श्रद्धा असेल तरच धर्म टिकेल : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
जागतिक मंदिर परिषदेत प्रतिपादन; सामाजिक समरसतेसाठी मंदिर महत्वाचे
22-Jul-2023
Total Views | 187
वाराणसी : जगभरात सध्या श्रद्धांवर आघात करून धर्मास कमकुवत करण्याचे प्रकार होत आहेत. भारतातदेखील तसे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे श्रद्ध असेल तरच धर्म टिकेल आणि त्यासाठीच मंदिरे आवश्यक आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी शनिवारी केले.
वाराणसी येथे आयोजित तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय मंदिर परिषदेचे उद्घाटन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याहस्ते झाले. यावेळी सरसंघचालक म्हणाले, धर्म म्हणजे समाजाचा प्राण. धर्मासाठी श्रद्धा असणे आणि ती टिकून राहणे अतिशय आवश्यक असते. सध्या जगभरात श्रद्धा आणि धर्मास कमकुवत करण्याचे प्रकार होत आहेत. भारतातदेखील असे करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यासाठीच आपल्या मंदिरांना सशक्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी समाजाने एकत्रित प्रयत्न करून आपला हा सांस्कृतिक वारसा जपण्याची गरज आहे, असे सरसंघचालक म्हणाले.
मंदिरे हे सामाजिक समरसतेचे प्रमुख केंद्र आहे, असे सरसंघचालकांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, स्वतःसह समाजाच्या चित्तशांतीसाठी साधना आवश्यक असते. त्यासाठी समाजाला सज्ज करणे म्हणजे धर्म. ही प्रक्रिया अविरतपणे सुरू राहणे म्हणजेच 'धर्मचक्रप्रवर्तन'. यामध्ये शरीर, मन आणि बुद्धीस एकत्र आणून लक्ष्याच्या दिशेने केंद्रित केले जाते, ही प्रक्रिया जेथे घडते ते मंदिर. त्यासाठी मंदिरांचे परस्परसहकार्य आणि एकात्मिक धोरण अतिशय गरजेचे आहे. चराचर सृष्टीमध्ये देव आहे, हे आपली संस्कृती आहे. मंदिर हे समाजातील सर्व घटकांची चिंता करणारे, संस्कार आणि परमतत्व देणारे एक केंद्र आहे, असेही सरसंघचालकांनी नमूद केले.
मंदिरांमध्ये व्यक्तिनिर्माण अविरतपणे सुरू
मंदिरांमध्ये अविरतपणे व्यक्तिनिर्माणाचे कार्य सुरू असते. त्याचप्रमाणे सेवाकार्यामध्येही हिंदू मंदिरे जगात आघाडीवर आहेत. पूर्वीच्या काळी मंदिरे ही कला आणि कलाकारांचे आश्रयस्थान होते, त्याद्वारे 'उत्कृष्टता' म्हणजेच 'एक्सलन्स' साध्य होत असे. आज पुन्हा तसे होण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे भारतात बहुतांशी मंदिरे ही सरकारच्या नियंत्रणात आहेत, मात्र त्यामध्येही भक्त असतील तर ती मंदिरे उत्कृष्ट काम करतात; हे काशी विश्वनाथ मंदिराने दाखवून दिल्याचेही सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले.