रक्ताचा व्यापार न होता, रुग्णांना सेवा देता यावी, या उद्देशाने सुरू झालेल्या जनकल्याण समितीच्या वामनराव ओक रक्तपेढीची १७व्या वर्षांत वाटचाल सुरू आहे. आजवर ७५ हजारांहून अधिक रक्तदात्यांचे रक्तपेढीशी रक्ताचे नाते जुळले आहे.
दि. ३ मे, २००७ रोजी जनकल्याण समितीच्या माध्यमातून सुरू झालेल्या ठाण्यातील वामनराव ओक रक्तपेढीने स्वातंत्र्याच्या ७५ व्या सुवर्णमहोत्सवी वर्षात ७५ हजारांहून अधिक रक्तदाते जोडले आहेत. रक्तपेढीचे रोपटे लावताना त्यावेळचे ज्येष्ठ संघ कार्यकर्ते भाऊ बापट, डॉ. शांताराम आपटे, माधवराव कुलकर्णी, ढवळीकर काका, कुलकर्णी काका, दत्ता जोशी, आर्किटेक्ट नंदू लेले, शशिकांत देशमुख, विकास गोखले, डॉ. निकते आणि महेश जोशी यांनी मोलाची कामगिरी केली. प्रामाणिक प्रयत्नांना नेहमीच मदतीचे हात सढळपणे पुढे येतात, त्यानुसार निधी संकलन आणि इतर सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता होऊन रक्तपेढी अस्तित्वात आली. ठाण्यामधील ‘प्रताप व्यायामशाळा सेवा’ संस्थेच्या परिसरातील छोट्या जागेत सुरू झालेली रक्तपेढी आज टोलेजंग वास्तूमध्ये २४ बाय सात कार्यरत आहे.
जनकल्याण समितीच्या माध्यमातून अॅडव्होकेट वामनराव ओक यांच्या नावाने रक्तपेढीची सुरुवात झाली. रुग्णांच्या तत्कालीक उपचारासाठी रक्ताची गरज महत्त्वाची होती. ते अल्प दरात त्वरित उपलब्ध व्हावे व औषधोपचाराविना कोणाच्याही घरातील दिवा विझू नये म्हणून जनकल्याणासाठी हाती घेतलेला हा प्रकल्प अनेक अडचणींवर मात करीत सिद्धीस नेण्यात अनेकांचा हातभार लागत आहे. २००७ ते २०२३ या गेल्या १६ वर्षांमध्ये अनेक नवनवीन यंत्रसामग्री रक्तकेंद्रात दाखल झाल्या आहेत. त्या माध्यमातून अल्पदरात रुग्णांना रक्त पुरवण्यासाठी रक्तपेढी काम करीत आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये वाडा, शहापूर, मुरबाड, कल्याण व ठाणे शहरातील तसेच मुंबईतील रुग्णांना सुरक्षित रक्त पुरवण्यासाठी रक्तपेढी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून अनेक रुग्णांना संपूर्ण रक्त विनामूल्य दिले जाते. रक्त हे नाशीवंत असल्यामुळे ते ३०-३५ दिवसांत वापरावे लागते, त्यामुळे मागणी आणि पुरवठ्याचा मेळ घालणेही महत्त्वाचे ठरते. एखाद्याने मनापासून केलेलं रक्तदान फुकट जाता कामा नये, यासाठी तो ताळमेळही रक्तपेढीत राखला जातो. अधिक सुरक्षित रक्त मिळण्यासाठी आता ‘ऍलायजा टेस्टेड’ आणि ‘नॅॅट टेस्टेड’ रक्ताची सुविधासुद्धा उपलब्ध करून दिली आहे. पण, ‘नॅट टेस्टेड’साठी रक्त नाशिक येथे पाठवावे लागते.
शहापूर येथे ‘साई स्टोरेज सेंटर’ वाडा येथे चंदावरकर हॉस्पिटलमध्ये स्टोरेज केंद्र सुरू झाली आहेत. त्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना त्वरित रक्त उपलब्ध होणार आहे. भविष्यात रक्तपेढीमध्ये नॅट टेस्टिंगसाठी अत्याधुनिक मशिनरी घेण्याचा मानस असून ज्यामुळे अधिक सुरक्षित रक्ताचा पुरवठा रुग्णांना करता येईल.तसेच, ‘थॅलेसेमिया’ प्रकल्पसुद्धा रक्तपेढीने हाती घेतला आहे, असे रक्तपेढीच्या कार्यवाह कविता वालावलकर यांनी सांगितले. आजघडीला रक्तपेढीची ‘धुरा’ संस्थेचे अध्यक्ष किरण वैद्य, कार्यवाह कविता वालावलकर, सह कार्यवाह अजय पाठक, सह कार्यवाह अतुल धर्मे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शिल्पा देशपांडे, प्रशासकिय अधिकारी साईप्रसाद तुपांगे, रक्त संकलन अधिकारी सुरेंद्र बेलवलकर, विपणन अधिकारी मंदार जोशी यांच्यासह ३३ जणांचा स्टाफ समर्थपणे वाहत आहे. रक्तपेढीने आतापर्यंत १ हजार, ६४० रक्तदान शिबिरे घेतली असून या शिबिरांमधून ६० हजार, ६८३ रक्तदात्यांनी योगदान दिले आहे. याशिवाय १४ हजार, ५९७ रक्तदात्यांनी रक्तकेंद्रात येऊन रक्तदान केले आहे. अशा प्रकारे एकूण ७५ हजार, २८० रक्तदात्यांच्या माध्यमातून ८३ हजार, ५४३ पिशव्या रक्त वितरण करण्यात आले आहे. समाजातील दानशूर दात्यांच्या जोरावर आणि संघ स्वयंसेवकांच्या परिश्रमामुळेच रक्तपेढीने हा पल्ला गाठला आहे.