संगीत नाट्याची त्रिमूर्ती म्हणे.. सुनीता गुणे!

    08-Jun-2023
Total Views |
Article On Sunita Gune

प्रापंचिक जबाबदार्‍या सांभाळत असतानाच स्वत:ची कला जोपासत एकपात्री संगीत नाट्य जगलेल्या कलाकार सुनीता गुणे यांच्याविषयी...

सुनीता नारायण गुणे... अवघे पाऊणशे वयोमान... उत्साह तरुणाला लाजवेल असाच. गाणं, संगीत, नाट्य हे तर जिव्हाळ्याचे विषय. त्यांचे माहेर नाट्यपंढरी सांगलीमधील. त्यांचे विवाहापूर्वीचे नाव उषा बापट. लहानपणापासूनच संगीत नाटकांची आवड होती. पंडित काळे बुवा यांच्याकडे संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. शालेय शिक्षण पूर्ण करतानाच शास्त्रीय-सुगम संगीतात विशारदपर्यंतचे शिक्षण घेतले. शालेय व महाविद्यालयीन काळातच स्नेहसंमेलनातील करमणुकीच्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. मोठमोठ्या कलाकारांची संगीत नाटकेही पाहायला मिळाली.

विवाहानंतर पतीसह त्या पुण्यात स्थायिक झाल्या. त्यांना ज्योत्स्ना भोळे यांच्याकडे शास्त्रीय आणि बालगंधर्व यांचे ऑर्गनचे साथीदार हरिभाऊ देशपांडे यांच्याकडे नाट्य संगीताचे शिक्षण मिळाले. पती नारायण गुणे यांची नोकरीनिमित्त लंडन येथे बदली झाली. त्यादेखील पतीसोबत तिकडे गेल्या. १९७०च्या काळात लंडनमध्ये सुहासिनी मुळगावकर यांनी सादर केलेले ‘सौभद्र’ व ‘त्रिवेणी’ असे दोन एकपात्री कार्यक्रम त्यांच्या मनात घर करून गेले. सहा महिन्यांची छोटी मुलगी बागेश्री हिला घेऊन त्या १९७१ साली भारतात परतल्या. सांगली येथे सासू-सासरे, आजी-सासूबाई यांच्या समवेत बागेश्री व तिची लहान बहीण आसावरी यांच्या संगोपनात पाच-सात वर्षे निघून गेली.

शास्त्रीय संगीत शिकायच्या. सुहासिनी मुळगावकर यांच्या प्रेरणेने त्यांनी एकपात्री संगीत स्वयंवर यातील दोन प्रवेश बसविले आणि ते विश्रामबाग महिला मंडळात सादर केले. स्वयंवरचे कौतुक झाल्यामुळे मानापमान व ‘सौभद्र’मधील दोन दोन प्रवेश त्यात सामावून त्यांचा ‘संगीत त्रिमूर्ती’ हा एकपात्री कार्यक्रम तयार केला. स्वयंवरातील श्रीकृष्ण, रुक्मिणी, रुक्मी, स्नेहलता, मानापमानातील भामिनी, धैर्यधर, लक्ष्मीधर, कुसुम, आणि सौभद्रातील सुभद्रा, अर्जुन, कुसुमावती, घटोत्कच राक्षस, श्रीकृष्ण अशा अनेक भूमिका त्यांनी वटवल्या.

‘संगीत त्रिमूर्ती’चा पहिला प्रयोग पुण्यातील जयंत मंगल कार्यालयात १९७८ साली झाला. या कार्यक्रमाचे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, दिल्ली व इंग्लंड असे एकूण २०० प्रयोग झाले. हा कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्रावरूनही सादर झाला होता. त्या आकाशवाणीच्या शास्त्रीय संगीत, सुगम संगीत आणि नाट्य विभागाच्या कलाकार आहेत. इंग्लंडमधील न्यूकासल, बर्मिंगहॅम, मँचेस्टर येथे देखील प्रयोग झाले. लंडनमध्ये ज्या मंचावर सुहासिनी मुळगावकर यांचा एकपात्री कार्यक्रम पाहिला; त्याच मंचावर २००० साली सुनीताताईंनी एकपात्री कार्यक्रम करीत त्यांना एकप्रकारे मानवंदनाच दिली. ज्येष्ठ नागरिक संघातदेखील बरेच प्रयोग झाले. सांगलीच्या भावे नाट्य मंदिराच्या संगीत नाटकामधून कामे केली. संगीत ‘संशय कल्लोळ’ या नाटकातील रेवतीच्या भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे रौप्य पदक मिळाले.

