भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या शतकाचा 'असा'ही योगायोग!

    22-Jul-2023
Total Views |
Virat Kohli equals Don Bradman with sensational ton

मुंबई
: भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान दुसरा कसोटी सामना त्रिनिदादच्या क्वीन्स पार्क ओव्हलवर खेळण्यात येत असून या सामन्यात भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. विराट कोहलीने आपल्या कारकीर्दीतले २९ वे शतक पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हलवर ठोकले असून याआधी भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरनेही याच मैदानावर आपले २९ वे शतक ठोकले होते. त्यामुळे क्रिकेटविश्वात हा एक अनोखा योगायोगच म्हणावा लागेल. दरम्यान, क्रिकेटप्रेमींमध्ये याबद्दल चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, हा सामना विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतला ५०० सामना आहे.

दरम्यान, विराट कोहलीने विंडीजविरुध्द खेळताना पहिल्या डावात शतकी खेळी केली असून १२१ धावा करून तो धावबाद झाला. दरम्यान, भारतसाठी सर्वाधिक शतके करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहलीने आगेकूच केली असून तो आता चौथ्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत २९ शतके असून गावस्कर, द्रविड, तेंडुलकर अनुक्रमे ३४, ३६ , ५१शतकांसह त्याच्यापुढे आहेत. दरम्यान, विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या महान आणि क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली, ज्यांनी आपल्या शानदार कारकिर्दीत २९ कसोटी शतकेही झळकावली होती.

दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यास विलंब होणार असून पावसाच्या व्यत्ययामुळे चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारताने आपला पहिला डाव ४३८ धावांवर आटोपला असून विंडीजने पहिल्या डावास सुरुवात केली असून १ गडी बाद झाला असून ८६ धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजकडून ब्रेथवेट आणि मॅकेंझी खेळत असून ३५२ धावांनी विंडीज अद्याप पिछाडीवर आहे.