योग्य नामांकन कसे करावे?

    27-Jul-2023   
Total Views |
article on nomination


आपल्या मालकीचं घर, जमीनजुमला, दागदागिने, रोख रक्कम, गुंतविलेले पैसे हे ज्याचे आहेत, त्याच्या पश्चात कोणाकडे जावेत, यासाठी नामांकन अवश्य करावे. बर्‍याच गुंतवणूक पर्यायाच्या फॉर्मवर ‘नॉमिनेशन’ची माहिती भरण्यास सांगितलेली असते, ती अवश्य भरावी. तो फॉर्म कोरा ठेवू नये. जर नामांकन केलेले असेल, तर तुमची संपत्ती सहजतेने ‘नॉमिनी’ला मिळू शकेल. जर नामांकन केलेले नसेल, तर संबंधित वारसाला पैसे मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.

 
आपली जमापुंजी, मालमत्ता आपल्यानंतर आपल्या वारसांना किंवा आपल्या मर्जीनुसार योग्य व्यक्तीच्या हाती गेली पाहिजे, यासाठी ‘नामांकन’ करणे महत्त्वाचे आहे. यासाठी संपत्तीधारकाने योग्यवेळी कार्यवाही केली पाहिजे. हे जर केले नाही, तर त्याचा त्रास आपल्या जवळच्या माणसांना/नातलगांना होऊ शकतो. कोणाही व्यक्तीचा आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे, मालमत्ता व्यवस्थापन. एखाद्याने संपूर्ण आयुष्यभर परिश्रम करून जमविलेल्या सर्व मालमत्तेची व्यवस्थित नोंद करावयास हवी. याचबरोबर आपल्या पश्चात सर्व मालमत्ता योग्य व्यक्तीकडे विनासायास कशा हस्तांतरित होतील, यासाठी नामांकन करणे, हेच मालमत्ता व्यवस्थापन! बरेच जण हे करीत नाहीत म्हणून बँकांकडे करोडो रुपयांच्या ठेवी ‘अनक्लेम्ड’ (णपलश्ररळाशव) म्हणून पडून आहेत. अशा ठेवी सार्वजनिक उद्योगातील बँकांना ‘रिझर्व्ह बँके’कडे वर्ग कराव्या लागतात. फेब्रुवारी २०२३ पर्यंतच्या अशा वर्ग केलेल्या ठेवींचे प्रमाण ३५ हजार, १२ कोटी रुपये इतके होते. संपत्तीदाराने त्याच्या आर्थिक मालमत्ता कुटुंबातील योग्य व्यक्तींपर्यंत लवकरात लवकर तसेच कायदेशीर प्रक्रियेमध्ये न अडकता पोहोचावी, याची दक्षता प्रत्येकाने घ्यावयास हवी.

नामांकन करणे म्हणजे आपल्या खात्यातील रक्कम किंवा ठेवी आपल्या पश्चात कोणाला मिळावी, याविषयी संबंधित संस्थेला/किंवा जिथे गुंतवणूक केली आहे तेथे निर्देश देणे. नामांकन लेखी स्वरुपात करावे लागते. नामांकन हे वैयक्तिक ठेवी, गुंतवणुकींसाठी प्रामुख्याने केले जाते. एकाच्या नावे खाते असो किंवा संयुक्त खाते असो, त्याकरिता नामांकन करता येते. बर्‍याच गुंतवणूकदारांना असे वाटते की, आमचे संयुक्त खाते आहे व खाते चालविण्यासाठी बँकेला सहा ‘आयदर ऑर सर्व्हायवर’ अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे संयुक्त खात्यातील एकाचा मृत्यू झाला तरी दुसरा खातेदार खाते चालवू शकतो. पण, समजा मोठा अपघात होऊन एकाचवेळी दोघंही खातेदार मृत्युमुखी पडले तर काय? त्यामुळे ‘आयदर ऑर सर्व्हायवर’ सूचना असल्यामुळे नामांकन नको, हा चुकीचा विचार डोक्यातून काढून टाकावा. ‘प्रोपरायटरशीप’ कंपनीमध्ये एकच व्यक्ती व्यवसाय सांभाळत असल्यानेे अशा खात्यांसाठी नामांकन करावे. लॉकरसाठीही नामांकन करता येते.

