'शोर इन द सटी’

    03-Jun-2023
Total Views | 86
Shore in the City

शहरांची निर्मिती ही मानवाने मानवी वास्तव्यासाठी केली खरी. परंतु, गेल्या काही वर्षांत वन्यप्राणीही बेधडकपणे मानवी वस्तीत प्रवेश करताना दिसतात. त्यामागची नेमकी कारणं काय? तसेच मानव-वन्यजीव संघर्षाचे रुपांतर मानव-वन्यजीव सहअस्तित्वात करता येईल का? त्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजनांचा अवलंब करावा लागेल? यांसारख्या मुद्द्यांचा उहापोह करणारा हा लेख...

माणसांना शहरी आयुष्याचं, जीवनशैलीचं प्रचंड आकर्षण... त्यात काही गैर आहे, असेही नाही. शहरांमध्ये रोजगारापासून ते शाळा, दुकाने, राहण्याच्या व हौस-मौजेच्या सोयीसुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे माणसांचे शहरप्रेम समजू शकते, पण मग वन्यजीव का बरं शहरात दाखल होतात? माणसाने तर शहरे स्वतःसाठी बांधली, प्राण्यांसाठी नाही. तर मग हे प्राणी शहरांमध्ये असे बिनधास्तपणे कसे काय वावरतात? हल्ली वन्यप्राण्यांचे शहरांमध्ये अशा ठिकाणी दर्शन होते, जिथे त्यांना बघायची आपण कधी अपेक्षाही केली नसेल. खरंतर शहरांमध्ये हजारो-लाखो माणसांच्या पसार्‍याव्यतिरिक्त गगनचुंबी इमारती, धूर ओकणार्‍या गाड्या आणि त्याच्या जोडीला प्रचंड गोंगाट. असं हे सगळं ‘शोर इन द सिटी’चं वातावरण. त्यामुळे साहजिकच हिरव्यागार जंगलातून काँक्रिटच्या जंगलात दाखल झालेल्या प्राण्यांना पूरक अधिवास आणि अन्न मिळेल, अशा जागा कमीच. म्हणजे बघा, ज्या ठिकाणी प्राण्यांचे अस्तित्व आहे, त्याला आपण ‘प्राण्यांचा अधिवास’ म्हणतो. पण, ज्याठिकाणी प्राण्यांना अन्न व निवारा शोधणंदेखील कठीण, अशा आपल्या शहरांना ‘प्राण्यांचा अधिवास’ म्हणणं कितपत योग्य?

बर्‍याच प्राण्यांच्या प्रजाती संधीसाधू (opportunistic) असतात. याचा अर्थ ते जे काही संसाधने शोधतात किंवा उपलब्ध असतात, त्याचा ते सर्वोत्तम वापर करतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे कुत्रे आणि कावळे. कारण, घरातील जेवणापासून ते अगदी, कचर्‍यापेट्यांमधील कुजलेले अन्न खाऊन ते आरामात दिवस काढू शकतात. त्याचप्रमाणे भारतातील शहरांमध्ये घुबड, वटवाघुळं, साप, घुशी इत्यादी प्राणी स्वतःला या शहरी वातावरणात जुळवून घेण्यात यशस्वी ठरले आहेत. या प्राण्यांनी शहराशी, मानवाशी इतक्या चांगल्या प्रकारे जुळवून घेतले आहे की, त्यांच्या उपस्थितीमुळे आपल्याला फार गैरसोय होत नाही. पण, जेव्हा एखादा वाघ जंगल सोडून शहराची वाट धरतो, तेव्हा मात्र ते निश्चितच चिंतेचे कारण ठरते.असाच काहीसा प्रकार घडला तो मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये. भोपाळ तसे हे जंगल आणि ग्रामीण भागांनी वेढलेले शहर. भोपाळच्या सर्वात जवळचं संरक्षित क्षेत्र म्हणजे ‘रातापानी वन्यजीव अभयारण्य.’ ’रातापानी अभयारण्य’ हे जवळपास 50 वाघांचं अधिवास क्षेत्र. भोपाळमधल्या ‘कॅमेरा ट्रॅपिंग ऑपरेशन’मधून असे आढळून आले की, सुमारे चार वाघ हे उप-प्रौढ म्हणजेच 'sub-adult' होते. म्हणजे ते ‘रातापानी अभयारण्या’तून पसार होण्याची दाट शक्यता. पण, नंतर त्यांनी शहराची वाट का धरली असेल? त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, वाघांना त्यांच्या अस्तित्वासाठी, वावरण्यासाठी मोठ्या क्षेत्राची आवश्यकता असते. भक्ष्य आणि जोडीदाराच्या शोधात ते आपला प्रदेश हळूहळू विस्तारत जातात. म्हणूनच लक्षात घ्यायला हवे की, प्राणीजगतात मानवाने निर्माण केलेल्या सीमांना काहीही अर्थ नसतो आणि म्हणूनच मग ते मानवी वस्तीत प्रवेश करू लागतात.
 
