जयपूर : जोधपूर पोलिसांना मंगळवारी राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील चेराई गावात सहा महिन्यांच्या मुलीसह एकाच कुटुंबातील चार सदस्यांचे जळलेले मृतदेह सापडले. मारेकऱ्यांनी त्यांचा गळा चिरून, अंगणात ओढून जाळून टाकल्याची माहिती आहे. कुटुंबाच्या घराला आग लावल्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
पूनराम (५५), त्यांची पत्नी भंवरी देवी (५०), त्यांची सून धापू (२३) आणि तिची सहा महिन्यांची मुलगी मनीषा अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पूनराम यांचा मुलगा रेवताराम मंगळवारी रात्री जेवण करून दगडखाणीत कामासाठी निघाला होता. त्यानंतर रात्री उशिरा एका घरातून धूर निघत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना चार जणांचे जळालेले मृतदेह आढळून आले.
गावकऱ्यांच्या माहितीवरून एसपी (जोधपूर ग्रामीण) धर्मेंद्र सिंह यादव पोलिस दलासह घटनास्थळी पोहोचले. बाळाचे शरीर पूर्णपणे जळाले होते, तर इतरांचे शरीर अर्धवट जळाले होते, असे पोलिसांनी सांगितले, ते झोपेत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही हत्या सूडबुद्धीने करण्यात आल्याचे दिसते. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने, बहुधा कुऱ्हाडीने गळा चिरल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर त्यांचे मृतदेह घराबाहेर ओढून जाळण्यात आले.
या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यासाठी श्वान पथक आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) पथकालाही पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या प्रकरणाची माहिती असलेल्या काही लोकांनी दावा केला की, पोलीस पूनरामचा भाऊ आणि पुतण्या यांची चौकशी करत आहेत.
राज्यात झालेल्या भीषण हत्याकांडानंतर विरोधी पक्ष भाजपने राज्य सरकारवर टिका केली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळलेल्या परिस्थितीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. गुन्ह्याची जागा ही राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मतदारसंघाजवळ येते हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत राजस्थान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रप्रकाश जोशी म्हणाले की, “या घटना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भागात घडत आहेत. यावरून राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे स्पष्ट होते. शहरात कोणीही सुरक्षित नाही. मग ती मुले असोत किंवा महिला असोत. हे सर्व अत्यंत दुर्दैवी आहे.