भारतीय वस्त्र उद्योगाला बंद पाडण्याचा डाव….! : प्रशांत पोळ

    07-Jun-2023
Total Views | 92
How Destroyed indian Textile Industry British

हजार - दोन हजार वर्षांपूर्वी जेंव्हा भारत जागतिक व्यापाराच्या शिखरावर होता, तेंव्हा त्या व्यापारात सगळ्यात मोठा वाटा होता, कापड उद्योगाचा ! सुती वस्त्र असो किंवा रेशीम – मलमल चे, भारतीयांचा डंका सगळ्या दुनियेत वाजत होता. युरोपला सुती वस्त्रांची ओळख भारताने करुन दिली. त्यांना फक्त लोकरीचे गरम कपडे माहिती होते. कापसाच्या शेतीबद्दल तर ते अनभिज्ञच होते. पूर्व आणि पश्चिम, दोन्ही दिशांचे देश भारतीय वस्त्रांच्या मोहात / प्रेमात पडले होते.

वस्त्रोद्योग भारताचा प्राचीन उद्योग आहे. ऋग्वेदात याचा उल्लेख आढळतो. ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलात वर्णन येते ते असे, कि ‘सर्वप्रथम ऋषि गृत्स्मद यांनी कापसाचे बी रुजवले. आणि त्यापासून उगवलेल्या झाडातून कापूस काढला. त्या कापसापासून सूत तयार केले. या सूतापासून कापड तयार करण्यासाठी त्यांनी लाकडाची टकळी तयार केली.’ वैदिक भाषेत कच्च्या सूताला ‘तंतू’ असे म्हणतात. हा तंतू तयार झाल्यानंतर कापसाच्या उरलेल्या भागाला ‘ओतु’ असे म्हणतात. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात सुद्धा कापड आणि विणकरांचा उल्लेख आहे.

कितीतरी हजार वर्षांपूर्वी भारतात कापड तयार करण्याच्या प्रक्रियेने एका मोठ्या उद्योगाचे रुप धारण केले. कपड्यांना वेगवेगळ्या प्रकारात तयार करणे, त्यांना रंगवणे, ह्या प्रक्रिया भारतात पांच हजार वर्षांपासून सामान्य रूपात होत होत्या. डॉ. स्टेनले वोलपर्ट (Dr. Stanley Wolpert) अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियात इतिहास या विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी लिहीलेय कि, “भारत सूती वस्त्रांचे माहेरघर होते. सूती वस्त्रांचा प्रांरभ भारतातच झाला. सूत कातणे आणि त्याला विणणे हे भारतीयांनीच जगाला शिकवले आहे.” प्रो. डी. पी. सिंघल यांनी सुद्धा लिहून ठेवले आहे कि, “चरखा (Spinning Wheel) ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. मोहन जोदाडोच्या उत्खननात कापडाचा एक तुकडा आणि दोरी मिळाली. यांचा अभ्यास केला असता असे लक्षात आले कि हडप्पा कालीन संस्कृतीत (म्हणजेच जवळपास पाच ते सात हजार वर्षांपूर्वी) भारतात अतिशय उत्तम प्रतीचे कापड तयार होत होते.

इंग्लंडच्या ‘श्रोप कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी’ चे अध्यक्ष प्रो. जेम्स ऑगस्टीन ब्राउन स्केरर (Prof. James Augusin Brown Scherer : १८७० - १९४४) ने एक पुस्तक लिहीले आहे. ‘कॉटन एज ए वर्ल्ड पॉवर’. १९१६ मध्ये हे पुस्तक अमेरिकेत प्रसिद्ध झाले. कापसाच्या जागतिक महत्वाच्या संदर्भात त्याकाळात हे पुस्तक प्रमाण मानले जात असे. हे पुस्तक दोन भागात आहे. पहिल्या भागाचे शीर्षक आहे, ‘फ्रॉम इंडिया टू इंग्लंड’. या भागात प्रो. जेम्स स्केरर ने एक पूर्ण प्रकरण ‘भारतातील कापूस आणि वस्त्रांची निर्मिती’ यावर सविस्तर लिहीले आहे. या प्रकरणाचे शीर्षक आहे, ‘हिंदु स्किल’. या प्रकरणात त्यांनी भारतात कापसापासून तयार कपड्यांचा उद्योग किती प्राचीन आणि परिपक्व आहे याबद्दल विस्ताराने लिहीले आहे. प्रो. स्केरर या पुस्तकात लिहितात कि, ‘त्या काळात हिंदु कारागीरांनी तयार केलेले कपडे आजच्या आमच्या प्रगत मशीनवर तयार केलेल्या कपड्यांपेक्षा जास्त चांगल्या प्रतीचे होते.’

