'कंबूज’ तथा ‘कंबोज’ असे प्राचीन संस्कृत नाव असलेला देश म्हणजे कंबोडिया. १९५५ साली फ्रान्सपासून कंबोडिया स्वतंत्र झाला. दरम्यान कंबोडिया आता पुन्हा एकदा चर्चेत आला असून, तब्बल ३८ वर्षांनंतर कंबोडियाला दुसरा पंतप्रधान मिळणार आहे. चार दशके कंबोडियाचे पंतप्रधानपद सांभाळणारे हून सेन यांनी सत्ताकारणातून निवृत्तीचा निर्णय जाहीर करत आपल्या मोठ्या मुलाला सत्तेत बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे, जगातील सर्वाधिक काळ सरकारमध्ये राहिलेल्या नेत्यांपैकी एक म्हणजे हून सेन. सेन यांच्या चार दशकांच्या कार्यकाळात देशात त्यांच्याविषयी नेहमीच असंतोष धगधगत होता. अनेक वादांनी घेरलेली त्यांची कारकिर्द अखेर संपुष्टात आली. सेन यांनी नुकताच राजीनामा देऊन आता सत्तेची सूत्रे त्यांच्या ज्येष्ठ मुलाकडे सोपवणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सेन यांच्या कंबोडियन पीपल्स पक्षाने (सीपीपी) दणदणीत विजय मिळवला. तब्बल ८२ टक्के मतांसह त्यांचा पक्ष पुन्हा सत्तेत आला. पुन्हा सत्तेत येण्याची नामी संधी सेन यांच्याकडे असतानाही, त्यांनी ती नाकारली अन् पुत्रमोहापायी सत्ता मोठ्या मुलाकडे सोपवण्याची घोषणा केली. पक्षनेतेपद सेन यांच्या मुलाकडे जाणार असल्याने पुढील पंतप्रधानही सेन यांचाच मुलगा होईल.
सेन यांनी ‘मी यापुढे पंतप्रधान होणार नाही, ही गोष्ट लोकांनी समजून घ्यावी,’ असे सांगितले. सार्वत्रिक निवडणुकीत हून सेन यांच्या पक्षाशी लढणारा एकमेव नेता असलेल्या कॅण्डललाईट पक्षाच्या उमेदवाराला निवडणूक अधिकार्यांनी मतदानापूर्वीच अपात्र ठरवले होते. त्यामुळे निवडणुकीचा निकाल काय लागेल, हे वेगळे सांगण्याची गरजच नव्हती. हून सेन यांचा ४५ वर्षांचा मुलगा हून मैं दि. २२ ऑगस्ट रोजी पंतप्रधानपदी विराजमान होणार आहे. १९८५ मध्ये सत्तेवर आल्यानंतर हून सेन यांनी त्यांच्याविरोधात उठलेला प्रत्येक आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. आपल्याविरोधातील असंतोष वेळीच चिरडण्यात त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. आपली एकहाती सत्ता चालविण्यासाठी त्यांनी अनेकदा विरोधी पक्षांवरच बंदी घातली.
कित्येक विरोधी नेत्यांना त्यांनी देश सोडून जाण्यास अथवा विरोधाची तलवार म्यान करण्यास भाग पाडले. देशातील भाषणस्वातंत्र्य हिसकावण्याचा प्रयत्नही झाला. या दडपशाहीमुळे हळूहळू कंबोडियाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू झाली. कंबोडियाची तुलना उत्तर कोरियाशी होऊ लागली. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ८० टक्क्यांहून अधिक मते मिळाल्याने कंबोडियन पीपल्स पक्षाने आनंदोत्सव साजरा करीत, हा देशातील लोकशाहीच्या परिपक्वतेचा पुरावा असल्याचे सांगितले. परंतु, अमेरिका आणि युरोपियन युनियनसह पाश्चात्य देशांनी यावर टीका केली आणि निवडणुकांना अन्यायकारक म्हटले. या निवडणुकांमध्ये प्रचारादरम्यान हून सेन यांचे पुत्र हून मैं सक्रिय सहभागी होते. गेल्या दीड वर्षांपासूनच त्यांना सत्ता सोपविण्याचे प्रयत्न सुरू होते.
हून सेन पदावर भले नसतील. परंतु, मुलाच्या साहाय्याने ते कंबोडियावर राज्य करतील. हून यांनी आपण सिनेट सदस्य होऊन राजाच्या अर्थात मुलाच्या अनुपस्थितीत देशाचे प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळणार असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे सत्तेवर नसले, तरीही आडमार्गाने का होईना, सेन सत्तेवर काबीज राहणारच आहेत. हून सेन यांनी आपल्या कार्यकाळात चीनशी जवळीक वाढवली. त्यामुळे चीनने कंबोडियामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा प्रकल्प उभारले. त्यात अमेरिकेचा आक्षेप असलेल्या नौदल तळाचाही समावेश आहे.
दरम्यान, कंबोडियात चीनमधून मोठ्या प्रमाणात पैसे येत असल्याने अचानक कॅसिनो उघडणे आणि ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. हून सेन यांच्या कार्यकाळात पर्यावरणाचीही मोठी हानी झाली आहे. यासोबतच हून सेन न्यायव्यवस्थेचा गैरवापर करून विरोधी आवाज दाबत असल्याचा आरोपही अनेकदा मानवाधिकार संघटनांकडून करण्याता आला आहे. कंबोडियाला चार दशकांनंतर भले दुसरा पंतप्रधान मिळाला, परंतु, सत्ता मात्र सेन कुटुंबाकडे राहणार. कंबोडियन जनतेला हा वनवास किती काळ सहन करावा लागेल, हे तूर्तास सांगणे कठीण आहे. परंतु, कंबोडियन जनतेने एकत्र येऊन या बेधुंद सत्तेविरोधात आपला आवाज बुलंद करावा, तरच काही आशा आहे...