नुकताच आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. त्यानिमित्ताने यशस्वी व्यवसायानंतर पर्यावरणाच्या कामासाठी झोकून दिलेल्या, ‘माय ग्रीन सोसायटी’चे संचालक विशाल टिब्रेवाल यांच्या हरितकार्याविषयी...
यशस्वी व्यवसायानंतर पालघर आणि परिसरातील २५० हून अधिक वनवासी महिलांना रोजगार मिळवून देणारे विशाल टिब्रेवाल. विशाल यांचा जन्म मूळचा मुंबईतील अंधेरी जेबीनगर इथला. त्यांचे माध्यमिक शिक्षण घनश्यामदास पोदार विद्यालयात झाले, तर पुढे त्यांनी अभियांत्रिकीच्या कोर्सला प्रवेश घेतला. चार वर्षांच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा कोर्स पूर्ण केल्यानंतर ते वडिलांसोबत त्यांच्या कामामध्ये सामील झाले. वडिलोपार्जित ‘ऑईल अॅण्ड गॅस इंडस्ट्री’च्या त्यांच्या कंपनीमध्ये विशाल काम पाहू लागले. अभियांत्रिकीचे शिक्षण आणि वडिलांच्या मार्गदर्शनच्या जोरावर त्यांनी व्यवसायात चांगला जम बसवला.
व्यवसायानिमित्त बाहेर फिरणं व्हायचं, त्यावेळी आपल्या देशातील अस्वच्छता आणि इतर मुद्दे प्रकर्षाने जाणवायचे, असे ते सांगतात. सर्वच गोष्टी सरकार करू शकत नाही. त्यामध्ये नागरिकांचाही समावेश आणि सहभाग हवा, हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यानंतर पुढे ‘केशवसृष्टी’च्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणासाठी काम करायचे ठरवले आणि पहिले पाऊल उचलले. स्वच्छतेची कामे, प्रदूषणाची कारणे आणि इतर संबंधित अनेक गोष्टींवर त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. तेव्हापासून ‘केशवसृष्टी’च्या पुढाकाराने सुरू झालेले ‘माय ग्रीन सोसायटी’ हा उपक्रम होता. हळूहळू या कामाला मोठे स्वरुप येत गेले. दोन वर्षांपूर्वी ‘माय ग्रीन सोसायटी’ने स्वतःचा अधिकृत ’एनजीओ’ स्थापित केला आहे.
त्याचबरोबर ‘आशीर्वाद खाद’ या नावाने या संस्थेने कंपोस्ट म्हणजेच खत बनवण्याचे कामही केले. निर्माल्यापासून खतनिर्मिती करत त्याचे वाटप केले. किनारपट्टी भागातील स्वच्छता मोहीम, कचरा संकलन, पर्यावरण आणि प्रदूषणाविषयी जनजागृती इत्यादी अनेक उपक्रम या संस्थेमार्फत राबविले जातात. ‘ग्राफिटी वॉल्स’ म्हणजेच भित्तीचित्रांमार्फत जनजागृती करण्याचे कामही ही संस्था करते. त्याचबरोबर ई-वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह, रेन वॉटर हारवेस्टिंग, सीबीओ टॉयलेट्स यावर ही ‘माय ग्रीन सोसायटी’च्या माध्यमातून काम केले जाते. तसेच आत्तापर्यंत १२ हजार ‘इको ब्रिक्स’ची निर्मिती या संस्थेने केली आहे.
