हर्षलच्या ‘रानझोपडी’त ‘वारली’ने कात टाकली

    09-Jun-2023
Total Views |
Article On Harshal Devram Thavil 

‘वारली’ने कात टाकली आहे. जिव्या सोमा मशेंनी ‘वारली’ला जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचविलं आहे, तर हर्षल त्याच ‘वारली’ला विविध रंगात वैविध्यपूर्ण ढंगात आणि आदिवासी जीवनातील सर्वच प्रकारच्या वार्षिक दिनमानांना चित्रस्वरुपात जगभर पोहोचविणार असे त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून दिसते. अशा या कलाकाराचा कलावेध घेणारा हा लेख...

मागच्या पंधरवड्यात एका तरुण, स्वयंभू आणि प्रयोगशील दृश्य कलाकाराच्या नैसर्गिक जीवनाला जवळून पाहण्याचा योग आला. ज्येष्ठ समाजव्रती लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकारमध्ये अनेक वर्षे विविध खात्यांचा विकास करणारे तद्वतच महसूल विभागाचे मंत्री म्हणून ज्यांनी स्वतंत्र ठसा उमटविला असे संयमित मृदूभाषी बाळासाहेब थोरात. ज्यांना मी ‘आबा’ म्हणतो, त्यांचा फोन आला ”गजानन, तू जस जमेल तसं, सुरगाणा जि. नाशिक येथे समक्ष जाऊन त्या तरुण कलाकारास भेट” आणि त्याच्याबद्दल आबांनी मला बरीच माहिती दिली. ‘आमदार-नामदार’ या लाक्षणिक विशेषणांच्या कितीतरी पुढे असणार्‍या आबांच्या त्या फोनवरील संवादात मला त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीची नाळ तर दिसलीच; पण त्याहीपेक्षा, त्यांच्यातील सुप्त कलारसिक ज्याला कलेची जाण तर आहेच. परंतु, कलेबद्दलचा तसेच कलाकाराबद्दलचा आदरसुद्धा दिसला. राजकारणापेक्षा समाजकारणात धन्यता मानणार्‍या बोटावर मोजणार्‍या व्यक्तींपैकी मला आबांचा हा पैलू फारच प्रभावित करून गेला. मी सुरगाण्याला जाणं निश्चित केलं आणि सगळं जाणूनही आलो.

इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन नोकरी शोधण्याच्या फंदात न पडता वडिलांच्या आठ एकर शेतीतच कष्ट करण्याचा आदर्श आणि अनुकरणीय निर्णय घेणारा हर्षल देवराम थविल हा तिशीतला तरुण नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील गारमाळ या गावांत राहणारा... याच ठिकाणी त्याने त्याची ‘रानझोपडी’ उभारली आहे. तसा हा तालुकाच आदिवासी. जंगल, डोंगर-दर्‍या आणि भातशेतीवरच या परिसरातील जीवनमान सुरू असतं. हर्षलला उच्च शिक्षणानंतरदेखील गावाकडे अधिक सुखावह वाटले. चित्रकला शिकण्यासाठी नाशिक शहरातील कलामहाविद्यालयांकडे गेलाही होता. परंतु, त्याची कलाशिक्षण घेण्याची आशा अधुरीच राहिली.

शेती करण्याचाच निर्णय घेऊन तो गावी आला. वडील आणि आजोबा यांच्या पारंपरिक वनौषधींचं ज्ञान त्याने आत्मसात केलं. काही दुर्मीळ आणि नामशेष होऊ पाहणार्‍या वनस्पती, झाडे यांचं जतन करण्याचा त्याने मिळविलेल्या पारंपरिक ज्ञानावर यशस्वी प्रयत्न केला. शेतात आढळणारी धामण, घरातही येते. तीचं खाद्य तिला मिळालं की निघून जाते, असं हर्षलची मातोश्री फार आपलेपणाने सांगते. आम्ही सर्व निसर्गाने दिलेल्या फळ-फळावळ धान्य, पालेभाज्या, फळभाज्या अशा नैसर्गिक संपत्तीवरच आहार-विहार ठेवतो. त्यामुळे आम्हाला शहरी माणसांसारखे दुर्धर आजार होत नाहीत, असं तरुण हर्षल त्याच्या आईच्या साक्षीने सांगत होता. त्यांचं बोलणं त्याचा आत्मविश्वास त्याच्यातील आत्मियता आणि त्यांच्या ठाम नजरेतील दिसणारं उज्वल भविष्य क्षणोक्षणी जाणवत होतं. त्याने बर्‍याच वनस्पती आणि वनौषधी यांची माहिती दिली. तो विषय आपल्या लेखाचा जरी नसला तरी जिज्ञासूंनी त्याला ९८३४४५२५९२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करून ‘रानझोपडी’ला भेट द्यायला नक्की जावं.

त्याने त्याच्या ‘रानझोपडी’ परिसराला वारली कलाशैलीतील कलाकृतींनी सजविलं आहे. जणू निसर्गाशीच त्याने स्पर्धा करून सजावटींच कार्य केलं आहे. वास्तविक ‘वारली’ म्हटलं की, ‘पद्मश्री’ जिव्या सोमा मशे यांचं नाव डोळ्यांसमोर येतं. मी राज्याचा प्रदर्शन अधिकारी कलासंचालनालयातच होतो, तेव्हा २०१० साली जिव्या मशेंना राज्य सरकारचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्याचवर्षी त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मान केला होता. जिव्या सोम्या मशेंनंतर वारली पोरकी झाली का? असा काळजाला भेदणारा प्रश्न पडलेला असायचा. पण, आता सुमारे एक तपानंतर उत्तर सापडलं आहे.