भागीदारी कंपन्या, मर्यादित दायित्व भागीदारी कंपन्या आदींसाठी नामांकनाची सुविधा उपलब्ध नसते. कोणतेही खाते उघडताच नामांकन करावे. खाते उघडताना नामांकन करायचे नसल्यास फॉर्मवर तसे लिहून त्याखाली सही करावी लागते. खाते उघडताना नामांकन केले नाही, तर नंतर ते कधीही करता येते. नामांकन करणे म्हणजे त्या व्यक्तीचे नाव वय व पत्ता देणे. सज्ञान नसलेल्या व्यक्तीलाही ‘नॉमिनी’ करता येते. नामांकनाचे नियमितपणे पुनरावलोकन करावे. बदलत्या परिस्थितीनुसार नामांकनात कधीही बदल करता येतात. नामांकनात बदल करताना अगोदरच्या ‘नॉमिनी’ची संमती/ परवानगी घ्यावी लागत नाही. नामांकनात बदल केल्यामुळे ठेवींवर किंवा गुंतवणुकीवर कोणाताही परिणाम होत नाही. एक किंवा अनेक व्यक्तींना ‘नॉमिनी’ करता येते. पण, त्यांना किती मालमत्ता जावी याची टक्केवारी देता येऊ शकते. समजा, तिघांना ‘नॉमिनेट’ केलं, तर ३५, ३०, ३० अशी टक्केवारी देता येऊ शकते, हे उदाहरण आहे. संपत्ती मालकाने त्याला योग्य वाटेल ती टक्केवारी ठरवावी.

मूळ गुंतवणूकदार यात असताना गुंतवणुकीच्या प्रक्रियेमध्ये ‘नॉमिनी’ काहीही निर्णय घेऊ शकत नाही. ‘सेबी’ने नुकतेच सर्व म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फोलिओंवर नामांकन करणे आवश्यक केले आहे. यासाठीची अंतिम मुदत वाढवून दि. ३० सप्टेंबर केली आहे.सर्वसामान्यतः नामांकन हे पती किंवा पत्नी, मुले, आई, वडील यांच्या नावे केले जाते. नामांकन हे शक्यतो जबाबदार व्यक्तीच्या नावे करावे. तुमचा मित्र किंवा अन्य नातलगाच्या नावेही करता येऊ शकते. दुसर्‍या देशाचे नागरिक असलेल्या व्यक्तीलाही ‘नॉमिनी’ करता येऊ शकते. यात रकमेचे हस्तांतरण सुलभ व्हावे व करविषयक गुंतागुंत होऊ नये म्हणून दुसर्‍या देशाच्या नागरिक असणार्‍या व्यक्तीकडे भारतीय ‘पॅन’ हवे. अज्ञान (चळपेी) व्यक्तीला ‘नॉमिनी’ केल्यास त्याच्या ‘नॅचरल गार्डियन’ची माहिती द्यावी लागते. अज्ञान व्यक्ती जोपर्यंत सज्ञान होत नाही, तोपर्यंत अशा नामांकनाद्वारे मिळालेली रक्कम/संपत्ती सांभाळून ठेवणे ही ‘नॅचरल गार्डियन’ची जबाबदारी असते. नामांकन करताना ती व्यक्ती आर्थिक बाबी हाताळण्यासाठी सक्षम आहे का नाही, याचा विचार करण्याची आवश्यकता नसते. नामांकन करताना आपल्या पश्चात कमीत कमी वाद कसे होतील, याची दक्षता घेणे गरजेचे असते.
 
 
समजा, वैवाहिक नात्यात बदल झाले मग ते लग्नामुळे असोत की घटस्फोटामुळे असोत, नामांकन बदलता येते. कुटुंबामध्ये नव्या सदस्याचे आगमन झाले म्हणजे मुलगा किंवा मुलगी झाली, नात किंवा नातू झाला, तरीही नामांकन बदलता येते. ‘नॉमिनी’चा मृत्यू झाल्यास नवीन ‘नॉमिनी’ द्यावाच लागतो. तसेच इच्छापत्र व नामांकन या दोन वेगळ्या बाबी आहेत. ‘नॉमिनी’ जर स्वत: कायदेशीर वारस नसेल, तर कायदेशीर वारसाकडे संपत्ती/पैसा सुपुर्द करणे हे ‘नॉमिनी’चे काम असते. इच्छापत्रात किंवा मृत्यूपत्रात संपत्तीत/पैशाचे वाटप कोणाला व कसे व किती प्रमाणात व्हावे, याचा पूर्ण तपशील असतो. ‘नॉमिनेशन’ केल्यानंतर जो ‘नॉमिनी’ असेल, त्याला याची पूर्ण माहिती द्यावी. ‘नॉमिनी’ हा ठेवीदार किंवा गुंतवणूकदारांच्यावतीने कायदेशीर वारसांचा विश्वस्त म्हणून काम पाहतो. संपत्तीधारकाने मृत्यूपत्र केलेले नसेल, तर मृत व्यक्तींना लागू होणार्‍या वैयक्तिक कायद्याप्रमाणे त्याचे वाटप करावे लागते. संपत्तीधारकाचा ‘नॉमिनी’स संपत्ती/पैसा मिळावा म्हणून अर्ज करावा लागतो व अर्जासोबत ‘केवायसी डॉक्युमेंट्स’ सादर करावे लागतात. नामांकन केलेले नसेल, तर वारसांना सक्षम न्यायालयाकडे ‘प्रोबेट’ अथवा उत्तराधिकारी प्रमाणपत्रसाठी (र्डीललशीीळेप लशीींळषळलरींळेप) अर्ज करावा लागतो व सादर केल्यानंतर संपत्ती/पैशाचे हस्तांतरण होऊ शकते.

