त्वचेचे आरोग्य उत्तम असल्यास त्वचा निरोगी व तुकतुकीत दिसते. त्वचा मऊ, नाजूक, वर्ण एक संग आणि स्पर्शाला सुखकारक असते. त्वचेचे आरोग्य विविध पैलूंवर अवलंबून आहे. त्यातील काही पैलू आजच्या लेखातून जाणून घेऊया...
मनुष्य शरीर निरोगी राहण्यासाठी उत्तम आहाराची गरज असते. तसेच त्वचेचे आरोग्य उत्तम राखण्यासाठीदेखील षड्रसात्मक आहार असणे गरजेचे आहे. मधुर (गोड) रसाने (चवीने) तृप्ती-समाधान लवकर होते. तसेच, त्याने पोषण ही होते. त्यामुळे नैसर्गिकरित्या गोड जिन्नसे (जशी फळे सफरचंद, केळ, चिकू, सीताफळ इ.) दूध, गहू. इ.चा आहारात समावेश असावा. सात्विक आहार (ज्यात मीठ-तिखट-मसाल्यांचे प्रमाण कमी असते. जे शिळं, कुजलेलं आंबवून केलेले नाही असे सर्व जिन्नसे सात्विक आहारात येतात.) खाल्ल्याने त्वचा तुकतुकीत व तजेला युक्त दिसते. चेहर्यावर एक वेगळेच तेज झळकते. खाण्यात जेवढे तिखट- चमचमीत, तेवढे शरीरात पित्तवर्धन होणार, घामाचे प्रमाण वाढणार, अंगातील उष्णता वाढणार व विविध त्वचेच्या तक्रारी सुरू होणार. शिळं, आंबवलेलं, कुजवून बनवलेलं इ. आहार हा तामसिक आहार आहे. याने तरतरी वाटत नाही. मरगळलेले वाटणे, अनुत्साह, आळस, अतिझोप इ. लक्षणे वारंवार होतात आणि त्वचेवर खाज, चिकटपणा, ओली जखम असल्यास ती लवकर भरत नाही इ. लक्षणे उत्पन्न होतात.
आहारात फळांचा वापर (गोड चवीची), दूध, ताक, साजूक तूप, भात, कमी मसालेदार जेवण इ. असल्यास त्वचेवर त्याचा उत्तम परिणाम दिसतो. काही वेळेस खूप उपाशी राहणे, कमी खाणे (भूक लागली असतानाही पाणी पिऊन भूक मारणे) ‘क्रॅश डायटिंग’, कुठल्याही वेळेस जेवणे (irregular food habits) मुळेही त्वचेवर अनिष्ट परिणाम होतो. त्वचा मलूल आणि निस्तेज होते आणि वर्णाच्याही विविध छटा उमटतात. (Uneven skin tone) त्वचेचे पोषण आहारातूनच मुख्यत: होते. पण, आहारात बिघाड असेल, तर त्वचा निरोगी कशी राहील? त्वचा आपल्या शरीराच्या आरोग्यावर अवलंबून आहे. म्हणूनच म्हणतात की, निरोगी त्वचा ही आंतरिक आरोग्याचा आरसा आहे.
उत्तम आरोग्यासाठी षड्रसात्मक आहाराबरोबर नीट झोप होणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे. निद्रित अवस्थेत म्हणजेच झोपेमध्ये शरीर झीज भरून काढण्याचे काम करत असते. ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रियआपापल्या विषयांपासून वेगळी झालेली असतात व त्यांनाही विश्रांती मिळते. पण, झोप केवळ आठ तास होणे हे त्याचे ’prerequisite’ नाही. रात्रीची झोप ही सगळ्यात महत्त्वाची. ‘लवकर नीजे लवकर उठे, त्याला दीर्घायुष्य लाभे’ असे म्हटलेच आहे. रात्री लवकर झोपून ब्राह्म मुहूर्तावर उठणे हे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. ही झोप शांत व गाढ असावी. तुटक नसावी. खूप स्वप्न पडू नयेत. कारण, तुटक, अशांत झोपेमुळे तसेच खूप स्वप्ननावस्थेतील झोप असल्यास मन शांत झालेले नसते.परिणामी, शारीरिक विश्रांती तर होते, पण उत्साह व ताजेतवानेही वाटत नाही.
हल्ली कामावरून यायला बर्याच जणांना उशीर होतो. त्यानंतर जेवण व जेवणानंतर लगेच झोपू नये म्हणून एखादे ‘गॅझेट’ बघितले जाते. त्या गॅजेटच्या ब्लू लाईट उत्सर्जनामुळे बुद्धीला रात्र झाली आहे, असे न वाटता दिवसच आहे, असा संभ्रम निर्माण होतो. परिणामस्वरुप रात्री - अपरात्री १-२ वाजेपर्यंत जागणे हे नेहमीचे होऊ लागते. त्याची (त्यावेळेत झोपायची) जर सवय मोडायची असेल, तर सर्व प्रथम रात्रीचा गॅजेटचा वापर थांबवावा. उशिरा झोपलो म्हणून उशिरा उठलो, असे केल्यास झोपेचे चक्र आपण कधीच बदलू शकणार नाही. या विपरित सकाळी लवकर उठायची सवय लावावी.थोड्या दिवसांनी आपोआपच लवकर पेंग येऊ लागते, झोप लागते.
