क्रिकेटर, उत्तम प्रशासक आणि क्रीडा पत्रकार असे त्रिगुणसंपन्न क्रीडा भक्त प्रल्हाद नाखवा या ठाणेकर भूमिपुत्राविषयी....
ठाण्याच्या चेंदणी कोळीवाड्यातील पहिले ऑनर्स पदवीधर असलेले प्रल्हाद बाळाराम नाखवा यांचा जन्म दि. २९ ऑक्टोबर १९४८ साली झाला. बालपणापासूनच धडपड्या स्वभावाच्या प्रल्हाद यांनी ठाणे पूर्वेकडील नगरपालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण, तर मो. ह. विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. १९६५ साली शालांत परीक्षा (अकरावी) उत्तीर्ण झाल्यानंतर १९६९ साली मुंबईतील शीव येथील एसआयईएस महाविद्यालयातून ‘बी.ए’ ऑनर्स पदवी मिळवून चेंदणी कोळीवाड्यातील पहिले ऑनर्स पदवीधर होण्याचा बहुमान प्रल्हाद यांनी मिळवला. विद्यार्थीदशेपासूनच क्रिकेटपटू असलेले प्रल्हाद उत्तम प्रशासक तसेच क्रीडा पत्रकार आहेत. उतारवयातदेखील त्यांची क्रीडा क्षेत्रातील उर्मी तसूभरही कमी झालेली नाही.
अर्थातच, हा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला. त्यांचे वडील बाळाराम नाखवा कबड्डी आणि किक्रेटचे राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू होते. ‘मुंबई किक्रेट संघटने’चे अधिकृत पंच आणि प्रशिक्षक त्याचबरोबर १९५६ मध्ये मॉस्को येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवात कबड्डी संघातही त्यांच्या वडिलांचा समावेश होता. तोच कित्ता प्रल्हाद हेही गिरवत आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शिक्षणाची ’इनिंग’ संपवून पदवीधर झाल्यानंतर प्रल्हाद यांनी छोट्या-मोठ्या नोकर्या केल्या. त्यानंतर कल्याण शिधावाटप कार्यालयात एक वर्ष लिपिक म्हणून काम केले. पुढे आयुर्विमा महामंडळात लिपिकपदी दोन वर्ष नोकरी केल्यानंतर ’बँक ऑफ इंडिया’च्या मुंबईतील मुख्य शाखेत रुजू झाले. साधे लिपिक ते बँकेचे प्रबंधक पदापर्यंत पोहोचून तब्बल ३६ वर्ष त्यांनी इमानेएतबारे सेवा बजावली.
शालेय तसेच महाविद्यालयीन आणि चाकरमानी जीवनात विविध क्लब व संघामधून खेळताना क्रिकेटचे आघाडीचे आक्रमक फलंदाज व यष्टीरक्षक म्हणून प्रल्हाद यांनी प्रतिनिधित्व केले. १९७३ साली ’बँक ऑफ इंडिया’तर्फे ’टाईम्स शिल्ड’ स्पर्धेत सर्वोत्तम फलंदाज ठरले.१९९० मध्ये क्रिकेटपटू म्हणून निवृत्ती घेतली असली, तरी गेली अनेक वर्षे ‘भारत क्रिकेट क्लब’च्या अध्यक्षपदी आहेत. ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’च्या स्पर्धा समितीचे चार वर्षे सदस्य, तर १९८२ ते १९९६ दरम्यान ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडीयममध्ये पार पडलेल्या सहा ‘रणजी करंडक’ सामन्यावेळी क्रीडा पत्रकार कक्ष प्रमुखपदी प्रल्हाद यांची नियुक्ती केली होती. बँकेत कुशल प्रशासक म्हणून ख्याती असलेल्या प्रल्हाद नाखवा यांचे पत्रकारितेतही मोठे योगदान राहिले आहे.
‘अखिल भारतीय मराठी क्रीडा पत्रकार संघटने’चे कार्यकारिणी सदस्य, ‘मुंबई (महाराष्ट्र) क्रीडा पत्रकार संघटने’चे सदस्य असलेल्या प्रल्हाद यांनी विविध पाक्षिके, नियतकालिके, मासिक, दिवाळी अंक आणि वार्षिक हस्तलिखितांमध्ये लिखाण केले असून, अनेक दैनिकातही मुक्त पत्रकारिता केली. सा. ’विवेक’ च्या ‘आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण-शिल्पकार चरित्रकोश क्रीडा खंडा’च्या संपादकीय समितीचे सदस्य म्हणून काम केल्याचे प्रल्हाद सांगतात. आकाशवाणीच्या ‘अस्मिता’ व ’रेनबो’ वाहिन्यांवरून अनेक कसोटी व एकदिवसीय सामन्यांचे वार्ताकन त्यांनी केले. त्यांच्या या गौरवशाली कारकिर्दीचा गौरव अनेक संस्थांनी केला आहे. ठाणे महापालिकेनेही २०१७ साली त्यांना ‘ठाणे गौरव’ पुरस्काराने गौरवले आहे.
समाजसेवेचे बाळकडू त्यांना विद्यार्थीदशेत असल्यापासून लाभले. माजी आ. ग. मो. कोळी, कोळी समाजाचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेते नारायण देवजी उर्फ एनडी कोळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. १९६० साली स्थापन झालेल्या ‘फ्रेंडशिप क्रिकेट क्लब,’ ठाणे या संघाचा कार्यवाह म्हणून युवापिढीशी जुळलेली नाळ आजही कायम आहे. ती तशीच कायम राहावी, म्हणजे पंचाहत्तरीत असल्याचा विसर पडतो, असे मानणार्या प्रल्हाद यांचा ‘ठाणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना’, ’भारत क्रिकेट क्लब’, ’शिवाजी पार्क’ या संस्थांशी अनेक दशकांपासूनचा संबंध असल्याचे ते आवर्जून नमूद करतात.
मितभाषी असलेले प्रल्हाद हे ‘राखावी बहुतांची अंतरे’ या सुभाषिताप्रमाणे सर्वांशीच मिळते जुळते घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे क्रीडा व पत्रकारितेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संपर्क येऊन त्यांचा मित्र परिवार वाढला आहे. नागरीकरण वाढत असताना ठाण्यात मैदाने मात्र लयास गेली आहेत. रेमंडचे मैदान मोडीत निघाले. तेव्हा, अन्य विकास कामांसोबतच शहरात मुबलक मैदाने व क्रिडांगणे असावीत. त्यासाठी क्रिडाप्रेमी नागरिकांनी प्रयत्न करायला हवेत, असा आग्रह ते धरतात.
युवा पिढीला संदेश देताना ते सांगतात की, “युवा पिढीने मोबाईलचा उपयोग कसा आणि केव्हा करायचा याची समज पालकांनीच आपापल्या पाल्यांना देणे गरजेचे आहे, किंबहुना मुलांनी स्क्रीन टाईम कमी करून मैदानी खेळांकडे लक्ष द्यायला हवे,” अशी अपेक्षा व्यक्त करताना प्रल्हाद स्वतःही युवा पिढीसाठी मार्गदर्शक बनून या उतारवयातही कार्यरत आहेत. अशा या क्रीडा भक्त प्रल्हादला उर्वरित आरोग्यदायी आयुष्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!