सेवादिनाचे औचित्य साधत मुंबईत पालकमंत्री लोढांकडून सफाई कामगारांचा सन्मान
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन
22-Jul-2023
Total Views |
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईतील विविध भागांत आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभाग घेत नागरिकांना संबोधित केले. दरम्यान, वरळी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी मुंबईच्या स्वच्छतेची काळजी घेणाऱ्या सफाई कामगारांचा सत्कार केला आणि नागरिकांना छत्र्यांचे वाटप केले.
तसेच, मुंबई उपनगरचे पालकमंत्री या नात्याने मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी धारावी येथे आयोजित केलेल्या सेवा सन्मान कार्यक्रमात उपस्थित राहून, मंत्री लोढा यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार केला आणि नागरिकांना संबोधित केले. यावेळी भाजपचे विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाकडून होणारी समाजसेवा अधिक सक्षम व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईतील धारावी येथे भाजपाच्या नवीन कार्यलयाचे उद्घाटन करण्यात आले.
दरम्यान, विधान परिषदेचे भाजप गटनेते आ. प्रवीण दरेकर, दै. मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार, महाराष्ट्र भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन, मुंबई भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे सचिव जितेंद्र सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये "सेवा सन्मान दिन" कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी गरीब कुटुंबीय आणि सफाई कामगारांना धान्य वाटप करण्यात आले.
दरम्यान, बॉलिवूडमध्ये आपल्या मधुर आवाजाने सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे पार्श्वगायक मुकेश यांच्या १०० व्या जयंतीच्या निमित्ताने मलबार हिल, नेपेन सी रोड येथील मुकेश चौकाचा नामकरण समारंभ संपन्न झाला. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते, ते म्हणाले, आपल्या स्वरांनी कलेची सेवा करणाऱ्या या अद्भुत कलाकाराला या सोहळ्याच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करतो, असे लोढा यांनी सांगितले. तसेच, कार्यक्रमासाठी गायक मुकेश यांचे पुत्र नितीन मुकेश, पुतण्या आणि अभिनेता निल नितीन मुकेश व त्यांचा परिवार उपस्थित होते.