‘Thousands of years before the invention of cotton machinery in Europe, Hindu gins were separating fiber from seed, Hindu wheels were spinning the lint in to yarn and frail Hindu looms weaving these yarns in to textiles.’
(युरोपात सूती वस्त्र तयार करण्याच्या यंत्राचा शोध लागण्याच्या हजारो वर्षांपूर्वी हिंदु, टकळींनी कापसाच्या बोंडांपासून सूत काढत असत. चरखे आणि सूतकताईच्या उपकरणांपासून त्या धाग्यांचा तागा तयार केला जात असे आणि त्या तागांतून वस्त्र विणले जात असे.) प्रो. स्केरर ने अनेक परदेशी प्रवाशांच्या अनुभवांचा सुद्धा उल्लेख केला आहे. पुढे ते लिहीतात, “दोन अरबी प्रवाशांनी काही शतकांपूर्वी लिहून ठेवले आहे कि, हिंदु विणकरांनी तयार केलेल्या वस्त्रांची गुणवत्ता इतकी उच्च दर्जाची होती (Extra Ordinary Perfection) की तशी कुठेच मिळत नाही. ती वस्त्रे इतकी मऊ आणि नाजूक असतात कि एखाद्या छोट्या अंगठीतूनही ती निघू शकतात.” प्रो. स्केरर ने जीन बॅप्टीस्ट टैवर्नियर या फ्रेंच प्रवाशाचेही कथन दिलेले आहे.

सतराव्या शतकात जीन टैवर्नियर या हिऱ्याच्या व्यापाऱ्याने अनेकदा पर्शिया (आजचे इराण) आणि भारताचा प्रवास केला. १६६० मध्ये त्याने भारतीय वस्त्रांची गुणवत्ता यावर लिहून ठेवले आहे. तो म्हणतो, ‘काही वस्त्रे इतकी तलम आणि मऊ होती, कि हाताला त्यांचे अस्तित्व सुद्धा जाणवत नसे. काही वस्त्रे तर इतकी पारदर्शक होती, कि घातल्यानंतर सुद्धा कपडे घातलेत असे जाणवतच नसे. टवर्नियरनी भारतीय वस्त्रांसदर्भातील एक अनुभव सांगितला आहे. “एक पर्शियन राजदूत जेंव्हा आपल्या देशात परत गेला, तेंव्हा त्याने आपल्या सुलतानाला एक नारळ भेट म्हणून दिले. दरबारी लोकांना खूप आश्चर्य वाटले की राजदूताने केवळ नारळच कसे दिले? परंतू ज्यावेळी त्यांनी त्या नारळात २३० यार्ड (अर्थात २१० मीटर) मलमलचा तलम मऊ कपडा अगदी छानसा सजवून ठेवलेला बघितला, तेंव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

ईस्ट इंडिया कंपनीचे एक अधिकारी विल्कीन्स जेंव्हा इंग्लंडला परत गेले तेंव्हा त्यांनी सर जोसेफ बेक ला भारतातून आणलेला तलम मलमलचा कपडा भेट म्हणून दिला. सर जोसेफ बेकने या कपड्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत लिहीले आहे. “माझे मित्र विल्किन्सने मला दिलेले भारतीय कापड अत्यंत तलम, मुलायम, आणि आकर्षक आहे. या ५ यार्ड ७ इंच (अर्थात १५ फूट ७ इंच) लांब कपड्याचे वजन आहे केवळ ३४.३ ग्रेन.” (१५.५ ग्रेन म्हणजे १ ग्राम) अर्थात त्या कापडाचे वजन होते केवळ २ ग्राम ‍‍‍‍!

