पळशीकर अशा महान कलाधुरीणांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. प्रा. वसंत परब यांनी लिहिलेल्या ‘बसचे तिकीट’ या नाटकातील भूमिकेमुळे अमोल पालेकरसारखा मित्र त्यांना लाभला. प्रा. प्रभाकर कोलते, प्रा. काशिनाथ साळवे यांची कलामैत्री जगजाहीर होती. कला शिकत असतानाच त्यांच्या व्यक्तिचित्रणाला ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चे बक्षीस मिळाले. डॉली कस्टरजी स्पर्धेतही त्यांची कलाकृती पारितोषिक पात्र ठरली. उषा देशमुख सुवर्णपदकही त्यांच्या कलाकृतीला मिळालेले होते. त्यामुळे मुंबईच्या कलाक्षेत्रात त्यांचे नाव चर्चेला आले.

त्यांच्या व्यक्तिचित्रणातील सौंदर्य, ड्रॉईंग्ज, बोल्ड पॅच आणि छाया भेदाचं आपसूक दर्शन ही वैशिष्ट्ये केवळ साधकाला साधता येतात, जे प्रा. धनंजय वर्मा सरांना ’ओळख’ देऊ शकले. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कला विषयक योगदानाची नोंद घेऊन त्यांना, ’राज्य कला पुरस्कार‘ दिला. महाकौशल कला परिषद - रायपूर, दक्षिण सांस्कृतिक केंद्र - नागपूर, हैद्राबाद आर्ट सोसायटी, ललितकला अकादमी - नवी दिल्ली अशा विविध ठिकाणच्या प्रदर्शनांमध्ये त्यांच्या कलाकृतींना प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

रंगछटा, छायाभेद दोन वा अनेक रंगांची मिश्रणे करूनही, एक प्रकारचा ताजेपणा आबाधित ठेवण्याची त्यांची शैली अक्षरशः अद्भुत आणि थक्क करणारी होती. व्यक्तिचित्रणाचे वेळी त्या व्यक्तीच्या चेहर्‍यावरील आणि मनातील भाव शोधून ते रंगबद्ध करण्यासाठी त्यांनी त्यांच्या अध्यात्मिक ऊर्जेचा अत्यंत चपखळपणे उपयोग केला आणि हेच त्यांच्या व्यक्तिचित्रणाचे वैशिष्ट्य ठरावे.

त्यांच्या व्यक्तिचित्रणाद्वारे त्यांची लवचिक बुद्धिमत्ता आणि संंवेदनशीलता यांचे दुर्मीळ संयोजन करून साधलेली समृद्ध - भावनिकता पाहताना, जाणकार कलारसिक, दिग्मुढ व्हायचा. त्यांच्या जाण्याने, कला क्षेत्राचे नुकसान तर आहेच; परंतु महानुभाव अनुयायांचा एक सद्शील, साधुत्वाला पोहोचलेला संत आज आपल्यातून निघून गेला, अशी भावना सर्व अनुयायांमध्ये आहे.
त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...

प्रा. डॉ. गजानन शेपाळ
८१०८०४०२१३
अग्रलेख
जरुर वाचा
लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रतापचा बिहार पोलिसांनी मोडला माज, विना हेल्मेट प्रवास केल्याने फाडले चलन

Tej Pratap Yadav जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादवचे थोरले पुत्र आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांच्यावर बिहार पोलिसांनी कारवाई दाखल केली आहे. त्यांनी विनाहेल्मेटचा वापर करत दुचाकी वाहन चालवल्याने पाटणा पोलिसांनी दंडत्मक कारवाई केली आहे. एवढेच नाहीतर ज्या पोलिसाला धुलीवंदना दिवशी नाचण्यास भाग पाडले होते त्यानाही त्या ठिकाणी उपस्थि राहण्यास सांगितले. पटणाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजीव मिश्रा म्हणाले की, संबंधित अपमानित पोलिसाला त्या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले होते. बिहार पोलिसांनी याविरोधात कारवाई ..