‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ आणि आपण...

    16-Jul-2023
Total Views | 128
Article On Maharashtra Government ShivChhatrapati Sports Award

राज्य शासनाकडून दिला जाणार्‍या ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारां’ची घोषणा १४ जुलै रोजी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी केली. त्यानिमित्ताने क्रीडा क्षेत्राकडे समाजाचा बदललेला दृष्टिकोन आणि क्रीडा पुरस्कारार्थींची थोडक्यात ओळख करुन देणारा हा लेख...

राज्य शासनाकडून दिला जाणार्‍या ’शिवछत्रपती राज्य क्रीडा‘ पुरस्कारांची घोषणा शुक्रवार, दि. १४ जुलै रोजी क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन यांनी घोषणा केली आणि राज्यातील सर्व क्रीडा क्षेत्रात आनंद पसरला. शाळेत असताना स्नेहसंमेलनामध्ये मिळालेले एक छोटे प्रशस्तिपत्रक घेऊन घरी आलेला एक मुलगा घरी आल्या-आल्या आधी आपल्या आई-बाबांना, घरच्या मोठ्यांना, भावंडांना, शेजारच्या काका-काकूंना अभिमानाने दाखवत मोठ्यांकडून शाबासकी घेत हातावर काहीतरी गोड घेत असतो. तेव्हापासून त्या मुलाचे क्रीडाविश्व बहरायला सुरुवात होते. मग पुढे गणेशोत्सव किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या लहान-मोठ्या क्रीडास्पर्धेत तो सहभागी होऊ लागतो अन् तेव्हापासून त्याला आपल्या लाडक्या क्रीडा प्रकारात गोडी वाढू लागते.

शैक्षणिकदृष्ट्या मुख्यतः दोन प्रकारचे विद्यार्थी असतात. एक ’हुशार’ व दुसरा ’ढ.’ शाळेतील आपले प्रगतिपुस्तक अभिमानाने सगळ्यांना दाखवणारी मुले असोत अथवा आपले शाळेतले प्रगतिपुस्तक गुपचूप फक्त आईला दाखवत तिची स्वाक्षरी घेऊन शाळेतील आपल्या वर्गशिक्षकांना दुसर्‍या दिवशी परत करणारा ’ढ’ असो, यातील काही नोकरीधंद्यात आपले नंतरचे जीवन व्यतित करत समाधानाने वावरतात. ’हुशार’ विद्यार्थ्यांनी नंतर आपल्या पालकांच्या पसंतीच्या नोकर्‍या मिळून जातात; पण दुसरा ’ढ’ मात्र नोकरी मिळवण्यात मागे पडतो. आज मात्र तसे राहिलेले नाही. जेमतेम काठावर पास होणारा विद्यार्थी आता तेवढाच वाखाणला जात आहे की, जेवढा एखादा हुशार विद्यार्थी. या ’स्कॉलर’ विद्यार्थ्यांची मान ताठ होताना, तो आपल्या शर्टाची कॉलर ताठ करतोय; पण काही विद्यार्थी आपली शर्टाची कॉलर ताठ तशी करू शकले अथवा नाही, तरी त्यांच्या शर्टाची कॉलर कायमच ताठ ठेवायची, संधी आजकाल मिळू लागली आहे. ती आपल्या क्रीडा नैपुण्याने, गळ्यात घालण्यात येणार्‍या पदकांनी!

स्नेहसंमेलनामध्ये मिळवलेले पदक अभिमानाने कॉलर ताठ करून वावरणारा विद्यार्थी आता स्थानिक पातळीवरील पदकांनंतर पायर्‍या-पायर्‍या चढत ’ऑलिम्पिक’ पदक गळ्यात घेत स्वतःची, घरच्यांची, राज्याची व नंतर राष्ट्रप्रमुखांचीदेखील कॉलर ताठ करू लागला आहे. सरकार त्याला आता प्रोत्साहन देऊ लागलं आहे. ’ध्यानचंद पुरस्कार’, ’अर्जुन पुरस्कार’ अशा विविध पुरस्कारांची पदके गळ्यात मिरवून देत कॉलर ताठ करण्यात, या राज्य शासनाकडून दिला जाणार्‍या ’शिवछत्रपती राज्य क्रीडा’ पुरस्काराचाही मोठा सहभाग असतो. राज्यातील क्रीडा व युवक कल्याणमंत्री यांंच्यासह क्रीडाधिकारीदेखील आपली कॉलर ताठ करतात. कारण, त्या यशात त्यांचाही पाल्य व पालकांएवढाच सहभाग असतो.

