निसर्गाचा ‘लखलखता महोत्सव’

    04-Jun-2023
Total Views | 104
firefly Nature Beauty sahyadri

नाशिक जवळील सह्याद्रीच्या कुशीतील भंडारदरा परिसरात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जून महिन्याच्या पहिल्या दोन ते तीन आठवड्यांपर्यंत काजव्यांचे दर्शन मोठ्या प्रमाणावर होते. हा काळ काजव्यांचा प्रजनन हंगाम असल्याने याच काळात निसर्गाच्या लखलखत्या, तेजस्वी कीटकांचे समूहाने अद्भुत दर्शन होत असते. लाईटच्या माळा लावाव्या त्याप्रमाणे काजवे लयबद्धरित्या एकाचवेळी चमकून अद्भुत सौंदर्य निर्माण करतात. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय, यांच्यातर्फे यंदा दि. ३ व ४ जून रोजी भंडारदरा येथील पांजरे गावामध्ये काजवा महोत्सव पर्यटकांच्या प्रतिसादात संपन्न झाला. नाशिक पर्यटनाच्या दृष्टीने हा महोत्सव अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. यानिमित्ताने पर्यटकांना प्रशिक्षित मार्गदर्शकासोबत काजवे पाहण्याची संधी मिळालीच परंतु वनवासी बांधवांनाही आपले धान्य, हस्तकलेच्या वस्तू विक्री करून पैसा गाठीशी आला. येथील सेंद्रिय हातसडी तांदूळ, विविध उत्पादने, स्थानिक लोकांनी बांबपासून तयार केलेल्या कलात्मक वस्तू, हस्तनिर्मित वस्तू, धान्य याची या निमित्ताने खरेदी विक्री झाल्याने वनवासी बांधवांच्या चेहर्‍यावर आनंद, समाधान दिसले. पर्यटन विभागाने काजवा महोत्सवासाठी निसर्गाची हानी होऊ नये, म्हणून काजवा पाहायला येणार्‍या पर्यटकांसाठी नियमावली केली होती. पर्यटकांनीही नियमात राहून सृष्टीचे लखलखते सौंदर्य डोळ्यात साठवले. या भागातील वनवासी बांधवांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली नृत्य, गाणी आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंदही पर्यटकांनी घेतला. ‘बोहाडा’ वनवसी नृत्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. काहींनी मुक्काम करू इच्छिणार्‍या पर्यटकांना तंबूत राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. महोत्सवाच्या ठिकाणी स्थानिक लोकांनी उत्पादन केलेल्या विविध वस्तू आणि उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री बाजारातून उलाढाल झाली. काजवा महोत्सवाला काही पर्यावरण संस्थानी प्रारंभी विरोध केला असला तरीही सृष्टीची हानी न करता कुठल्याही स्थळाचा विकास होण्यास ‘पर्यटन’ मोठी भूमिका बजावत असते. पर्यटनाने शहरात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. त्यादृष्टीने काजवा महोत्सव उपक्रम स्तुत्यच म्हणावा लागेल..!

डोळ्यांसमोर दिवसा ‘काजवे’

भंडारदरा येथे वनविभागाच्या मदतीने महाराष्ट्र शासनाचा काजवा महोत्सव एकीकडे सर्वार्थाने यशस्वी होत असतानाच दुसरीकडे काही पर्यटन संस्थानी काजव्यांच्या नावाने उखळ पांढरे करून परवानगी नसलेल्या ठिकाणी काजवे फायरटेंटसह दाखवण्याचा प्रकार सुरू केला. याची दखल घेत वनविभागाने त्यांच्यावर तत्काळ नोटिसा बजावल्या. त्यामुळे अशा व्यावसायिकांच्या डोळ्यांसमोर दिवसा ’काजवे’ चमकले असतील. चांदण्या रात्रीत काजव्याचा लखलखता महोत्सव बघण्यासाठी जंगल सफारीसह ’टेन्ट फायर’ करण्याचे सांगत बेकायदेशीर सहली आयोजित करणार्‍यांना वन्यजीव विभागाने नोटिसा बजावल्या. चुकीची माहिती प्रसारित करून प्रचारकी थाटात जाहिराती देणार्‍या १२ संस्थांना वनविभागाने काजवा महोत्सवाच्या पूर्वसंध्येला नोटिसा पाठवल्या. वनविभागाच्या अख्यात्यारित केवळ महसूल क्षेत्रातच काजवे पाहण्याची परवानगी आहे, असे असूनही त्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी काजवा महोत्सव ’टेंट फायर’सह अनुभवा अशा प्रचारकी जाहिराती सर्वत्र फिरताना दिसल्या. या प्रकाराने पर्यटकांची दिशाभूल केल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देत वनविभागाने योग्य पाऊल उचलले. काजव्यांचा लखलखते सौंदर्य पाहण्यासाठी केवळ नियोजित ठिकाणे वनविभागाने ठरवून दिली आहेत, असे असूनही काही खासगी व्यक्ती, संस्थांनी रात्रभर ‘फायरटेंट’ मुक्कामासह रात्रभर काजवे पाहा अशी फसवी जाहिरात केली. वनविभागाने वन तपसाणी नाका, सुरशेत, पांजरे, शिंगणवाडी, लव्हाळवाडी, उंबरदरा खिंड, घाटघर, इकोसिटी, रतनवाडी, कोलटेंभे, सानंददरी, घाटनदेवी मंदिर ही ठिकाणेच काजवा दृश्य पाहण्यासाठी ‘नियोजित’ केली. अभयारण्यातील रस्त्यालगतच्या क्षेत्रात काजवे पाहणे अपेक्षित असताना काही उठाठोेवी मंडळींनी ‘जंगलाच्या कोअर’ ठिकाणांची प्रलोभने पर्यटकांना दाखवली. त्यामुळे वनविभागाने काजव्यांच्या नावाने उखळ पांढरे करणार्‍या १२ संस्थावर बजावलेली नोटीस आणि कारवाई कौतुकास्पदच..! महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने आयोजित केलेल्या काजवा महोत्सवात नियमांची पायमल्ली न करता पर्यटकांकडून शुल्क आकारून केलेला महोत्सव नक्कीच पथदर्शी ठरावा.!

निल कुलकर्णी

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121