या मलमलच्या गुणवत्तेचे अजून एक उदाहरण - सर जोसेफ बेकने ज्या मलमलच्या कपड्याबद्दल लिहून ठेवलेय, त्याचा थ्रेड काउंट होता २४२५. (थ्रेड काउंटचा अर्थ होतो, १ चौरस इंच / सेंटीमीटर मध्ये किती थ्रेड, म्हणजे धागे, आहेत. जितके जास्त धागे, तितके ते बारीक आणि पातळ (तलम असे) सूत असते. जास्त मऊ असते.) आजच्या अत्याधुनिक मशीनींवर तयार झालेल्या कापडाचा थ्रेड काउंट ६०० च्या वर नसतो. म्हणजेच आजची अत्याधुनिक मशीनरी सुद्धा त्या काळातील भारतीयांच्या हाताने विणलेल्या कपड्याच्या गुणवत्तेची बरोबरी करु शकत नाही.

एकोणिसाव्या शतकातील एक इंग्रज विद्वान, सर जॉर्ज बर्डवुड (१८३२-१९१७) यांनी भारतावर अनेक पुस्तके लिहीली आहेत. त्यांच्या आयुष्यातील बराच मोठा काळ ते भारतात राहिले. ८ डिसेंबर १८३२ रोजी, त्या काळातील ‘बॉम्बे प्रेसिडेंसी’ च्या, बेळगांव (आत्ताचे कर्नाटकातील बेळगावी शहर) इथे त्यांचा जन्म झाला. ते डॉक्टर झाले, पर्शियन युद्धात त्यांनी भाग घेतला. ग्रांट मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम केले, आणि नंतर मुंबईचे शेरीफ ही झाले. १८६८ मध्ये ते इंग्लंडला परत गेले. तिथे भारता संबंधी कार्यालयात वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं. त्यांनी लिहीलेल्या काही प्रसिद्ध पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे, ‘द इंडस्ट्रिअल आर्ट्स ऑफ इंडिया’ हे पुस्तक त्यांनी ‘सेक्रेटरी ऑफ स्टेट, इंडिया अफेअर्स’ च्या सांगण्यावरुन लिहीलं. या पुस्तकात पृष्ठ क्रमांक ७३ वर त्यांनी लिहीलं आहे, - “असं म्हणतात कि, जहांगीराच्या काळात १५ गज लांब आणि १ गज रुंद ढाक्या च्या मलमलचे वजन केवळ १० ग्रेन (१ ग्रॅम पेक्षा सुद्धा कमी) असायचे.

याच पुस्तकाच्या पृष्ठ क्र. ९५ वर ते लिहितात, “इंग्रज आणि इतर युरोपियन लेखकांनी येथील मलमल, सूती आणि रेशमी वस्त्रांना ‘बुलबुलचे डोळे’, ‘मयुर कंठ’, ‘चंद्र तारे’, ‘अनलाचे तारे’, ‘वाहते पाणी’, ‘संध्याकाळचे दव’ अशा अनेक काव्यमय उपमा सुद्धा दिल्या आहेत. सर एडवर्ड बैंस (Sir Edward Bains) (१८००-१८९०) इंग्लंडमधील एका वृत्तपत्राचे संपादक होते, तसेच ब्रिटीश पार्लमेंटचेही सदस्य होते. १९३५ मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहीले. ‘हिस्ट्री ऑफ कॉटन मॅन्युफॅक्चरर’. त्यात सर बैंस लिहीतात, “आपल्या वस्त्रउद्योगात भारतीयांनी प्रत्येक युगातील अतुलनीय, सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मापदंड तयार करुन ठेवलेत. त्यांनी तयार केलेली काही मलमलची वस्त्रे तर जणू काही पऱ्या आणि फुलपाखरांनी तयार केल्यासारखी वाटतात.” याच कारणामुळे इस्लामी आक्रमणकर्त्यांच्या भयंकर अत्याचारांनंतर सुद्धा, इंग्रजांचे शासन येई पर्यंत भारतीय वस्त्रोद्योग चांगल्या प्रकारे चालू होता. इ. स. १८११-१२ मध्ये (अर्थात इंग्रजांच्या हातात पूर्ण भारताची सत्ता येण्यापूर्वी थोडं आधी) भारतातून निर्यात होणाऱ्या सूती वस्त्रांचा हिस्सा ३३% होता. दुर्दैवाने इंग्रजांच्या आर्थिक नीतिंमुळे इ. स. १८५०-५१ पर्यंत हे प्रमाण फक्त ३% टक्के उरले होते.