पालक मुलांना खेळामध्ये करिअर घडवण्यास सहजी तयार होत नाहीत; पण अलीकडच्या काळात पालकांचाही क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. आज विद्यार्थ्यांनी खेळात चांगले प्रावीण्य मिळविले, तर तो विद्यार्थी भविष्यात खेळामध्येच चांगले करिअर करू शकतो. शारीरिक कौशल्ये आणि क्षमता भरपूर असलेल्या मुलांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास असतो. नव्या-नव्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता असते. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महाराष्ट्र राज्यातील गुणवान खेळाडूंना महाराष्ट्र शासनातर्फे दिले जाणारे पुरस्कार व्यक्तिगत स्वरूपात देण्यास १९६९-७० सालापासून प्रारंभ झालेला आपल्याला आढळेल. ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव’ पुरस्कारांतर्गत ’दादोजी कोंडदेव’, ’जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला)’ आणि ’एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (अपंग खेळाडू)’ असे आणखी विविध राज्य क्रीडा पुरस्कार पात्र व्यक्तींना देण्यात येतात. या पुरस्कारांची निवड समिती, क्रीडांचे प्रकार, पुरस्कारकर्त्यांची निवड, गुणांकन पद्धती, पारितोषिकांची रक्कम इत्यादींसंबंधी या पुरस्कारांच्या स्थापनेपासून आतापर्यंत त्या संदर्भातील नियमांत अनेक बदल/सुधारणा करण्यात आल्या आहेत.

पूर्वी पुरस्कार विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र, शाल व प्रवासखर्च देण्यात येत असे. भरीव रक्कम पुरस्कारापोटी दिली जात नसे. सध्या मात्र स्मृतिमानचिन्ह व प्रमाणपत्राबरोबरच भरीव रक्कमही देण्यास सुरुवात होत होत नंतर राज्यात जेव्हा तत्कालीन क्रीडामंत्री विनोद तावडे होते, तेव्हा राज्य शासनामार्फत देण्यात येणार्‍या ‘शिवछत्रपती क्रीडा’ पुरस्काराच्या बक्षीस रकमेत आणखीन वाढ करण्यात आली होती. ’शिवछत्रपती’ पुरस्कारांच्या निवडीत होणारे वाद टाळण्यासाठी आणि पारदर्शकता आणून योग्य त्या खेळाडू-संघटक-मार्गदर्शक यांची निवड केली जात असून, त्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. या पुरस्कारासाठी दि. ३० जून रोजी संपणारे वर्ष धरून त्या पूर्वीच्या पाच वर्षांपैकी तीन वर्षांमध्ये त्या खेळाडूने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर केलेल्या कामगिरीचे व क्रीडानैपुण्याचे मूल्यमापन केले जाते.

या निकषांवर पारखलेल्या व सर्वोत्तम ठरणार्‍या खेळाडूंची पुरस्कारासाठी निवड केली जाते. त्याचबरोबर राज्य क्रीडा संघटनांकडून आलेल्या शिफारशींचा आणि खेळाडूंनी वैयक्तिकरित्या सादर केलेल्या अर्जांचाही विचार केला जातो. शासनाने नियुक्त केलेल्या समितीतर्फे सर्व शिफारशींची व अर्जांची छाननी केली जाते. ही समितीच ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा’ पुरस्काराचे मानकरी निश्चित करते. पुरस्कार योजनेच्या पहिल्या वर्षी म्हणजे १९६९-७० साली फक्त सहा क्रीडापटूंनाच हे पुरस्कार देण्यात आले. त्यांत पाच पुरूष व एक स्त्री खेळाडू होते. त्या वर्षी ’जलतरण’, ’बॅडमिंटन‘, ’कबड्डी’, ’खो-खो‘, ’कुस्ती’ व ’बिल्यर्ड्झ’ या सहा क्रीडाप्रकारांचाच विचार करण्यात आला होता. त्यानंतर क्रीडाप्रकारांची व पुरस्कारांची संख्या वाढत गेली. त्यामध्ये नाशिकच्या साहेबराव पाटील यांचा समावेश होता. यावेळी पुरस्कार पटकवताना विविध क्रीडा प्रकार आपण बघू शकतो. त्यासाठी आपण खालील दोन उदाहरणे बघता आपल्याला आढळून येईल की, क्रीडेकडे बघण्याचा सगळ्यांचाच दृष्टिकोन कसा बदलत चालला आहे.