विशाल यांना दोन मुले. त्यापैकी मोठ्या मुलाने सहा वर्षे परदेशी शिक्षण पूर्ण केल्यानंतर आत्मविश्वासाने वडिलांचा व्यवसाय सांभाळायला घेतला. व्यवसायातून आणखी मोकळीक मिळताच, विशाल यांनी पर्यावरणाचे काम आणखी जोर लावून सुरू केले. व्यवसायातून निवृत्ती घेतल्यानंतर स्वस्थ बसून न राहता, विशाल यांनी उर्वरित सर्व वेळ देश, समाज आणि विशेषतः पर्यावरणासाठी देण्याचे उत्साहाने ठरविले. आपल्या देशाचा विचार केला, तर असे लक्षात येते की, प्रत्येक नागरिकाचे स्वतःचे कार्बन उत्सर्जन कमी आहे. (शिी लरळिींर लरीलेप शाळीीळेप कमी) प्रत्येकाचा विचार केल्यास एक ते दीड टन कार्बन उत्सर्जन एका नागरिकामागे आहे. परंतु, जेव्हा १४० कोटी लोकसंख्येचा विचार केला जातो, तेव्हा हा आकडा प्रचंड मोठा आहे, असे दिसून येते. याविषयी जनजागृती केली नाही आणि सुधारणा झाली नाही, तर लवकरच जगाला एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल, हे निश्चित. म्हणून विशाल म्हणतात की, “ही सुरुवात माझ्यापासून व्हायला हवी, असे वाटले आणि काम सुरू केले. उर्वरित जीवन पर्यावरणाच्या कामात झोकून द्यायचे ठरवले आहे.”
‘माय ग्रीन सोसायटी’ने नुकताच एक नवीन उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे ‘थैलु’ हा प्रकल्प म्हणजे ‘अपसायकल’ (पुनर्वापर करुन वस्तूनिर्मिती) केलेल्या कपड्यापासून कापडी पिशव्या बनवणे आणि त्या बाजारात आणणे. घरात वापरलेले बेडशीट, वापरून जुने झालेले कपडे इत्यादी वस्तू गोळा करून त्यापासून कापडी पिशव्या बनवल्या गेल्या. या कापडी पिशव्या शिवण्याचे काम वनवासी महिलांना देण्यात आले होते, ज्यामुळे त्यांनाही रोजगार मिळाला. या प्रकल्पाचे महत्त्व सांगताना विशाल सांगतात की, “एक किलो वजनाचे कपडे ‘अपसायकल’ केल्यानंतर जवळजवळ अडीच किलो कार्बन उत्सर्जन थांबविता येते, म्हणजेच त्याचा कार्बन फूटप्रींट हा ‘निगेटिव्ह’ असतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लोकांच्या मनात प्लास्टिक पिशव्या न वापरण्यासाठी एक बीज पेरलं जात आहे. या लोकांमध्ये जनजागृती घडविण्यात येत आहे. त्यांना त्यासाठी उद्युक्त केले जात आहे.” हे सांगताना विशाल कापडी पिशवी वाटपाच्या वेळी वापरकर्त्यांकडून याच पिशव्या वापरण्याविषयी शपथही घेतात.
मुंबईचे उदाहरण देऊन ते सांगतात की, मुंबईमध्ये जवळजवळ ६० लाख घरे आहेत. या प्रत्येक घरात फक्त वेगवेगळ्या आकारातील चार कापडी पिशव्या असल्या तरी मुंबईतील प्लास्टिकच्या पिशव्यांचे प्रदूषण आणि वापरावरच आळा बसेल. या अभियानांतर्गत आत्तापर्यंत ‘माय ग्रीन सोसायटी’ने २५ हजार ‘थैलु’ म्हणजेच पिशव्या बनवल्या आहेत. त्यापैकी २० हजार कापडी पिशव्यांचे वाटप ही झाले आहे. आता त्यांचे लक्ष्य दर महिन्याला कमीत कमी २५ हजार पिशव्यांचे वाटप करण्याचे आहे. त्यासाठी देणग्या देणारे आणि इतर काही लोकांकडून अर्थार्जनासाठी ते प्रयत्नशील आहेत. आत्तापर्यंतची कामं देणग्यांच्या माध्यमातूनच करण्यात आल्याचेही ते सांगतात.
'Reduce, Refuse, Recyle, Reuse, Rethink' या पाच ’आर’ची आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरात आणणे अत्यंत गरजेचे आहे, असा मोलाचा सल्ला विशाल देतात. त्यांच्या या कामाला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.