यंदा जवळपास दोन आठवडे उशिराने दाखल झालेला वरुणराजा सरासरी गाठत असतानाच, पावसाळी पर्यटनालाही उधाण आले आहे. ‘विकेंड’ला धबधबा आणि तलाव क्षेत्रात तुफान गर्दी जमा होत असून, धोकादायक ठिकाणी पाण्याच्या खोलीचा किंवा प्रवाहाचा अंदाज न येताच अनेकजण पाण्यात उतरण्याचे धाडस करतात. त्यातूनच दरवर्षी एक ना अनेक दुर्घटना घडत आहेत. त्यात वाढ होत जाणे ही अभिमानाची बाब नक्कीच नाही. गेल्या तीन वर्षांत पावसाळी पर्यटनाचे सरासरी ५० पेक्षाही अधिक मृत्यू झाले आहेत. त्यात काहीजण पोहोता येत नसतानाही किंवा मनाई केलेली असूनही पाण्यात उतरतात. त्यातच चिखलात रुतल्यामुळे किंवा खडकावर आदळल्याने मृत्युमुखी पडतात. अन्य देशात आणि प्रांतातही पावसाळी पर्यटन केले जाते. परंतु, तेथे घडणार्या घटना अत्यल्प असतात. मात्र, आपल्याकडे विशेष करून रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात पावसाळी पर्यटनाच्या सर्वाधिक दुर्घटना घडत असतात. त्यात एकाच कुटुंबातील अनेकांचा समावेश असतो, ही बाब अत्यंत क्लेषदायक ठरते. अनेकदा काही मित्र, मैत्रिणी शाळा, कॉलेजला दांडी मारून घरी न सांगताच परस्पर पावसाळी पर्यटनाला जातात. दुर्दैवाने तेथेच काहीतरी दुर्घटना घडून हे युवक संकटात सापडतात. या घटनांमुळे अनेकदा ही मुलं कायद्याच्या कचाट्यातही अडकतात. पावसाळी पर्यटनाची ज्यांना आवड आहे, त्या सर्वांनी ते करावे, मात्र खबरदारी आणि जबाबदारीने करणे कधीही योग्यच आहे. दरवर्षी पहिल्या पावसातचनवी मुंबई आणि रायगडातील पावसाळी धबधब्यांच्या क्षेत्रात जाण्यास मनाई करण्यात येते. त्यातही काहीजण छुप्या मार्गाने या ठिकाणी घुसखोरी करतात. ऐवढेच नाहीतर त्या ठिकाणी होत असलेला धिंगाणा नकोसा ठरतो. मद्याची उधळण आणि नाचगाण्यांचा धुमाकूळ यामुळे तेथील निसर्गसंपदा नष्ट होते. तसेच, मद्यप्राशन करणारे हुल्लडबाज त्याच ठिकाणी बाटल्या फेकून तसेच अन्य कचरा सोडून देतात. त्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. त्यामुळे ज्यांना खर्या अर्थाने पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटायचा असतो, त्यांचा भ्रमनिरास होतो. त्यामुळे पर्यटन साक्षरता काळाची गरज आहे.
पावसाळा सुरू होताच स्टंटबाजांचे अमाप पीक निर्माण होते. स्टंटबाज केवळ स्वत:चाच नाहीतर इतरांचाही जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करतात. एकीकडे स्टंट आणि दुसरीकडे त्याचा व्हिडिओ किंवा सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात अनेक स्टंटबाज जखमी झाले आहेत, तर काही जीवानीशी गेले आहेत. या घटना दरवर्षी पावसाळ्याच्या कालावधीत घडत असतात. पावसाळासुरू होताच अनेकजण डोंगरदर्यांतील हिरवळ, धबधबे येथे आवर्जून जातात. तेथे गेल्यावर उंच ठिकाणी जायचे काहीतरी स्टंट करायचा आणि तो करताना फोटोसेशनही करायचे. एकाने केले की दुसरा करतो, अशी ही साखळी सोशल मीडियावर सुरूच असते. गेल्याच आठवड्यात उंच डोंगरावर चढलेल्या एका युवकाने व्हिडिओ कॉल करून आपल्या मित्रांना स्टंट दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यात पावसाळ्यामुळे निसरड्या झालेल्या दगडावरून तो दरीत कोसळला. त्याच्या पायाचे हाड मोडले. येताना तो आपल्या दुचाकीवर आला. मात्र, स्टंट केल्यामुळे जाताना त्याला रुग्णवाहिकेतून घेऊन जावे लागले. आणखी एका घटनेत कर्नाळा परिसरात डोंगरदर्यात भटकंती करायला गेलेला युवकांचा समूह वाट चुकला. त्या ठिकाणी त्यांचे मोबाईलही बंद आणि त्या डोंगरदर्यांतून बाहेर कसे पडावे, यासाठी कुणी वाटाड्याही नाही. अनेक तासांच्या भटकंतीनंतर त्यातील एकाच्या मोबाईलवर नेटवर्क आले आणि त्यांनी संबंधित यंत्रणेला फोन करून मदत मागितली. त्यानंतर त्यांची सुटका झाली. अशा घटना आपल्याकडे अधूनमधून घडतच असतात. या घटनांच्या जोडीला स्टंटबाज आणि रील्सवेडे यांची भर पडल्यामुळे ही मंडळी प्रत्यक्ष पर्यटनाचा आनंद लुटण्याऐवजी स्टंट करून तो इतरांना पाठवून त्यास किती प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळत आहे, यातच व्यस्त राहतात. या मंडळींना प्रत्यक्ष पर्यटनाचा आनंद लुटता येत नाही. मात्र, त्यांच्या उपद्व्यापामुळे ज्यांना पर्यटनाचा येथेच्छ आनंद लुटायाचा असतो, त्यांना मात्र नाहक त्रास होत असतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, कर्नाळा पक्षी अभयारण्य ही केवळ एक उदाहरणे म्हणून पाहिले तरी या ठिकाणी येणारे अनेक जण केवळ फोटोसशनसाठीच येतात आणि गोंधळ घालून निघून जातात, अशा मंडळींचे प्रबोधन करणेही कठीण आहे.
मदन बडगुजर