सांस्कृतिक गौरव प्रतिष्ठेचे महापर्व

    14-Jul-2023
Total Views | 191
Aticle On festival of cultural glory In India

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सुत्रे हाती घेतल्यापासून त्यांच्या सरकारची कामगिरी आणि घेतलेल्या निर्णयांमुळे देश-विदेशात भारताची मान उंचावली आहे. पंतप्रधान मोदी यांचा भक्कम आर्थिक प्रगतीवर आधारित असलेला हा नऊ वर्षांचा कालावधी, भारताच्या सांस्कृतिक गौरवाच्या पुनरुज्जीवनाच्या रुपात इतिहासात कायम स्मरणीय असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व लाभलेल्या केंद्र सरकारला आता नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतीय जनता पक्षाचे लाखो कार्यकर्ते विविध कार्यक्रमांद्वारे महाजनसंपर्क अभियान राबवून हे महापर्व साजरे करत आहेत. भारतीय जनता पक्षाद्वारे या एका महिन्याच्या कालावधीत जनसभा, प्रतिष्ठित नागरिकांसह व्यक्तिगत संपर्क, प्रबुद्ध आणि व्यापारी संमेलने, लाभार्थी संपर्क आणि कार्यकर्त्यांच्या सक्रियतेसाठी अनेक उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वात केद्रींय मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, राष्ट्रीय आणि प्रादेशिक प्रदेशांचे पदाधिकारी, प्रदेशांचे माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व खासदार, आमदार हे ‘महाजनसंपर्क अभियान’ यशस्वी करण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहेत.

गेल्या नऊ वर्षांच्या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला लाभलेले यश अतुल्य आहे. गोरगरिबांचे कल्याण करणार्‍या अनेक योजना, जागतिक स्तराच्या पायाभूत अधोसंरचनांचा विकास, देशांतर्गत आणि बाह्य संरक्षण, आर्थिक प्रगती आणि संपूर्ण जगात भारताला मिळत असलेला आदर, या सर्व क्षेत्रात सगळ्याच मंत्रालयांनी अत्युच्च शिखर काबीज केले आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित मायदेशी परत आणणे, यांसारख्या उपक्रमांद्वारे या सरकारने प्रत्येक भारतीयाला गौरवान्वित केले आहे. भक्कम आर्थिक प्रगतीवर आधारित असलेला हा नऊ वर्षांचा कालावधी, भारताच्या सांस्कृतिक गौरवाच्या पुनरुज्जीवनाच्या रुपात इतिहासात कायम स्मरणीय असेल.

जेव्हा परकीय आक्रमणकर्त्यांनी भारतावर आक्रमण करून देशाला पददलित करण्याचे घृणास्पद कार्य केले, आमच्या आस्थेच्या आणि श्रद्धास्थानांची विटंबना केली, त्यांना खंडित केले, तेव्हा भारत देशाच्या आत्म्याने करूण क्रंदन केले होते, अशा वेळी भारताच्या राष्ट्रीय स्वाभिमानाचे पुनरुज्जीवन करण्याचे, त्याला जागृत करण्याचे आणि राष्ट्राचे सांस्कृतिक वैभव पुन्हा प्रस्थापित करण्याचे महतकार्य १७व्या शतकात पुण्यश्लोक प्रातःस्मरणीय देवी अहिल्याबाई होळकर यांनी केले. भारतातील सर्व पवित्र तीर्थस्थळांवर मंदिरांची उभारणी करणे, सर्व नद्यांच्या काठावर घाट बांधणे, प्रवाशांसाठी विहिरी व पाणपोई निर्माण करणे, सर्व मंदिरांमध्ये विद्वानांची नेमणूक करणे, तसेच वेद आणि शास्त्र यांच्या अध्ययनासाठी व्यवस्था करणे, असे अनुकरणीय उपक्रम त्यांनी राबविले.

