शहरी नक्षलवाद ही वस्तुस्थितीच : पोलीस अधीक्षक अंकित गोयल
आर्थिक रसद, पाठिंबा याकरिता शहरी नक्षलवादाची धोरणात्मक रचना
26-Jul-2023
Total Views | 69
पुणे : जातीय व धार्मिक तणाव वाढविण्यासोबतच विकास प्रकल्पांना विरोध आणि समाजात गोंधळ निर्माण करण्याचे काम शहरी नक्षलवादी नियोजनबद्ध पध्दतीने करीत आहेत. तीच त्यांची कार्यपद्धती आहे. शहरी नक्षलवादाची वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. परदेशामधून तसेच शहरी भागामधून मिळणारी आर्थिक रसद, पाठिंबा याकरिता शहरी नक्षलवादाची धोरणात्मक रचना करण्यात आलेली आहे. याद्वारे जंगलामधील घातक आणि आक्रमक विचारधारा शहरात रुजविण्याचे काम नियोजनबद्ध पध्दतीने सुरु असल्याचे पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानात ममहाराष्ट्रातील माओवादी चळवळीची सद्यस्थिती, त्यामुळे निर्माण झालेली आव्हाने आणि पोलिसिंग या विषयावर गोयल बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट आणि सरचिटणीस पांडुरंग सरोदे उपस्थित होते. गोयल यांनी गडचिरोलीमध्ये दोन वर्षे सेवा बजावली आहे. त्याअनुषंगाने त्यांनी नक्षलवादी चळवळीमागील सत्य मांडले. माओने ज्याप्रकारे ग्रामीण भागापासून सुरुवात करुन त्याची चळवळ शहरी भागात नेली, त्याच धर्तीवर देशातील माओवादी काम करीत आहेत.
भूमीहीन आणि आदीवासींना हक्कांच्या भूलथापा देऊन त्यांचे समर्थन मिळविले जात आहे. हा सर्व शहरी नक्षलवादाचाच प्रकार आहे. ज्यांना जंगल माहिती नाही की ज्यांनी कधीही बंदूक पाहिलेली, हाताळलेली नाही असे बुद्धीजीवी या नक्षलवादाला समर्थन देतात. माओवादापासून प्रेरित होऊनच १९६७ मध्ये नक्षलबाडी नावाच्या गावामधून सुरुवात झाली होती. माओवादाची व्याख्या भारतात स्वीकारार्ह होईल की नाही या शंकेमधून नक्षलबाडीवरुन नक्षलवाद असे नाव धारण करण्यात आले.
आपला देश संविधानावर चालतो. लोकशाहीची मुल्ये आपण स्विकारलेली आणि अंगिकारलेली आहेत. त्यामुळे अशा प्रकारचा नक्षलवाद खपवून घेतला जाणार नसल्याचे गोयल म्हणाले. आंध्रप्रदेशात बुद्धीजीवी आणि तरुण वर्गाने ही चळवळ उचलून धरली. पोलिसांनी नाड्या आवळल्यानंतर नक्षल्यांनी महाराष्ट्रामधील गडचिरोलीमध्ये डेरा जमवला. हा नक्षलवाद पाहता पाहता २००४ साली देशभरात फोफावत गेला. विविध गट एकत्र आले. त्यांनी सीपीआय माओइस्ट ही संघटना स्थापन केली.
ही चळवळ समता विहिन आणि महिलांचे शोषण करणारी आहे. पूर्वी लग्न करण्यास मनाई होती. आता लग्न करण्यास परवानगी असली तरी नसबंदीची सक्ती आहे. आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये नक्षल चळवळीविरोधी चांगले काम झाले आहे. पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिसा, छत्तीसगढ येथे आजही समस्या कायम आहेत.