भावे नाट्यमंदिर, सांगली यांनी अभिनेत्री फैयाज यांचे हस्ते पुरस्कार दिला. बालगंधर्व संगीत रसिक मंडळाकडून ‘द. कृ. लेले पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. बालगंधर्व जन्मशताब्दी वर्षात सुहासिनीताईंच्या ‘गंधर्व गौरव’ या दूरदर्शनवरील कार्यक्रमात त्यांनी ‘संशय कल्लोळ’मधील नाट्यपद साभिनय सादर केले. दूरदर्शनच्या ‘एम२ जी२’ या कार्यक्रमात मुलाखत व दोन नाट्यगीते साभिनय सादर केली. स्वा. सावरकरांच्या जीवनातील महत्त्वाच्या आठ ठिकाणांचे संदर्भ घेऊन अप्रतिम असा ‘अष्टविनायक महिमा’ हा कार्यक्रम गुंफला आहे. ‘अष्टभुजा दर्शन’, ‘मातोश्री जिजाबाई’, ‘राजा विक्रमादित्याची साडेसाती’ (स्वत:चे लेखन), ‘नाही चिरा नाही पणती’, ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ ही नृत्य नाट्ये, संगीतिका, स्त्रिया, मुले-मुली यांच्याकडून बसवून घेत, ती दिमाखात सादर केली आहेत. त्यांनी विविध ठिकाणी शास्त्रीय व सुगम संगीताच्या गाण्याच्या स्पर्धांना आणि नाटक व एकांकिकाच्या स्पर्धांना परीक्षकाचे काम केले आहे.

त्यांची लंडनमध्ये असलेली मोठी मुलगी डॉ. बागेश्री या शास्त्रीय, ठुमरी, गझल याचे कार्यक्रम करतात, तर धाकटी मुलगी आसावरी या नाट्यगीते, भावगीते, भक्तिगीते याचे कार्यक्रम करतात. पती नारायण गुणे यांनी ‘प. पू. श्रीगुरुजी यांच्या ३६५ विचारांचे नित्यप्रेरणा’, ‘स्वामी विवेकानंद यांच्या ३६५ विचारांचे विश्वगुरू भारत’, ‘जपानची गरूड भरारी’, ‘देश-विदेशांच्या राष्ट्रीय विचारधारा’, ‘मनुष्यबळ व्यवस्थापन व दासबोध’ अशी अनेक पुस्तके संकलित केली व लिहिली आहेत. त्यांनाही गाण्याची आवड आहे. सुनीताताईंबरोबर ‘गीत रामायण’, ‘सुधा रामायण’, ‘संगीत अष्टविनायक’, ‘राम नामी रंगलो’ आदी कार्यक्रमात दोन्ही मुली व पती या तिघांचाही समावेश असतो. वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या सुनीताताईंनी नुकताच त्यांनी सात नाटकातील संवाद व निवेदनासह नाट्य गीत गायनाचा-नाट्य गीतांचा इंद्रधनू रत्नागिरी जवळील पाली येथे एप्रिल २०२३ मध्ये सादर केला.

“पती, दोन्ही मुली आणि सासर- माहेरच्या सर्वांच्या आशीर्वादाने व पाठिंब्याने मी हे सारे करू शकले,” अशी भावना सुनीताताईं व्यक्त करतात. आपले जीवन कृतज्ञ, कृतार्थ, समाधानी असल्याचे त्या आवर्जून नमूद करतात. अशा सुनीताताईंना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मन:पूर्वक शुभेच्छा!

लक्ष्मण मोरे