खलिस्तानी आवडे कॅनडाला!

    08-Jun-2023   
Total Views |
Canada Indira Gandhi Chitrarath

कॅनडामधील खलिस्तानी समर्थकांचा हैदोस सुरूच आहे. आता तर कहर म्हणजे कॅनडातील ब्रॅम्प्टन शहरात काढण्यात आलेल्या खलिस्तान्यांच्या परेडमधील एका चित्ररथामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची शीख अंगरक्षकाने केलेल्या हत्येचा प्रसंग या चित्ररथातून दाखविण्यात आला. या परेडमध्ये खलिस्तानी ध्वज फडकविण्यात आले, तर ’श्री दरबार साहिबवरील हल्ल्याचा बदला’ असे लिहिलेले पोस्टरदेखील परेडमध्ये झळकले. ‘१९८४ कधीही विसरू नका. शीख नरसंहार,’ असेही काही पोस्टरवर लिहिण्यात आले होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शीख अंगरक्षकांनी केलेल्या हत्येचा गौरव करणारा हा चित्ररथ तब्बल पाच किलोमीटर फिरवण्यात आला.

परंतु, त्यावर स्थानिक प्रशासनाने कोणताही आक्षेप घेतला नाही वा ही परेड थांबविली गेली नाही. या परेडमध्ये मोठ्या प्रमाणावर खलिस्तानी समर्थकांनी सहभाग घेतला. या परेडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच ‘व्हायरल’ झाला असून, अनेकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. खलिस्तान समर्थकांच्या या कृत्यावर कॅनडा सरकार कोणतीही कारवाई करत नसल्याने भारताने कॅनडाच्या पंतप्रधानांना कडक शब्दांत संदेश देण्याची मागणी नेटीझन्स करत आहेत. या घटनेमुळे कॅनडा सरकारचा दुतोंडीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

भारताने मात्र कॅनडा सरकारला यासंदर्भात चांगलेच फटकारले आहे. परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी कॅनडात पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा चित्ररथ काढण्यात आल्याबद्दल खलिस्तानी समर्थक आणि कॅनडा सरकारचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, “या प्रकारामागे काहीतरी मोठा हेतू दडलेला आहे. यामगे कॅनडातील ‘व्होट बँके’चे राजकारण असू शकते. फुटीरतावाद्यांना, अतिरेक्यांना आणि हिंसेचा पुरस्कार करणार्‍या लोकांना अशी परवानगी देणे ही चांगली बाब नाही. याचा दोन्ही देशांच्या संबंधावर विपरित परिणाम होऊ शकतो.” मुळात कॅनडामध्ये घडलेला हा काही पहिला प्रकार नाही. स्वतंत्र खलिस्तानसाठी मागील वर्षी कॅनडात चक्क जनमत चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळीदेखील कॅनडातील प्रशासन मूग गिळून बसले. ही मतदान प्रक्रिया घेतल्याबद्दल भारताने कॅनडावर टीका करत निषेधही व्यक्त केला होता.

दरम्यान, भारतीय लष्कराने अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातून शीख बंडखोरांना हुसकावून लावण्यासाठी ‘ऑपरेशन ब्लूस्टार’ राबविले होते. ‘ऑपरेशन ब्लूस्टार’ हे भारतीय लष्कराचे आतापर्यंतचे सर्वांत मोठे अंतर्गत सुरक्षा अभियान मानले जाते. खलिस्तान चळवळीच्या प्रसारामुळे पंजाबमध्ये त्यावेळी निर्माण झालेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर इंदिरा गांधींनी केलेली कारवाई खलिस्तानवाद्यांना एकप्रकारचा इशाराच होता. दि. १ जून ते ८ जून, १९८४ दरम्यान अमृतसर येथे राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन ब्लूस्टार’अंतर्गत इंदिरा गांधी यांनी भारतीय सैनिकांना श्री हरमंदिर साहिबमध्ये शस्त्रास्त्रांचा साठा करणार्‍या शीख अतिरेक्यांना हुसकावून लावण्याचे आदेश दिले. खलिस्तान समर्थकांनी १९८०च्या दशकात अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या अकाल तख्त संकुलात आश्रय घेतला होता.

अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातील अकाल तख्त संकुलाचा ताबा घेणारा जर्नेलसिंग भिंद्रनवाले हा लष्कराच्या टार्गेटवर होता. या कारवाईत अनेक नागरिकांचा मृत्यू, तर अनेक जवान हुतात्मा झाले. या ऑपरेशननंतर इंदिरा गांधींविरोधात शीख समुदायात संताप पसरला. त्यानंतर दि. ३१ ऑक्टोबर, १९८४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची नवी दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरी हत्या झाली. खलिस्तानी समर्थकांची हिंमत आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ऑस्ट्रेलियातही खलिस्तानवादी आंदोलनं करून भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न करत असतात.

परंतु, तिथे किमान ऑस्ट्रेलिया कारवाई तरी करतो. परंतु, कॅनडा मात्र तसे करायला जात नाही. २०२१च्या आकडेवारीनुसार, कॅनडाची लोकसंख्या ३ कोटी, ८० लाख असून त्यापैकी जवळपास २२ टक्के लोकसंख्या ही शीख धर्मीय आहे. त्यामुळे शीख धर्मीयांना न दुखावण्याचा प्रयत्न कॅनडातील सर्वच पक्ष करत असतात. कॅनडात ‘किंगमेकर’ ठरत असल्याने याठिकाणी खलिस्तानी चळवळदेखील फोफावत चालली आहे. पक्ष कोणताही असो, परंतु, भारताच्या पंतप्रधानांच्या हत्येचा असा बाजार मांडला जात असेल, तर कॅनडा सरकारला केवळ समज नाही, तर कठोर कृतीतूनच उत्तर द्यावे लागेल.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.