लवकर झोप लागण्यासाठी रात्री उशिरा जेवू नये. ज्यांना घरी पोहोचायला उशीर होतो, त्यांनी सायंकाळीच पोटभर जेवून घ्यावे. (डबा घेऊन जावा) आणि रात्री दूध-तूप प्यावे. याने खाल्लेलेही नीट पचते आणि ऐन/भूकेच्या वेळेस असे-तसे ‘जंक फूड’ न खाता पौष्टिक अन्नाचा अस्वादही घेता येतो. ज्यांना झोप शांत लागत नसेल, त्यांनी घरी पोहोचल्यावर गरम पाण्याने अंघोळ करावी. ज्यांचे शारीरिक कष्टाचे काम आहे, त्यांनी अंगाला कोमट तेल लावून मग अंघोळ करावी. याने अंग मोडून आले असल्यास कमी होते, स्नायू शिथिल होतात आणि शांत झोप लागण्यास मदत होते. पादाभ्यंग केल्याने ही मानसिक शांतीचा अनुभव होतो. पादाभ्यंग म्हणजे पायाला तेल लावून चोळणे (पाद म्हणजे पाय आणि अभ्यंग म्हणजे तेलाने मालिश) शांत झोप लागण्यासाठी पाय थोडा वेळ कोमट पाण्यात बुडवून ठेवावेत आणि मग पुसून तेल लावून चोळावे.
हे अगदी झोपतेवेळी केल्याने मन खूपच ‘रिलॅक्स’ आणि शांत होते. जेवढी शांत झोप रात्री लागते, तेवढे त्वचेवर तेज येते. चेहर्यावरच उत्साह आणि प्रसन्नता दिसू लागते. डोळ्याखाली काळी वर्तुळे (BLACK CIRCLES) असण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, मानसिक ताण आणि त्यामुळे होणारी अपुरी आणि तुटक झोप. झोप लवकर व शांत लागण्यासाठी झोपण्यातल्या खोलीचा उजेडही कमी ठेवावा आणि शांत संगीत ऐकावे. एखाद्या सकारात्मक गोष्टी वर मन एकाग्र करावे किंवा सकारात्मक कथा वाचाव्यात. झोपेमुळे त्वचा ताजीतवानी होते. सकाळी त्वचेवरील डाग, खड्डे, तारुण्यपिटीका, सुरकुत्या (FINE LINES) कमी झाल्याने दिसू लागते. आहार आणि निद्रा/झोप जितकी गरजेची, तेवढीच शारीरिक स्वच्छता (HYGINE) देखील त्वचेच्या उतम आरोग्यासाठी गरजेचे आहे. त्वचा आपल्या आभ्यंतर शरीराचे कवच-कुंडल आहे, जे आतील शारीरिक अवयवांचे बाह्य वातावरणापासून संरक्षण करते.
ऊन, वारा, पाऊस, कडाक्याची थंडी, कीटक, तीव्र रसायने, अग्नी इ.पासून संरक्षण करण्याचे कार्य त्वचेमार्फत होत असते. याचबरोबर संवेदना पोहोचविण्याचे कार्य (TOUCH PERCEPTION)ही त्वचेमार्फतच होते. यासाठी त्वचेची गुणवत्ता उत्तम असणे महत्त्वाचे आहे. त्वचेवर बाह्य वातावरणातील धूक, धूर इ. संपर्कात येऊन त्वचेवरच स्थिरावते. त्वचेतील रंध्रामधून घाम बाहेर पडतो आणि तो ही बाह्य त्वचेवर साठतो/ वाळतो. त्वचेतील मृत पेशीदेखील त्वचेवर जमा होतात. हे सगळे अनावश्यक घटक आहेत, ज्यांचे शरीरातून निष्कासन होणे गरजेचे आहे. नियमित अंघोळ (दररोज) करणे यासाठी महत्त्वाचे आहे. खूप तीक्ष्ण साबणांचा वापर टाळावा. कारण, त्याने त्वचा कोरडी व शुष्क पडते. अंघोळीचे पाणी कोमट ते गरम असावे. त्यामुळे त्वचेवरील साठलेला मळ निघून जाण्यास मदत होते.
अंघोळ जर रोजच्या रोज केली नाही, तर त्वचेवर घाम, धुळीचे कण, मृत पेशी इत्यादी साठू लागतात. त्वचेला दुर्गंध येतो आणि कण्ड येते. जखमाही होऊ शकतात आणि त्या चिघळूही शकतात. ringworm infection अन्य fungal infection वारंवार होण्याचे एक कारण म्हणजे, शारीरिक अस्वच्छता. त्याचबरोबर ओले दमट कपडे जर त्वचेवर वारंवार राहिले, त्यांचा संपर्क त्वचेशी होत राहिला, तर विविध चर्मरोग होऊ शकतात. पावसाने ओले झालेले कपडे, घामाने ओली झालेली अंत:वस्त्रे सफेद पाणी इत्यादीने ओली झालेली अंत:वस्त्रे त्वरित बदलावीत, असे न केल्यास र्षीपसरश्र ळपषशलींळेप होण्याची शक्यता बळावते किंवा संसर्ग झाल्यास त्याची प्रखरता वाढू शकते आणि ीशर्लीीीशपलश (वारंवार होण्याची सवय) टाळणे कठीण होते.
जशी स्नानाची त्वचेसाठी गरज आहे. तसेच, केसांची ही निगा नीट राखण्यासाठी नियमित केस धुणे हेदेखील अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा उवा-लिखा होण्याची शक्यता वाढते. त्वचा निरोगी असल्यावरच त्वचेचा पोट, वर्ण, कार्य आणि सहनन उत्तम राहते (क्रमश:)
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
९८२०२८६४२९