प्रत्येकाने आपल्या मालमत्तांबाबत काही काळजीपण घेतली पाहिजे. आपल्या सर्व मालमत्ताची नोंद व्यवस्थितपणे करावी. त्यांची माहिती पती/पत्नी यांना पूर्णपणे द्यावी. सर्व मालमत्तांचे (स्थिर तसेच अस्थिर) नामांकन करावे. कुटुंबातील बदलत्या परिस्थितीनुसार नामांकनामध्ये गरज वाटेल तेव्हा बदल करावेत. नामांकनाबरोबरच इच्छापत्रही करावे.आयुर्विमा पॉलिसीचा धारक एकच असतो, यात पती/पत्नी, अपत्ये आई-वडील, जवळचा किंवा दूरचा नातेवाईक किंवा मित्र यापैकी कोणालाही ‘नॉमिनी’ करावे. सर्वांत जवळची नातेवाईक व्यक्ती लाभार्थी नामनिर्देशित व्यक्ती ठरू शकते व तिला सर्व रक्कम दिली जाते. नामनिर्देशित व्यक्ती ही कुटुंबाचा सदस्य नसेल, तर जास्त काळजी घेतली जाते. बँक खाती लॉकर धारक एक किंवा संयुक्त असू शकतो. पती/पत्नी, मुले, आई-वडील, दूरचा/जवळचा नातेवाईक किंवा मित्र यापैकी एकाला ‘नॉमिनी’ केले जाते. बँक खात्यासाठी एकच ‘नॉमिनी’ स्वीकारला जातो. लॉकरसाठी दोन व्यक्तींना ‘नॉमिनी’ करता येऊ शकते. वेगवेगळ्या खात्यांसाठी वेगवेगळे ‘नॉमिनी’ करता येतात. शेअर एकाच्या नावे किंवा संयुक्त नावे घेता येतात.


‘नॉमिनी’ शक्यतो नातेवाईक असावा. एकाच व्यक्तीला ‘नॉमिनी’ करता येते. ‘नॉमिनी’ ही शेअरधारक होऊ शकते. म्युच्युअल फंड - एक ते दोन व्यक्तींना ‘नॉमिनी’ करता येते. ‘नॉमिनी’ कोणीही चालतो. चॅरिटेबल किंवा धार्मिक ट्रस्टला ही ‘नॉमिनी’ करता येते. जास्तीत जास्त तीन व्यक्तींना त्यांच्या वाटपाच्या प्रमाणासह ‘नॉमिनी’ करता येते. ‘नॉमिनी’ म्युच्युअल फंडाची युनिट धारक होऊ शकते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) एकाच नावे खाते उघडता येते. ‘नॉमिनी’ शक्यतो कुटुंबाचा सदस्य असवा. अनेक ‘नॉमिनी’ असल्यास त्यांना दिलेल्या हिश्श्यानुसार, त्यांना मालमत्तेची काळजी घ्यावी लागते. कर्मचारी भविष्यनिर्वाह फंड (ईपीएफ) एकाच व्यक्तीच्या नावे खाते असते. नोकरदाराच्या नावे खाते असते. ‘नॉमिनी’ घरातील सदस्य असावा. एक किंवा जास्त व्यक्तींना त्यांच्यातील वाटपाच्या प्रमाणावर नामनिर्देशित व्यक्तीला फंडातील रक्कम मिळते. कुटुंब नसेल, तर तो कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थांना भविष्य निर्वाह निधी धारक ‘नॉमिनी’ करू शकतो. जर ‘नॉमिनेशन’ केलेले नसेल, तर ठरावीक रकमेपर्यंतचा दावा बँकेचा शाखाधिकारी त्याच्या अधिकारात संमत करू शकतो. पण, रक्कम जर जास्त असेल व ‘नॉमिनेशन’ केलेले नसेल तर मात्र उत्तराधिकारी प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय मृत व्यक्तीची रक्कम कायदेशीर वाटचाल मिळू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक गुंतवणुकीत आवर्जून ‘नॉमिनेशन’ करावे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

शशांक गुळगुळे

लेखक बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. २०११ साली त्यांनी सेवानिवृत्ती पत्करली. एम.ए इन इकोनॉमिक्स, डिप्लोमा इन कॉम्प्युटराईज्ड बँकिंग ऍप्लीकेशन असे आर्थिक क्षेत्राशी संलग्न शिक्षण. ते अर्थ-उद्योग विषयातील अभ्यासक आहेत.