आतापर्यंत बहुतांश पालक हे ठरावीक क्रीडाप्रकारात सहभाग घेण्यास आपल्या पाल्याला प्रवृत्त करत असत, जसे की क्रिकेट. पण, पुण्यातल्याच या उदाहरणांवरून सरकार देत असलेल्या पाठिंब्यावर युवकांची प्रगती होताना दिसेल. यावेळी एकूण क्रीडाप्रकारांतील राज्यातील बाकीच्या ठिकाणांच्या जोडीनेच पुणे शहर आणि जिल्ह्यातील २८ जणांचा त्यात समावेश आहे. पुण्यात विविध क्रीडाप्रकारांनी सहभाग घेतला असला, तरी त्यातील काही नामांकित संघटना व त्यातील सगळेच सरस कामगिरी करताना आढळतील. त्यामध्ये प्रामुख्याने ’खो-खो’च्या नवमहाराष्ट्र संघाचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. ’खो-खो’च्या नवमहाराष्ट्र संघाच्या प्रतीक वाईकर २०१९-२०, अक्षय गणपुले २०२१-२२ यांना खेळाडू म्हणून, तर शिरीन गोडबोले यांना ’सर्वोत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक‘ (खो-खो) २०१९-२० साठी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. नवमहाराष्ट्र संस्थेचे या पुरस्कारासोबत एकूण १९ पुरस्कार विजेते खेळाडू आणि चार मार्गदर्शक झाले आहेत. कोणत्याही खेळामध्ये एकाच संस्थेने एवढे पुरस्कार मिळविण्याचा नवमहाराष्ट्र संघाने एक नवा विक्रम नोंदविला आहे. या १९ पैकी दहा खेळाडू आणि दोन मार्गदर्शक हे श्रीरंग इनामदार यांचे विद्यार्थी आहेत की, जे स्वतः ’शिवछत्रपती’पुरस्कारासहित ’अर्जुन पुरस्कार’ प्राप्त ’खो-खो’पटू आहेत. हे ’क्रीडा भारती’चे सदस्य तसेच वनवासी कल्याण आश्रम खेलकूद आयामाचे मार्गदर्शकही आहेत.

दुसरे वेगळे उदाहरण घेऊ ते अरहंत राजेंद्र जोशी या युवकाचे. याचे वडील स्वतः आणि अरहंतचे काका हे दोघेही जगप्रसिद्ध धनराज पिल्लेबरोबर ’हॉकी’ खेळलेले क्रीडापटू. अरहंतचे वडील हे पोलीस दलातील निवृत्त उच्चपदस्थ आहेत, तर काका क्रीडावैद्यक विषयातील निष्णात डॉक्टर आहेत. अरहंतच्या वडिलांनी आपली पुढची पिढी क्रीडा क्षेत्रातच असावी, म्हणून त्याला प्रोत्साहित करताना त्याच्यावर ठरावीकच क्रीडा प्रकाराचा आग्रह धरला नाही. अरहंतला बालपणापासून ज्याची ओढ होती, ती ओळखून त्याला ’स्केट्स’वर उभे केले व त्याला ’स्केटिंग’ या क्रीडा प्रकारात प्रोत्साहन दिले. आज ’खो-खो’, ’मल्लखांब’, ’कबड्डी’ हे जसे क्रीडा प्रकार ’ऑलिम्पिक’चे दार ठोठावत आहेत, तसाच अरहंतचाही क्रीडा प्रकार ’ऑलिम्पिक’मध्ये जाऊ बघतोय. तसे होताच आज ना उद्या ’ऑलिम्पिक’चे एखादे पदक पटकावून सगळ्यांची कॉलर तो ताठ करेल हे नक्की.