इंग्रजांनी ठरवून भारतीय वस्त्रोद्योगाला नष्ट केले. त्यांना याचे महत्व आणि यामुळे भारताला मिळणारी प्रसिद्धी, भारताचे आर्थिक उलाढालीतील महत्व हे माहिती होते. त्यामुळे भारतात त्यांच्या आगमनानंतर अवघ्या ५ वर्षात १६१३ मध्ये त्यांनी आपली पहिली गिरणी (मिल) (वस्त्रांचा कारखाना) भारताच्या दक्षिण टोकाला तामिळनाडूच्या मछलीपट्टणम मध्ये सुरु केला. त्याकाळी मछलीपट्टम कलमकारी कपड्यांसाठी प्रसिद्ध होते. येथील वस्त्रांना विदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी होती. इंग्रज येण्यापूर्वी भारतीय वस्त्रांची निर्मिती मदुरै, पाटन, सूरत, महेश्वर (माळवा), वाराणसी इ. ठिकाणी होत होती. असे असले तरी बंगाल भारतीय वस्त्र निर्मितीचे प्रमुख केंद्र होते. जगभरात सगळीकडे सगळ्यात जास्त मागणी इथल्या वस्त्रांची होती. ‘ढाक्याची मलमल’ पूर्ण जगात राजे, राजवाडे, आणि श्रीमंतांची पहिली पसंती होती. युरेपमध्ये याची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत होतीच, पण पूर्वेकडच्या जपान पासून ते दक्षिण अमेरिके पर्यंत सर्वत्र भारतीय वस्त्र जात होती. बंगालवर इंग्रजांचा ताबा येण्यापूर्वी पर्यंत, म्हणजेच प्लासीच्या लढाईपूर्वी पर्यंत बंगालचा कपडा पश्चिमेकडे तुर्कस्थान, ईराण, ईजिप्त, इटली, इ. देशात जात होता. पूर्वेकडे जावा, चीन आणि जपान या देशातही बंगालची मलमल आणि इतर कपड्याच्या प्रकारांना (सूती वस्त्रांचे प्रकार) चांगली मागणी होती.

शशी थरूर यांनी आपल्या ‘एन इरा ऑफ डार्कनेस’ या पुस्तकात लिहीले आहे कि, १७५० च्या दशकात कपड्याची ही निर्यात दरवर्षी एक कोटी साठ लाखा रुपयांपेक्षाही जास्त होती. (कल्पना करा हे एक कोटी साठ लाख रुपये आजपासून पावणेतीनशे वर्षांपूर्वीचे आहेत. आजच्या किंमतीचा आपण विचार करू शकता.) या व्यतिरिक्त बंगालहून रेशमाची होणारी निर्यात ही दरवर्षी ६५ लाख रुपयांची होती. जवळपास २ कोटी २५ लाख रुपयांच्या या पूर्ण निर्यातीतून भारतात आपल्या कंपन्या चालवत असलेल्या विदेशी व्यापाऱ्यांची (इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच इ.) जवळपास ६० लाख रुपयांची निर्यात युरोपात होत होती. त्यामुळे सोळाव्या शतकाच्या मध्यापासून ते अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंतच्या बंगालच्या सूती आणि रेशमी वस्त्रोद्योगात ३३% टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली होती. परंतू १७५७ मध्ये इंग्रजांनी प्लासीची लढाई जिंकल्यानंतर हे दृष्य बदलले.
(१७ जून ला प्रकाशित होणाऱ्या विनाशपर्व या पुस्तकातील अंश)

- प्रशांत पोळ
अग्रलेख
जरुर वाचा
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! 
 ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान! ८३ जणांचा मृत्यू, तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही लाही

weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121