मित्रपक्ष-असून अडचण, नसून खोळंबा!

    12-Jul-2023
Total Views | 83
Upcoming Lok Sabha Election Aliance Wth BJP

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांचे एकजुटीचे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याने भाजपचे काही माजी मित्रपक्ष हे भाजपशी पुन्हा जुळवून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. भाजपला स्वबळावर बहुमत मिळण्याची खात्री असली, तरी मित्रपक्षांची गरज नाकारून चालणार नाही. मात्र मित्रपक्ष निवडताना संबंधित राज्यात आपला पक्ष कमकुवत राहणार नाही, याचीही कसरत भाजपला करावी लागणार आहे.

भारतीय जनता पक्षप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) बैठक दि. १८ जुलै रोजी होत असून, या बैठकीत काही नवे चेहरे भाजप नेत्यांच्या शेजारी बसलेले दिसतील. त्यात महाराष्ट्रातील अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांची उपस्थिती अनेकांचे लक्ष वेधून घेणारी ठरेल. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने अनेक राज्यांमध्ये आपल्या पूर्वीच्या मित्रपक्षांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. तसेच ‘एनडीए’तून बाहेर पडलेल्या काही पक्षांनीही भाजपशी संपर्क साधला आहे. त्यात आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम आणि पंजाबमधील अकाली दल या पक्षांचा समावेश आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम माँझी यांच्या ‘हिंदुस्तान आवामी मोर्चा’ने अलिकडेच ‘एनडीए’मध्ये पुन्हा प्रवेश केला.

महाराष्ट्रातही शिवसेना पुन्हा एकदा ‘एनडीए’मध्ये सहभागी झाली आहे, तरीही काही राज्यांमध्ये भाजप अजूनही एकटा आहे. पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा लढविताना त्या जागांवर भाजपला होणारा विरोध कमीत कमी ठेवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य असून, तेथे लोकसभेच्या ८० जागा आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्रात ४८ जागा असून, यानंतर बिहारचा (४० जागा) क्रम लागतो. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील राजकीय स्थिती आता भाजपला अनुकूल असून, बिहारमध्येही भाजपसाठी लाभदायक वातावरण निर्माण होत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे आभार मानले पाहिजेत. त्यांच्या धरसोडीच्या आणि अत्यंत संधिसाधू राजकारणाला बिहारी जनता विटली आहे. त्यामुळे या तीन राज्यांतील १६८ जागांवर भाजपला अनुकूल स्थिती असेल, तर केंद्रातील सत्ता नजरेच्या टप्प्यात सहज येते. बाकीची कसर अन्य राज्यांतून भरून काढली जाऊ शकते; पण खरी मेख तिथेच आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात विरोधी पक्षांची एकसंध आघाडी निर्माण होण्याची चिन्हे धूसर होत असली, तरी अनेक राज्यांमधील स्थिती भाजपसाठी आव्हानात्मक आहे. तेलंगण आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये लोकप्रिय नेतृत्व आणि मजबूत पक्ष संघटनेचा अभाव असे दुहेरी आव्हान भाजपपुढे आहे. पंजाब हेही तेलंगणसारखेच अवघड राज्य बनले आहे. भाजपचे या राज्यांतील दुरावलेले मित्रपक्ष पुन्हा जवळ येत असले, तरी मित्रपक्षांबद्दल भाजपची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. भाजप हा प्रादेशिक पक्षांचे अस्तित्त्व नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, अशी टीका प्रादेशिक पक्षांकडून केली जाते; पण जेथे प्रादेशिक पक्ष मजबूत आहे, तिथे भाजपची संघटनात्मक शक्ती कमकुवत आहे. ती वाढवायची, तर मित्रपक्षाला दुखवावे लागते, अशी ही कोंडी आहे. वास्तविक भाजपला आजघडीला तरी राष्ट्रीय स्तरावर समर्थ असा पर्याय आणि धोका दिसत नसला, तरी पक्षाला गाफील राहून चालणार नाही. कारण काही पक्षांनी चालविलेले धार्मिक धुव्रीकरण हा छुपा धोका दिसत आहे. मोदी सरकारची कामगिरी कितीही दमदार असली, तरी भावनिक आणि अस्मितेचे राजकारण हा मोठा धोका ठरू शकतो. त्यासाठीच मित्रपक्षांची गरज आहे.

भाजपला यावेळी मित्रपक्ष निवडताना बरीच कसरत करावी लागणार आहे. ज्या राज्यात मित्रपक्ष निवडायचा, त्या राज्यात आपल्या पक्षाची संघटनात्मक ताकद घटणार नाही, याची भाजप नेत्यांना काळजी घ्यावी लागेल. पंजाबच्या उदाहरणातून खूपच शिकण्यासारखे आहे. कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर अकाली दलाने भाजपशी काडीमोड घेतला. अनेक वर्षे पंजाबमधील सत्ता अकाली दलाला आंदण दिल्यामुळे भाजपचे पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाले होते. अकाली दलाची साथ सुटल्यावर विधानसभा निवडणुकीत भाजपची अवस्था निर्णायकी झाली. ना पक्षाकडे कोणी मान्यवर नेता होता, ना संघटनात्मक ताकद. वास्तविक पंजाबात भाजपने पक्षबांधणी केली असती, तर यावेळी तो पक्ष सत्तेत येऊ शकला असता. मतदारांना काँग्रेसला सत्तेवरून दूर करायचे होते आणि त्यांना अकाली पक्षालाही सत्तेत आणायचे नव्हते. पण, ही पोकळी भरून काढण्यात भाजपला अपयश आले.

याचे कारण पक्षाने संघटनेकडे आणि नेतृत्त्व उभारणीकडे लक्षच पुरविले नव्हते. त्यामुळे आम आदमी पक्षाला रान मोकळे मिळाले. महाराष्ट्रात शिवसेनेशी युती असली, तरी राज्यात भाजपची संघटनात्मक ताकद कायम होती. बिहारमध्येही भाजप हा नितीशकुमार यांच्या जेडीयुवर अवाजवी अवलंबून राहिला होता. अर्थात पंजाबइतकी वाईट अवस्था नसली, तरी तेथेही संघटनात्मक ताकद आणि नव्या फळीतील नेतृत्व उभे करण्यासाठी भाजपला झगडावे लागत आहे. आता जरी पक्षाला जीतन राम माँझी, चिराग पासवान आणि पशुपतीनाथ पारस (लोक जनशक्ती पक्ष) यांचा आधार मिळाला असला, तरी भाजपला तिथे मजबूत पर्यायी पक्ष म्हणून उभे राहण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. नवे नेतृत्व हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे तेलंगण आणि आंध्र प्रदेश या राज्यांतही पक्ष बांधणीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. आंध्र प्रदेशात तेलुगू देसमशी युती करून जवळपास मोडीत गेलेल्या या पक्षाला पुन्हा संजीवनी द्यायची का, याचाही विचार करावा लागेल. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या वायआरएस काँग्रेसशी राज्यसभेत भाजपने मित्रत्त्वाचे संबंध राखले असले, तरी निवडणुकीत तो पक्ष भाजपला कसलीही सवलत देणार नाही. आंध्र्र प्रदेश, तेलंगण, पंजाब, ओडिशा, प. बंगाल यांसारख्या राज्यांमध्ये संघटना आणि नेतृत्वाच्या मुद्द्यांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

राहुल बोरगांवकर 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121