Article On Harshal Devram Thavil

‘वारली’ने कात टाकली आहे. जिव्या सोमा मशेंनी ‘वारली’ला जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचविलं आहे, तर हर्षल त्याच ‘वारली’ला विविध रंगात वैविध्यपूर्ण ढंगात आणि आदिवासी जीवनातील सर्वच प्रकारच्या वार्षिक दिनामानांना चित्रस्वरुपात जगभर पोहोचविणार असे त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून दिसते. त्याने त्यांच्या ‘सेल्फटॉट’ पद्धतीने, वारलीला गेरु आणि तांदळाची पांढरी पेस्ट या दोन रंगांच्या पलीकडे व्यक्त करण्याचा प्रभावी प्रयत्न केला आहे.

त्यासाठी त्याने, आदिवासींच्या लग्न समारंभातील प्रत्येक धार्मिक-पारंपरिक विधींना वारलीबद्ध केलं आहे. झाडावरील दिसणारे मधमाशांचं पोळ, उडणार्‍या मधमाशा, हर्षलच्या शैलीत बद्ध झालेल्या आहेत. ’सहकारातून केलेल्या कामात कष्ट कमी आणि आनंद अधिक असतो. ’वारली’ शैलीत धान्याचं खळं हातात हात घालून केली जाणारी समूह नृत्य, खळ्यावरील शेती-पिकांची कामे, अशी दृश्ये हर्षलने अधिक सूक्ष्मपणे चितारलेली आहेत. तो म्हणतो, “आदिवासींचे सुरगाणा तालुक्यातील प्रश्नं, कामं, दैनंदिन जीवन भिन्न आहे.” म्हणजे त्याने, त्यांच्या आदिवासी जीवनमानाचेही सूक्ष्म अवलोकन केलेले आहे. हेच अवलोकन त्याने त्याच्या भव्य चित्रांकनातून मांडलेले आहे.

हर्षलच्या ’वारली’ पेंटिंग्जमध्ये विविध प्रकारचे प्रतिकात्मक आकार त्याने खुबीने चितारलेले आहेत. मासे, पाण्याचे तरंग, पाण्यातील शेवाळ, झुडूपे रान गवत, रानफुले, मोठी झाडे, पक्षी, त्या त्या जातीचे पक्षी बरोबर हर्षलच्या शैलीत ओळखता येतात. फुलांच्या ‘सिम्बॉलिक’ आकारांना पाहिल्यावर तर विश्वास बसत नाही की, हर्षलने खरंच कलाशिक्षण घेतलं नाही का? तेथील जमिनीत आढळणारे मुंग्याचे वर्तुळात्मक वारुळ, हर्षलच्या पेटिंगचा विषय बनले आहे. मग त्याने चितारलेल्या मुंग्याही फार ‘सिम्प्लीफाईड’ आहेत. त्याने चितारलेला उंदीरदेखील थक्क करणारा आहे. जमिनीवरील जीवंत गवत आणि वाळलेले गवत एकाच रंगात हर्षलने दाखविण्याची किमया केली आहे. अशा या हर्षलला स्थानिक लोकं ’हारीराम’ या टोपण नावानेदेखील ओळखतात.

’हर्षल’च्या ’रानझोपडीत’ सकाळी ११ वाजता पोहोचलो होतो. सायंकाळ कधी झाली, कळलंच नाही. त्याने हा परिसर, नैसर्गिक फुलझाडे, पाण्याचे छोटे छोटे तळे त्यात कमलपुष्पे आणि हर्षलनी चितारलेली पेटिंग्जने सजलेला आहे. भविष्यात हर्षलला त्याच्या ’रानझोपडी’ परिसरांत पर्यावरणपूरक शेतीसह दुर्मीळ आणि नामशेष होत असलेल्या झाडांचं नव्याने रोपांमार्फत संवर्धन करायचं आहे. ’कृषी पर्यटन’ हा त्याचा ’ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. याच ठिकाणी त्याला आदिवासी चित्रांचं कलादालन सुरू करायचं आहे. येथील स्थानिक लोकांनी, कारागिरांनी बनविलेल्या वस्तूंचे बांबूच्या वस्तूंचे, हस्तकलांचे स्टॉल्स उभे करायचे आहेत. ’रानवाट’ हा एक उपक्रम करून, त्या वाटेच्या दोन्ही बाजूस त्याला संवर्धन केलेल्या वनस्पतींची झाडांची माहिती पर्यटकांना द्यायची आहे.

स्वप्न मोठे आहे, विशाल आहे, अवघड जरी वाटत असलं तरी अशक्य निश्चितच नाही! आमदार बाळासाहेब थोरात, नाशिकचे प्रस्थ असलेले, ‘ब्रह्मा’ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे अशा मोठ्या व्यक्तींचे त्याला आशीर्वाद आहेत. तरीही त्याचं स्वप्न आणि ‘वारली’चं नवं रूप, कलारसिक जगतासह समस्त आदिवासी समाजासाठी, मूर्त स्वरूपात येण्यासाठी हर्षलला आर्थिक दानशूरांच बळ मिळणं महत्त्वाचं वाटतं. आज त्याची उमेद आहे, वय आहे, उत्साह आहे. वेळेतच त्याला बळ मिळाले, तर त्याची ’रानझोपडी’ राष्ट्रसंत तुकडोजी महारांना अभिप्रेत असा ’राजप्रासाद’ व्हायला वेळ लागणार नाही, हर्षलच्या भविष्यातील उपक्रमांना अनेक शुभेच्छा!

प्रा. डॉ. गजानन शेपाळ
८१०८०४०२१३


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121