पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे स्वतंत्रता संग्राम एक्स्प्रेस ट्रेनमध्ये दगडफेकीची घटना दि. ३ जून रोजी उघडकीस आली आहे. या एक्सप्रेस ट्रेनमध्ये दोन तस्कर ट्रेनच्या प्रसाधनगृहमधून दारूची तस्करी करत होते. त्यांची सुटका करण्यासाठी हल्लेखोरांनी रेल्वेवर दगडफेक केली. यामुळे अनेक प्रवासी जखमी झाले आहेत, तसेच ट्रेनचेही नुकसान झाले आहे. रेल्वे पोलिसांनी दोन्ही दारू तस्करांना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली आहे.
मद्य तस्करांनी प्रसाधनगृहमध्ये दारू टाकून झाशीहून कोलकाताला जाणाऱ्या स्वतंत्रता संग्राम एक्स्प्रेस ट्रेनच्या प्रसाधनगृहाचे गेट लॉक केले होते. बराच वेळ स्वच्छतागृहाचे गेट न उघडल्याने प्रवाशांना त्रास होऊ लागला. त्यामुळे प्रवासीही गेट उघडण्यासाठी प्रयत्न करत होते.
मात्र, त्यानंतरही गेट न उघडल्याने प्रवाशांमध्ये अनुचित प्रकार घडण्याची भीती वाटली. काही प्रवाशांनी याची माहिती रेल्वे पोलीस दलाला (आरपीएफ) दिली.यानंतर आरपीएफनेही शौचालयाचे गेट उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र तस्कर पकडले जाण्याच्या भीतीने गेट उघडत नव्हते. दरम्यान, प्रसाधनगृहात काही आरोपी लपून बसल्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले .
दुसरीकडे आरपीएफ गेट उघडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. दरम्यान, पाटणाच्या ब्लॉक चौकाजवळ गाडी येताच तेथे उपस्थित असलेल्या बदमाशांनी दारू तस्करांच्या सुटकेसाठी ट्रेनवर दगडफेक केली. दरोड्याच्या घटनेचा अंदाज घेत आरपीएफ जवानांनी तात्काळ ट्रेनचे दरवाजे बंद केले. यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता.
काही वेळातच पाटणा पोलिसांसह आरपीएफ जवान घटनास्थळी पोहचले. यानंतर पोलिसांनी प्रसाधनगृहाचे गेट उघडून दोन्हा दारू तस्करांना अटक केली. पोलिसांनी तस्करांकडून डझनहून अधिक गोण्यांमध्ये ठेवलेली दारू जप्त केली. रेल्वेवर झालेल्या दगडफेकीत अनेक प्रवासी जखमी झाले. त्याचबरोबर ट्रेनच्या खिडक्या आणि दारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.