‘एचडीएफसी’ बँक आणि ‘एचडीएफसी’ गृह वित्त संस्था या दोन संस्थांचे विलीनीकरण होत आहे. ‘एचडीएफसी’ गृह वित्त संस्था येथून पुढे वायदे बाजारामध्ये कार्यान्वित असणार नाही. ही बहुचर्चित अशी एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या आठवड्यात तिची अंमलबजावणी सुरू होत आहे. त्यामुळे अर्थजगतात होणार्या घडामोडींवर टाकलेली नजर...
भारतीय बँकिंग क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे ‘एचडीएफसी’ बँक. ‘एचडीएफसी’ या वित्तीय संस्थेचा विस्तार केवळ बँकिंग क्षेत्रापुरता मर्यादित नसून, वायदे बाजारातदेखील या वित्तीय संस्थेची व्याप्ती दिसून येते. मागील आठवड्यात ‘एचडीएफसी’ या वित्तीय व्यवस्थापनाच्याअंतर्गत येणार्या ‘एचडीएफसी’ बँक आणि ‘एचडीएफसी’ गृह वित्त संस्था या दोन संस्थांचे विलीनीकरण होणार, अशी घोषणा झाली आणि शनिवार, दि. १ जुलैपासून ती अंमलात येणार असे निश्चित झाले. या घोषणेनुसार ‘एचडीएफसी’ गृह वित्त संस्था येथून पुढे वायदे बाजारामध्ये कार्यान्वित असणार नाही, हेदेखील निश्चित झाले. ही बहुचर्चित अशी एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, येत्या आठवड्यात तिची अंमलबजावणी सुरू होणार आहे. तसेच, या दोन संस्थांमधील भाग भांडवलाचे हस्तांतरण गुरुवार, दि. १३ जुलैला होईल, असेदेखील घोषित करण्यात आले. वरवर पाहता ‘एचडीएफसी’च्या व्यवस्थापनाचा हा अंतर्गत निर्णय वाटत असला, तरी ‘एचडीएफसी’ गृह वित्त संस्थेचे भागधारक व गुंतवणूकदार यांच्या दृष्टीने या एकत्रीकरणाचे अनेक परिणाम येत्या काळात दिसून येतील.
‘एचडीएफसी’ वित्तीय व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार ‘एचडीएफसी’ गृह वित्त संस्थेचे ‘एचडीएफसी’ बँकेत विलीनीकरण झाल्यानंतर गुरुवार, दि. १३ जुलै रोजी गृह वित्त संस्थेच्या गुंतवणूकदारांना त्यांच्याकडे असणार्या प्रत्येक २५ शेअर मागे ४२ शेअर्स मिळणार असून, हे शेअर्स ‘एचडीएफसी’ बँकेच्या भांडवलाचा भाग असतील. ‘एचडीएफसी’ बँकेचे गुंतवणूक तज्ज्ञ डॉक्टर वि. के. विजयकुमार यांच्या मते, ‘एचडीएफसी बँकेची मागील तीन वर्षांमधील कामगिरी चांगली असूनसुद्धा बँकेचे राष्ट्रीय शेअर बाजारातील म्हणजेच ‘निफ्टी’वरील योगदान फारसे समाधानकारक नव्हते. या विलीनीकरणानंतर ही परिस्थिती निश्चितच बदलेल’. सद्यःस्थितीत ‘एचडीएफसी’ बँकेचे बाजार मूल्य ९ लाख, ५१ हजार, ८८४ कोटी रुपये एवढे आहे, तर बँकेचे भांडवली मूल्य ५ लाख, २२ हजार, ३६८ कोटी रुपये आहे. या विलीनीकरण प्रक्रियेनंतर ‘एचडीएफसी’ बँक व ‘एचडीएफसी’ गृह वित्त संस्था या दोन्हींचे एकत्रित बाजार मूल्य १४ कोटी, ७३ लाख, ९५३ कोटी एवढे होईल. याचा अर्थ असा की, ‘एचडीएफसी’ बँक या वित्तीय संस्थेचा आकार ‘टाटा कन्सल्टन्सी सर्विस’ या बाजारातील दुसर्या क्रमांकाच्या कंपनीपेक्षा मोठा असेल. आज घडीला ‘टाटा कन्सल्टन्सी सर्विस’ या संस्थेचे बाजार मूल्य हे १२ कोटी, ७ लाख, ६६९ हजार रुपये एवढे असून, ती बाजारातील दुसर्या क्रमांकाची संस्था आहे. शनिवार, दि. १ जुलैपासून ‘एचडीएफसी’ दुसर्या क्रमांकाची वित्तीय संस्था बनेल.