क्रीडा प्रकाराचे आणखीन वेगवेगळे प्रकार आहेत त्यातील ’इनलाईन फ्रीस्टाईल स्केटिंग’ या नावाने ओळखला जातो. त्यात तो आताच महाराष्ट्रातील स्पर्धा, जागतिक स्पर्धा, विश्वचषक, आशियाई अशा स्पर्धांमधील चाकांवर धावण्याचे कसब दाखवत आहे. आता हा खेळ ’ऑलिम्पिक’मध्ये समाविष्ट होताच अरहंत आपलेही पाय अलगद आत नेऊन देशाची कॉलर ताठ करेल, असा विश्वास आपण बाळगू. पुण्यातील महाराष्ट्र मंडळाच्या क्रीडांगणावर तो सराव करत आहे. ’हॉटेल मॅनेजमेंट’ची पदवी पुण्यातून घेऊन त्याने (खखडच) मुंबई येथून क्रीडा व्यवस्थापनेतील क्रीडाविषयक विविध उपक्रम आखणे, धोरण ठरवणे, सूचना राबवणे आणि या सगळ्यांची अंमलबजावणी करणे, अशी मास्टर्स पदवी संपादन केली आहे. येथे अरहंत सारख्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देऊ.

दोन उच्चशिक्षितांच्या उदाहरणावरून सांगायचा उद्देश असा की, आता खूप खेळ मुलांना उपलब्ध होत आहेत, याची खात्री पालकांनी जरूर बाळगावी. राज्यसरकार क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देत आहे. त्याचा या अशा पुरस्कारांच्या साहाय्याने फायदा घ्यावा व कॉलर ताठ करावी. संघ परिवारातील ’क्रीडा भारती’ ही संस्था क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असते. तेदेखील एक पुरस्कार देत असतात आणि तो म्हणजे शिवछत्रपतींच्या मातोश्रींच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार. प्रत्येक खेळाडूच्या यशामागे त्याच्या आई-वडिलांचा विशेषतः आईचा मोठा वाटा असतो. हे लक्षात घेऊन ’क्रीडा भारती’तर्फे दरवर्षी आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक यश मिळवणार्‍या खेळाडूंच्या मातांचा गौरव केला जातो. तसा आपल्याही आईचा व्हावा, अशी ज्या मुलाची इच्छा असेल, त्यांनी त्वरित ’शिवछत्रपती पुरस्कारा’सारखा पुरस्कार मिळवण्याचे ध्येय बाळगावे आणि त्यासाठी आताच खेळ निवडावा व सरावाला लागावे. होय, एवढे मात्र लक्षात ठेवायचे की, कठोर परिश्रमास पर्याय नाही. मग ते शालेय शिक्षण असो अथवा क्रीडाक्षेत्रातील प्रशिक्षण असो.

श्रीपाद पेंडसे
(लेखक जनजाती कल्याण आश्रम, पश्चिम महाराष्ट्र प्रांत माजी खेलकूद प्रमुख आहेत.)
९४२२०३१७०४
अग्रलेख
जरुर वाचा
भारताचा पाकिस्तानवर

भारताचा पाकिस्तानवर 'डिजिटल स्ट्राइक'! शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर बंदी

(India bans Pakistani YouTube channels) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात एका पाठोपाठ एक कठोर निर्णय घेत पाकिस्तानला मोठे धक्के दिले आहेत. अशातच आता भारत सरकारकडून १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये काही वृत्तसंस्थांसहित माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या युट्यूब चॅनेलचाही समावेश आहे. या चॅनेल्सद्वारे भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांविरोधात प्रक्षोभक माहिती पसरवल्याचा आरोप केला जात आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या शिफारशींवरून ही कारवाई करण्यात आल्याचे ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121