मुंबई : "कॉलेजात असताना आधुनिक तीर्थस्थान म्हणून एक धडा अभ्यासायला होता. त्यात स्वतंत्र भारताचे लोक कशाप्रकारे प्रगती करत आहेत याबद्दल सांगितले होते. तशीच काहीशी मंडळी सध्या सुवर्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे हे हॉस्पिटल समाजाला जागृत करणाऱ्यांच्या दृष्टीने नक्कीच एक आधुनिक तीर्थस्थान आहे. सामान्य व्यक्तिची सेवा शुद्ध भावनेने, समर्पणपूर्वक पद्धतीने करणारे असे हे हॉस्पिटल आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी मुंबईत केले. रविवार, दि. २३ जुलै रोजी शिंपोली येथे सुवर्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या 'धनकुंवरबेन बाबुभाई धकाण हॉस्पिटल' आणि 'रमाबेन प्रवीणभाई धकाण कार्डिएक सेंटर'चा लोकार्पण सोहळा सरसंघचालकांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
सरसंघचालक पुढे म्हणाले, "या हॉस्पिटलच्या उभारणीमागे अनेक जणांची तपस्या आहे. कोणी परिश्रमाने, कोणी धनाच्या सहाय्याने तर कोणी वेळेच्या रूपात आपले योगदान दिले आहे. ही तपस्या निरंतर चालत राहिली तरच तीर्थांचे तीर्थत्व टिकून राहिल आणि इथे येणाऱ्या प्रत्येकास पावन करत राहिल. या तीर्थाने प्रत्येकजण करुणामय होईल."
सामाजिक दृष्टीकोनावर भाष्य करताना सरसंघचालक म्हणाले, "नकारात्मक चर्चा समाजात बऱ्याचदा ऐकायला मिळतात. मात्र देशात पाहिलं तर ४० पटीने चांगल्या गोष्टी घडत आहेत. आजच्या मनुष्याची समाजाकडे आणि राष्ट्रहिताकडे बघण्याची वृत्ती बदललेली आहे. गेल्या चाळीस वर्षांत झालेला बदल उठून दिसू लागलाय. आता आपल्याला १९८८ रोजी २१ जणांच्या झालेल्या पहिल्या संचलनाप्रमाणेच ध्येयपूर्तीसाठी एकादिशेने वाटचाल करण्याची गरज आहे."
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सुवर्णा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्थ आणि भाजप आमदार योगेश सागर यांच्या हॉस्पिटल उभारणीमागील संकल्पनेचे त्यांनी यावेळी भरभरून कौतुक केले. ते म्हणाले,"भाषण करणं सोपं असतं पण ते कृतीत उतरवणं तेवढच कठीण. मात्र एका मिशनप्रमाणे हे कार्य हातात घेउन ते संपन्न करण्याचे काम योगेशजींनी केले आहे. या हॉस्पिटलमध्ये आवश्यक असलेली सर्व प्रकारची अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध आहे. ऑपरेशन थेटरही अत्याधुनिक आहे. सर्वसामान्यतः गरीबांसाठी जनरल वॉर्डची व्यवस्था असते, मात्र या हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्डची संकल्पना नसून गरीबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाचा वॉर्ड हा स्पेशलच आहे. या संकल्पनेमागचे संपूर्ण श्रेय हे योगेशजींकडेच जातं. प्रत्येक वॉर्ड वातानुकुलीत आहेत. केवळ गरीबांची सेवा हा या वास्तूच्या निर्मितीमागचा उद्देश आहे. त्यामुळे स्वयंसेवक कसा असतो हे योगेशजींनी समर्पणाच्या भावनेने तयार केलेल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून उठून दिसतं."
कार्यक्रमादरम्यान बाबुभाई धकाण, भुपेशभाई धकाण उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार, ज्येष्ठ स्वयंसेवक बिमल केडिया आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सरसंघचालकांना पुरुषोत्तम पवार यांनी तयार केलेली आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.
केवळ सेवाभावाच्या दृष्टीने हॉस्पिटलची स्थापना
"१९४९ मध्ये सुवर्णा चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना झाली. पुढे १९८६ पर्यंत संस्थेने अनेक लहानसहान समाजिक कार्य केले. त्याकाळात केवळ १०० रुपयांत डायलेसिस करणारे या ट्रस्टचे हॉस्पिटल होते. तब्बळ ८० हजार ते १ लाख सामान्य लोकांच्या किडनी ट्रांसप्लांटचे कार्यही यापूर्वी झाले आहे. २०१९ मध्ये या हॉस्पिटलच्या पुनर्निर्मितीचे कार्य सुरू झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी खंबिरपणे पाठीशी उभे होते. केवळ सेवाभावाच्या दृष्टीने या हॉस्पिटलची स्थापना करण्यात आली आहे. वनवासी क्षेत्रातील लोकांनासुद्धा या हॉस्पिटलचा लाभ घेता येइल याबाबत उपाययोजना येणाऱ्या काळात सुरू होतील. "
- योगेश सागर, विश्वस्थ, सुवर्णा चॅरिटेबल ट्रस्ट
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
"सुवर्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या या हॉस्पिटलचे उद्दिष्ट गरीबांची सेवा करणे हे आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अनेक वनवासी भाग आहेत. त्या वनवासीना सुद्धा याठिकाणी उपचार घेता येणार आहे. यासाठी त्यांची ने-आण करण्याची जबाबदारी हॉस्पिटलने घेतली आहे. यामुळे वनवासी बांधव किंवा इतर कुठल्याही सामान्य व्यक्तीच्या फायद्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सुरू केलेल्या योजनांचा लाभ इथे येणाऱ्या प्रत्येकाने घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.