मुंबई : झी मराठी वाहिनीवरील खुप्ते गुप्ते या मालिकेत अभिनेते व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी हजेरी लावली आहे. यावेळी सुत्रसंचालक अवधुत गुप्ते यांनी त्यांना डॉक्टर असल्यामुळे तुमचा एका दिवसाचा पगार आणि तुमच्या इतर डॉक्टर मित्रांचा पगार किती आहे असा प्रश्न विचारला. यावर कोल्हेंनी अतिशय हुशारीने उत्तर दिले आहे. अमोल कोल्हे यांनी केईएम मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं. शिकतानाच त्यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला. नंतर त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, पण करिअर म्हणून अभिनयक्षेत्र निवडलं.
अवधूत गुप्तेने कोल्हेंना विचारलं की, “केईएमच्या मेडिकल कॉलेजमधील तुमच्या बॅचचे गेट टुगेदर नक्की होत असेल. आता जेव्हा त्यावेळचे ५० मित्र भेटत असतील, त्यापैकी १०-१५ तरी मोठे-मोठे सर्जन झाले असतील. त्यांचा पर डे (एका दिवसाचा पगार) जास्त असतो की तुमचा जास्त असतो?” असा प्रश्न विचारला असता त्यावर कोल्हे म्हणाले “पर डे त्यांचा जास्त असतो. फक्त ते जेव्हा कुठे बाहेर जातात, त्यांना व्हिजीटिंग कार्ड द्यावं लागतं आणि जेव्हा मी जातो, तेव्हा लोकांना मी येतोय हे कळलेलं असतं.” कोल्हेंच्या या उत्तरावरुन कोल्हे डॉक्टर या त्यांच्या पेशापेक्षा अभिनेता म्हणून जास्त लोकप्रिय आहेत आणि त्यांच्या पर डे हा त्यांना भेटायला आलेल्या व्यक्तींची आपुलकीच आहे असे दिसून येते.