फलटणमध्ये काही वर्षांपूर्वी ‘टेनिस कोर्ट’ सुरू करण्यात आले. या अत्यंत महागड्या खेळाची ओढ त्यावेळीच्या शाळकरी मुलांना लागली आणि त्यातून एक आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाला. अशा या ऑलिम्पिकसाठी सराव करणार्या विश्वजित सांगळेची ओळख करुन देणारा हा लेख...
स्वप्न कुणाला नसतात? त्यांच्यामागे वेड्यासारखे पळण्याचे कष्ट मात्र फारसे कुणी घेत नाहीत. स्वप्न अशी आयुष्याच्या वाटेवर विरून जातात. माणसं गाव सोडतात, शहरांचा रस्ता धरतात; पण एक स्वप्नवेडा मुलगा आईवडिलांसोबत मुंबईत राहत असूनसुद्धा गावी धाव घेतो. कशासाठी? तर टेनिससाठी. शाळेत शिक्षकांचे शिकवणे आवडत नाही किंवा कुटुंबासोबत नव्या नोकरीच्या ठिकाणी जावे लागणे, अशा कारणामुळे शाळा सोडणारे आहेत; पण सहजासहजी शाळा बदलणे आपल्या शिक्षण संस्कृतीत नाही. विश्वजित एका खासगी शाळेत शिक्षण घेत होता. परंतु, ती शाळा अर्धा तास उशिरा सुटत असल्याने त्याने सरकारी शाळेत प्रवेश घेतला. एवढंच नाही तर केवळ खेळण्याच्या वेडापायी त्याने शिक्षणाच्या दर्जासोबत तडजोड केली.
सातार्याजवळ फलटण येथे इयत्ता सहावीपर्यंत त्याने शिक्षण घेतले. फलटणजवळ ’टेनिस कोर्ट’ सुरू झालं होतं. मातीचे कोर्ट्स होते. त्यासाठी त्याच्या मुंबई-फलटण वार्या व्हायच्या. टेनिसचे वेड जरी बालपणात लागलं, तरी सुरुवात झाली होती, ती ’मल्लखांब’ आणि योगसाधनेपासून. जर कुणी सांगितलं की, वेळ जात नाही, म्हणून एखादी गोष्ट सुरू करावी आणि तिची इतकी सवय व्हावी की, आपण तिच्यासोबत आयुष्याची स्वप्नं पाहावीत. वर्गात कंटाळा येतो, म्हणून त्याने ’टेनिस’ खेळायला सुरुवात केली. ’टेनिस’च्या ’रॅकेट्स’ महाग असायच्या. मग ’रॅकेट’ महिन्यासाठी भाड्यावर घ्यायची. कोणी खाऊसाठी पैसे दिले की, २० रुपये जमवायचे आणि महिन्यासाठी ’रॅकेट’ भाड्यावर घ्यायची, असा त्याचा सराव सुरू होता. त्याला एकदा त्याच्या बाबांनी ७६८ रुपयांची ’रॅकेट’ गिफ्ट दिली होती. आज ती अजूनही त्याच्याकडे आहे. सातवीनंतर त्याने शाळा सोडली. ती त्याची शेवटची शाळा. त्यानंतर त्याने बाहेरून परीक्षा दिल्या. घरी वेळ मागून घेतला, ’टेनिस’साठी. त्या काळात भारतातील ’टेनिस’च्या रँकिंगमध्ये प्रथम ५०० मध्ये विश्वजित होता. त्यानंतर ’इंटरनॅशनल टेनिस फेडरेशन’कडून एक पत्र आलं, विश्वजितचा टेनिस प्रवास असा सुरू झाला.
आता भारताबाहेर जाऊन खेळायचे आहे. पण, पैसे नाहीत, प्रायोजक नाहीत. तेव्हा कसं व्हायचं? मधुकर तळवलकर यावेळी त्याच्या मदतीला आले. ७७ हजारांची मदत तेव्हा मोठीच होती. त्यांनी केलेली ही पहिली मदत. आंतरराष्ट्रीय दौर्यानंतर मात्र सगळं बदलत गेलं. माध्यमांनी त्याच्याकडे लक्ष वेधलं. प्रायोजक स्वतःहून विचारू लागले. पहिली आंतरराष्ट्रीय सामना रशियात झाला. तेव्हा श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला. थंड हवेच्या ठिकाणी किंवा समुद्रसपाटीपासून उंच गेल्यावर प्राणवायू कमी असल्याने श्वसनाचा त्रास होतो. थंडी फार असल्याने हा त्रास जाणवत असावा असे वाटले. परंतु, हा ’लॅक्टोफोबिया’ होता. आज त्याला सर्व ‘व्हिगन टेनिस’ खेळाडू म्हणून ओळखतात. ’व्हिगन’ ही संकल्पना काही नवीन नाही; पण ती भारतीय खचितच नाही. पूर्ण शाकाहारी म्हणजे अगदी प्राण्यांपासून मिळणारी उत्पादने जसे की, अंडी दूध, मांस आणि रेनेट यांचासुद्धा आहारात समावेश न करणे म्हणजे ’व्हिगन.‘ आपल्या आहारासाठी प्राण्यांना त्रास नको, म्हणून संपूर्ण शाकाहार तसेच दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी म्हणून दूध व त्यापासून बनवलेले सर्व पदार्थ आहारातून वर्ज्य. गंमत म्हणजे, विश्वजितला त्यानंतर आपल्या आहारतज्ज्ञांनी ’व्हिगन डाएट’ द्यायला सुरुवात केली.
’टेनिस’च्या सरावासोबतच विश्वजित एका माहितीपटावर देखील काम करतोय. हा माहितीपट खेळावरच चित्रित होणार आहे. मात्र, तो विश्व जिंकायची स्वप्न पाहतोय. त्याला ‘ऑलिम्पिक’ला खेळायचंय, त्यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत. त्याने ’एस्पेरेर’ ही कंपनी चालू केली. या माध्यमातून त्याने अनेक उपक्रम हाती घेतले. चार आंतरराष्ट्रीय स्पर्धा फ्रान्समध्ये तो खेळला. तिथे फ्रेंच भाषेचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. या भाषेतलाच शब्द त्याने आपल्या संस्थेसाठी वापरला. आगामी चार वर्षांत आपल्या संस्थ्येसाठी काम करून त्यानंतर ’टेनिस’च्या सरावाला सुरुवात करण्याचा त्याचा मानस आहे. आपल्या खेळातून देशाचे, राज्याचे आणि कुटुंबाचे नाव अभिमानाने झळकवणार्या विश्वजितला अनेक सन्मान मिळाले आहेत. त्याच्याकडे अनेक राष्ट्रांतून खेळलेल्या ‘टेनिस’ स्पर्धांची प्रशस्तिपत्रके आणि पदके आहेत. ऑलिम्पिकसाठी सराव करताना आपल्या राष्ट्रासाठी तो नक्कीच पदके मिळवून देईल, ही आशा व्यक्त करत दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे त्याला अनेकानेक शुभेच्छा.
मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.