या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेनंतर ‘एचडीएफसी’ बँकेच्या वित्तीय बाजारातील कार्यक्षेत्रातदेखील वाढ होणार असून बँकिंग, विमा, म्युचल फंड्स, गृह वित्त आणि इतर प्रकारची कर्जे व बँकेत ठेवल्या जाणार्या अनेक प्रकारच्या ठेवी, अशा अनेक क्षेत्रांमध्ये या वित्तीय संस्थेचा प्रसार होईल. या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेनंतर मुंबई बाजार निर्देशांक व राष्ट्रीय बाजार निर्देशांक येथील ‘एचडीएफसी’ वित्तीय संस्थेचे एकूण गुंतवणुकीतील प्रमाण १४ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. वित्तीय बाजारातील बदलांच्या बरोबरीने बँकेच्या व्यवस्थापनातदेखील मोठे बदल होणार आहेत. ‘एचडीएफसी’ बँकेचे प्रवर्तक दीपक पारेख यांच्याकडून ही व्यवस्थापनाची धुरा आता ‘एचडीएफसी’ ग्रुपचे मुख्य व्यवस्थापक शशी जगदिशन यांच्याकडे सोपवली जाणार आहे. भारतातील वायदे बाजार व बँकिंग क्षेत्रातील वित्तीय संस्था सद्यःस्थितीत एका परिवर्तनात्मक अवस्थेला तोंड देत असून, आंतरराष्ट्रीय पातळीवरील बदल, देशांतर्गत परिस्थिती आणि वायदे बाजारातील नियामक संस्थांची धोरणात्मक चौकट या सर्व घटकांचा विचार करता वित्तीय संस्थांच्या दृष्टीने धोरणात्मक बदल घडवणे आणि आव्हानात्मक स्थितीला तोंड देण्यासाठी सशक्त होणे, ही आजच्या काळाची गरज बनली आहे. कदाचित म्हणूनच प्रशासकीय दृष्टीने लहान आकाराच्या राष्ट्रीयकृत बँकांचे विलीनीकरण करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आणि खासगी क्षेत्रातील बँकिंग व्यवस्थापनाकडूनदेखील अशाच प्रकारचे विलीनीकरण घडून येणे, यामध्ये धोरणात्मक साम्य दिसून येते.
बँकिंग शास्त्राच्या दृष्टिकोनातूनदेखील लहान आकाराच्या वित्तीय संस्थांचे व्यवस्थापन ही न परवडणारी बाब असते. त्यामुळे लहान आकाराच्या संस्था एकत्रित करून ‘इकोनोमिज ऑफ स्केल’ किंवा मोठ्या आकाराच्या बचती मिळवण्याकडे व्यवस्थापनाचा कल असतो. यामुळेच ‘एचडीएफसी’च्या व्यवस्थापनाचा हा ताजा निर्णय ‘विलीनीकरणातून सशक्तिकरण’ या दृष्टीने टाकलेले एक पाऊल म्हणता येईल. ‘एचडीएफसी’ बँक तसेच गृह वित्त संस्था यातील कर्मचारी व त्यांची वेतन पातळी कायम राखण्याचा प्रयत्न केला जाणार असून, या वित्तीय संस्थेच्या विलीनीकरणानंतर कर्मचार्यांच्या कौशल्याचा अधिकाधिक उपयोग करून घेण्याकडे व्यवस्थापनाचे लक्ष असेल. महत्त्वाची बाब म्हणजे या विलीनीकरणानंतर गुंतवणूकदारांना अधिकाधिक आकर्षक अशाच स्वरूपाच्या गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देणे आणि वायदे बाजारातील कामगिरी सुधारून बँकेच्या नफ्यात वाढ करणे, या उद्दिष्टाने व्यवस्थापनाला पावले उचलावी लागतील. ‘एचडीएफसी’ व्यवस्थापनाचा हा निर्णय येत्या काळात यशस्वी ठरल्यास अशाच प्रकारचा कल इतर व्यवस्थापनातदेखील दिसून येण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की, येत्या काळात भारतातील वित्तीय बाजार व वित्तीय संस्था यांचे आकारमान, व्यवस्थापन व बाजार मूल्य यामध्ये मोठे बदल घडून येण्याची नजीकच्या भविष्यात मोठी शक्यता आहे.
आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून ‘रिझर्व्ह बँके’ने प्रस्तुत केलेल्या धोरणानुसार १९९४ साली खासगी क्षेत्रातील बँक म्हणून ‘एचडीएफसी’ बँकेची स्थापना झाली आणि तेव्हापासून धोरणातील सातत्य आणि ठेवीदारांच्या विश्वासार्हतेवर ‘एचडीएफसी’ बँकेने भारतीय बँकिंग क्षेत्रात स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटवला. बँकेजवळ असलेल्या ठेवीवर नव्हे, तर सातत्यपूर्ण अशा रोख रकमेच्या प्रवाही मत्तांवर कर्जे द्यायला हवीत, हे धोरणातील सातत्य ‘एचडीएफसी’ बँकेच्या यशामागील रहस्य आहे. गुणवत्ता पूर्ण बँकिंग सेवा पुरवणे आणि गुंतवणूकदारांना योग्य परतावा मिळण्यासाठी नफ्यात सातत्य राखणे, यामुळे ‘एचडीएफसी’ बँकेची सातत्यपूर्ण वाढ आजवर झाली आहे, असे असले तरीदेखील गेल्या काही वर्षांमध्ये ‘एचडीएफसी’ बँकेची राष्ट्रीय बाजार निर्देशांकावरील कामगिरी ही फारशी समाधानकारक नव्हती. खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये असणारी तीव्र स्पर्धा, गुंतवणूकदारांची मानसिकता, गुंतवणुकीसाठी उपलब्ध असणारी साधने आणि ग्रामीण भागात ‘एचडीएफसी’ बँकेचे नगण्य असे अस्तित्व या घटकांमुळे ‘एचडीएफसी’ बँकेला भविष्यात अधिक कार्यक्षम व्हावे लागेल.
‘कोविड’काळात ‘एचडीएफसी’ बँकेने सामाजिक बांधिलकी दाखवत केलेले आर्थिक सहकार्य आणि २०३२पर्यंत कार्बन विरहित कामकाज करण्याची केलेली घोषणा यामुळे ‘एचडीएफसी’ बँकेचे भारतातील बँकिंग क्षेत्रातील कार्य लक्षवेधक अशा स्वरूपाचे राहिलेले आहे. बँकेच्या विलीनीकरण धोरणाचा दीर्घकालीन परिणाम वायदे बाजारावर भविष्यात दिसून येईलच. मात्र, ठेवीदारांच्या ठेवी, त्यावरील व्याजदर, बँकेमार्फत पुरवण्यात येणार्या सोईसुविधा आणि इतर नियम व अटी यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. त्यामुळे या बँकेचे ठेवीदार तसेच गुंतवणूकदार यांना कुठल्याही तत्कालीक स्वरूपाच्या परिणामांचा सामना करावा लागणार नाही. मात्र, बँकेचे भविष्यातील व्यवस्थापन आणि वायदे बाजारातील ‘एचडीएफसी’ बँकेचे भविष्यातले स्थान यावर मात्र दीर्घकालीन परिणाम संभवतात.
अपर्णा कुलकर्णी