भगवान केदारनाथ आणि काशी विश्वनाथ मंदिर आजही त्यांची गौरव गाथा मुक्तकंठाने गात आहेत. त्याच धर्तीवर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गुजरातमधील सोमनाथ मंदिराप्रमाणेच गुलामगिरीच्या सर्व प्रतिकांतून भारताची मुक्तता व्हायला हवी होती. परंतु, तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली भारतीयांचा स्वाभिमान पायदळी तुडविण्याचे काम सुरूच राहिले. हिंदू स्वाभिमानाला लाथाडणे आणि अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करणे, हीच धर्मनिरपेक्षतेची ओळख बनली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निष्पक्ष विकासासोबतच भारताच्या सांस्कृतिक गौरवाचे पुनरुज्जीवन करण्याचे महान कार्य ही केले आहे, जे १७व्या शतकाच्या नंतरच्या इतिहासात पुण्यश्लोक प्रातःस्मरणीय देवी अहिल्याबाई होळकर यांच्याप्रमाणेच मोदींचे नावदेखील गौरवाने घेतले जाईल.

अयोध्येत भगवान श्रीरामाचे मंदिर भव्य स्वरुपात निर्मित होत आहे. लवकरच भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल. केवळ मंदिरच नाही, तर अवघी अयोध्या नगरी संपूर्ण जगासाठी पवित्र आणि दर्शनीय होणार आहे. भगवान विश्वनाथांच्या नगरीत काशीनाथ लोक भव्य स्वरुपात निर्मित करण्यात आले आहे. मंदिराच्या परिसरातूनच गंगा मातेचे भव्य आणि मनमोहक दर्शन होते. हिमालयातल्या केदारपुरीचे दर्शन जीवनाच्या सत्यतेचे दर्शन घडवते. जगद्गुरु शंकराचार्य यांची भव्य प्रतिमा देशाच्या एकात्मतेचे साक्षात प्रतीक आहे. तेथे ध्यानस्थ पंतप्रधानांची ती गुहा एक पवित्र स्थळ बनली आहे. उज्जैन येथील महाकाल लोक येथे भेट देणार्‍या यात्रिकांच्या संख्येचे सर्व विक्रम मोडून भव्यतेचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

आदिजगद्गुरु शंकराचार्यांनी स्थापन केलेले, जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ कुपवाडा जिल्ह्यात असलेले २ हजार, ४०० वर्ष जुने शारदा पीठ मंदिर आहे. या शारदा मातेच्या मंदिराचे दरवाजे ७० वर्षांनंतर उघडले असून, तेथे आता नियमित पूजा-अर्चा सुरू झाली आहे. गुजरातच्या पावगड येथील महाकाली मंदिरात ५०० वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्म ध्वज पुन्हा फडकवला आहे. कावड यात्रेवर पुष्प वृष्टी, भव्य कुंभमेळा, अमरनाथ यात्रा सुरक्षित करणे, या सर्व गोष्टींमुळे यात्रिकांमध्ये विश्वास निर्माण होत आहे. शंकराचार्यांच्या स्मरणार्थ मध्य प्रदेशातील ओंकारेश्वराचे अद्वैत केंद्र भव्य आकार घेत असून, ते लवकरच पूर्णतेच्या दिशेने वाटचाल करत आहे.

आपल्या जागतिक दौर्‍यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधील तोजी बौद्ध मंदिर, किनकाकू मंदिर, मॉरिशसमधील शिव मंदिर, श्रीलंकामधील नागुलेश्वम मंदिर, महाबोधी मंदिर, कॅनडातील प्रसिद्ध लक्ष्मी नारायण मंदिर, गुरुद्वारा खालसा दिवान, बांगलादेशमधील दक्षिणेश्वर मंदिर, म्यानमारमधील आनंद मंदिर, नेपाळमधील पशुपतिनाथ येथे चंदनाच्या लाकडाची भेट दिली आणि जनकपूरमधील जगत्जननी माता सीतेच्या मंदिराचे दर्शन घेतले, ओमान आणि मस्कत येथील प्रसिद्ध मंदिरात दर्शन घेतले. दुबईतील मंदिराचे बांधकाम हे दोन्ही देशांमधील सौहार्द्राचा सेतू आहे, असे वर्णन त्यांनी केले. अफगाणिस्तानमधून पवित्र गुरू ग्रंथ साहिब सुरक्षित परत आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे जगभरातील शीख समुदायात सांस्कृतिक मूल्यांवर गाढ विश्वास व्यक्त झाला आहे. जगभरातून भारतात येणार्‍या राजनायकांचे स्वागत करताना कर्मयोगाची प्रेरणा देणारा ग्रंथ भगवद्गीता भेटवस्तू म्हणून देण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे.

