नवी दिल्ली : जपानमधील लोकांना कोरोना महामारीच्या काळात मास्क लावण्याची इतकी सवय झाली आहे की त्यांना आता हसण्यासाठी सेशनमध्ये जावे लागते. जपानमधील लोक हसता यावे म्हणून 'स्माइलिंग सेशन'मध्ये सहभागी होत आहेत. खरं तर, पूर्व आशियाई देशांमध्ये चेहरा झाकणे सामान्य आहे. कारण, हंगामी आजार आणि ताप याशिवाय संसर्गाचाही लक्षणीय परिणाम झाला आहे. कोरोनानंतर लोकांनी मास्क अधिक व्यवस्थित घालायला सुरुवात केली.
कोरोनाच्या काळात जपान सरकारने अधिकृतपणे फेस मास्क अनिवार्य केले. केवळ जपानच नाही तर जगभरात फेस मास्क बनवणाऱ्या कंपन्यांची चांदी झाली. आता जपान सरकारनेही फेस मास्कची अनिवार्यता रद्द केली आहे. दरम्यान, काही जणांना अचानक हसायला विसरल्याचा साक्षात्कार होऊ लागला. एका व्यक्तीने सांगितले की, त्याने कोरोनादरम्यान चेहऱ्याचे स्नायू वापरले नाहीत.
त्यामुळे जपानमधील लोकांना आता 'स्माइल इंस्ट्रक्टर'ची गरज भासू लागली आहे. हे 'स्माइल इंस्ट्रक्टर' लोकांना हसायला शिकवतात. हे प्रशिक्षक लोकांना व्यायाम करायला लावतात. नोकरीच्या मुलाखतींमध्ये हसू यावे आणि चांगली छाप पाडावी यासाठी तरुणही त्याची मदत घेत आहेत. या तरुणांना प्रशिक्षक आरशासमोर बसून बोटांनी दोन्ही बाजूंनी ओठ पसरवण्यास सांगतात. अशा प्रकारे त्यांना हसायला शिकवले जाते.
तसेच लोक त्यांच्या चेहऱ्याच्या स्नायूंचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर करण्यास शिकत आहेत. स्माईल प्रशिक्षक कोइके कावानो यांनी स्पष्ट केले की,आता जपानमध्ये पर्यटन परत येत आहे, हसणे ही एक गरज बनली आहे. त्यामुळे जपान हा बेटांचा देश आहे आणि येथील सुरक्षा हे देखील लोक कमी हसण्याचे एक कारण आहे. या ट्रेंडला मास्कमुळे आणखी चालना मिळाली. हे देखील समोर आले आहे की ५५ % जपानी लोक मास्क घालणे अनिवार्य असतानाही वापरत आहेत.