चेन्नई : तामिळनाडूतील सेलममध्ये एका महिलेने आपल्या मुलाच्या कॉलेजची फी भरण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. पपाथी असे महिलेचे नाव आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ती साफसफाईची कामे करायची. पीडित महिलेला कोणीतरी सांगितले होते की तिचा मृत्यू झाला तर सरकार तिच्या मुलांना भरपाई देईल. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ही घटना २८ जून रोजी २०२३ रोजी घडली.
या घटनेच्या व्हिडिओमध्ये एक महिला रस्त्याच्या कडेला चालताना दिसत आहे. मात्र बस येत असल्याचे पाहून ती महिला रस्त्याच्या मधोमध जाते आणि बसच्या अगदी समोर येते. भरधाव वेगाने येणाऱ्या बसने धडक देताच महिला खाली पडली. ही धडक इतकी जोरदार होती की महिलेचा जागीच मृत्यू झाला. पपाथी १५ वर्षापासून तिच्या पतीपासून वेगळी राहत होती. ती एकटीच मुलांचे संगोपन करत होती. मुलाची फी भरू न शकल्याने ती डिप्रेशनमध्ये होती.
दरम्यान, तिचा मृत्यू झाला तर तिच्या कुटुंबाला सरकार ४५ हजार रुपये नुकसानभरपाई देईल, असे सांगून काही व्यक्तीने तिची दिशाभूल केली होती. मुलाची फी भरण्यासाठी महिलेने आत्महत्येचा मार्ग निवडला. यानंतर बससमोरच महिलेचा मृत्यू झाला. पोलिस सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात येत आहे की, अपघाताच्या दिवशी महिलेने दुसऱ्या बससमोर येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी तिला दुचाकीची धडक बसली. मात्र दुसऱ्या प्रयत्नात तिला तिचा जीव गमवावा लागला.
याप्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, पीडित महिला पपाथीची मुले कॉलेजमध्ये शिकतात. मुलगी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. एक मुलगा पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आर्किटेक्चरचे शिक्षण घेत आहे. महिलेच्या गरीब कुटुंबाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळेच तिची दिशाभूल करण्यात आली. याप्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान पपाथीच्या मुलाना फी भरण्यासाठी आत्महत्या केल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.