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदिवासी गौरव दिनाची घोषणा, महान संत कबीरदासजींच्या पवित्र स्थळाला भेट, संत रविदासजींच्या मंदिरात पूजा-अर्चा, पवित्र गुरुद्वाराला वंदन करणे आणि लंगर वितरित करणे, पंढरपूरात भक्त वेशात हजेरी, भगवान महात्मा बुद्ध, थोर संत शंकरदेव यांचे पुण्यस्मरण यांसारखे अनेक प्रयत्न, देश, धर्म, संस्कृती आणि समाजसुधारणेसाठी ज्या महापुरुषांनी आपले आयुष्य वेचले, त्या महापुरुषांबद्दल समाजाला प्रेरणा देणारे ठरले आहेत.

संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी असणारा योग आणि आयुर्वेदाचा अनमोल वारसा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. योग हा आज संपूर्ण जगाच्या आकर्षणाचा विषय झाला आहे. योग हा निरोगी आणि संतुलित जीवनाचा आधार बनला आहे. दि. २१ जून हा दिवस जगभरात योग दिन म्हणून साजरा केला जातो. अंदाजे ३० कोटी लोक आता जगभरात योगाभ्यास करत आहेत. ‘वेलनेस ’आणि ’फिटनेस’ क्षेत्रांमध्ये भरभराट होण्याचे प्रमुख कारणही योग आहे. गंगा शुद्धीकरण करण्यासाठी सक्रिय प्रयत्न, जपानच्या पंतप्रधानांनी केलेल्या आई गंगेच्या आरतीने तमाम गंगाप्रेमींना गंगा आणि इतर सर्व नद्यांची स्वच्छता आणि नद्यांकडे बघण्याची पवित्र दृष्टी दिली आहे. भारतातील पवित्र गंगा नदीचे आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने करण्यात येणारा हा प्रकल्प संयुक्त राष्ट्राद्वारे मान्यता दिलेल्या जगभरातील अग्रणी दहा उपक्रमांपैकी एक आहे. ज्यामुळे निसर्गाचे पुनर्संचयन होणार आहे. आयुर्वेदासाठी अधिक आर्थिक तरतूद करून आयुर्वेदाच्या वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. आयुष मंत्रालयाचे बजेट आता ३ हजार, ५० कोटी आहे. जगातील आठ देशांमध्ये ५०हून अधिक आयुर्वेदिक उत्पादने रजिस्टर झाली आहेत. ‘डब्ल्यूएचओ’द्वारे मान्यताप्राप्त जगातील पहिले केंद्र पहिले केंद्र ‘डब्ल्यूएचओ ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन’ गुजरातच्या जामनगरमध्ये सुरू झाले आहे.

भारतीय स्वाभिमानाचे प्रतीक असलेला आणि भारतातून चोरून नेलेला भारतीय वारसा परत आणण्याचा प्रयत्नदेखील उल्लेखनीय आहे. १९७६ ते २०१३ या कालावधीत एकूण १३ वस्तू भारतात परत आणल्या गेल्या. तसेच, २०१४ नंतर आतापर्यंत २३५ वस्तू परत आणण्यात आल्या आहेत. हे जगभरात भारताच्या वाढत्या प्रभावाचे द्योतक आहे. संसदेतील सेंगोलच्या प्रतिष्ठेमुळे प्राचीन परंपरा पुनर्जीवित झाली आहे. आपल्या महान संस्कृतीच्या माध्यमातून आम्ही जगाला भोगमुक्त त्याग-केंद्रित जीवनशैली, संघर्षाऐवजी समन्वय, द्वेषाऐवजी प्रेम, सहकार्य आणि सहिष्णुता यासारखे प्रदान करू शकतो. स्वामी विवेकानंद यांच्या अमेरिकेत केलेल्या भाषणांचे आणि सर्व आध्यात्मिक संतांच्या प्रवचनांचे सार हेच आहे. पंतप्रधान मोदींनी केलेले सांस्कृतिक जागरण या दिशेत उचललेले एक अनुकरणीय आणि सार्थक पाऊल आहे, ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो.

शिवप्रकाश
(लेखक भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री आहेत.)


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121