 
भोपाळप्रमाणेच मुंबई शहरातसुद्धा असाच एक वन्यजीव कायम आढळतो; जो आकाराने जरी फार मोठा नसला, तरी त्याला पाहून भल्याभल्यांच्या पायाखालची जमीन सरकते. तो प्राणी म्हणजे बिबट्या. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनी, फिल्मसिटी आणि त्याच्या आसपासचा परिसर हे बिबट्याचे अधिवास क्षेत्र. आता मुंबईच्या एवढ्या प्रचंड लोकसंख्येला सामावून घेत, आपली मानवी हद्द अगदी जंगलाजवळ येऊन पोहोचली आहे आणि माणूस आला म्हटला की, मग आपसुकच त्याच्यामागे येतो तो भरमसाठ कचरा. कचर्‍यामागे येतात कुत्रे आणि मग त्या कुत्र्यांनाच आपले भक्ष्य समजून शहरात दाखल होतात ते बिबटे! ऐकायला विनोदी वाटेल कदाचित, तरी ही खूप गंभीर समस्या आहे आणि त्याचे गांभीर्य भविष्यात अजून वाढत जाणार आहे. गेल्या काही वर्षांत आरे कॉलनीमध्ये बिबट्यांनी माणसांवर हल्ले केले. त्यात काही जणांना जीवसुद्धा गमवावा लागला. या समस्येवर तोडगा काढायला ’महाराष्ट्र वन विभाग’ आणि ’मुंबईकर्स फॉर SGNP’ या संस्था कार्यरत आहेत. बिबट्या दिसल्यास काय करावे? तसेच, त्याला वस्तीपासून दूर ठेवण्यास काय करावे? (उदा. भटके कुत्रे फिरू नयेत, म्हणून आपला परिसर स्वच्छ ठेवणे) इत्यादींची जाणीव करून देणे. दुसरं म्हणजे, बिबट्याला आपल्या वस्तीपासून लांब ठेवण्यासाठी सक्रिय प्रयत्न करणे. या प्रयत्नांमध्ये बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण आणि प्रभावी अडथळ्यांचे बांधकाम यांसारख्या बाबींचा समावेश होऊ शकतो.
 
 
अशाच एक ‘ब्रेकिंग न्यूज’चे कारण ठरलेल्या गव्याला काही दिवसांपूर्वी तळोज्याच्या एमआयडीसीमधून ’रेस्क्यू’ करण्यात आले होते. याआधीसुद्धा पुण्यामध्ये दोनवेळा गव्याचे आगमन झाले. पहिल्या घटनेत स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक विभागाच्या गलथान कारभारामुळे त्या गव्याला वाचवता आले नाही आणि त्याचा मृत्यू झाला. कदाचित ही घटना लक्षात घेऊन तळोजा येथे केलेली कारवाई अत्यंत सावधगिरीने पार पडली.असे हे वन्यजीव त्यांच्या नियुक्त वनक्षेत्रातून बाहेर येण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे, त्यांच्या अधिवासाचे तुकडे होणे, ज्याला ’forest fragmentation’ असेही म्हणतात. बरीच जंगले आणि वन्यजीवांची निवासस्थाने एकमेकांपासून वेगळी झाली आहेत. त्यांच्यात काही ’कनेक्टिव्हिटी’ उरलेली नाही. यामुळे वन्यजीवांच्या विविध ’मेटापोप्युलेशन’ची निर्मिती झालेली दिसून येते. हे प्राणी अधिक संसाधनांच्या शोधात फिरताना बरेचदा मानवी वस्तीत दाखल होतात आणि पुढे त्याचा परिणाम मानव-वन्यजीव संघर्षाच्या परिस्थितीत दिसून येतो. या परिस्थितीचे निराकरण आणि संघर्ष-समस्या कमी करण्यासाठी, एक बहुआयामी उपाय शोधणं सर्वात महत्त्वाचे आहे. वन्यजीवांबद्दल समाजाचा दृष्टिकोन बदलणे, हे मानव आणि वन्यजीवांमधील सुसंवाद निर्मितीचे पहिले पाऊल ठरेल. वन्यप्राण्यांबद्दल लोकधारणा बदलल्याने बरेच सकारात्मक परिणाम झालेले दिसतात आणि तेही विशेषत: जंगलांजवळील मानवी वस्त्यांवर. वन्यप्राण्यांबद्दल लोकांच्या दृष्टिकोनात बदल करण्याबरोबरच हे संघर्ष शमन करण्याच्या उपाययोजनांमुळे (mitigation measures) मानव-वन्यजीव संघर्ष कमी झाला आहे.


 दुसरे म्हणजे, भारतातील उर्वरित ‘ग्रीन झोन’च्या देखभालीवरही आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्राणी, विशेषतः मोठ्या सस्तन प्राण्यांना जगण्यासाठी मोठ्या क्षेत्राची आवश्यकता असते. सध्या या हिरव्यागार जागा लोकसंख्येच्या समुद्राने वेढलेल्या बेटाच्या स्वरूपात आहे. मग साहजिकच अशाप्रकारे जेव्हा एखादा प्राणी जंगलाबाहेर पडतो, तेव्हा लोकांमध्ये भीती निर्माण होते. ही भीती कमी करण्यासाठी, प्राण्यांना मुक्त संचाराचा अधिकार देणे आणि ’वन्यजीव कॉरिडोर‘चा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. तिसरा उपाय आहे, तो म्हणजे वन्यजीवांच्या लोकसंख्येवर नियंत्रण. आपण अनेकदा प्राण्यांच्या लोकसंख्या नियंत्रणाविषयी बोलणेही टाळतो. त्यामागील कारणे म्हणजे प्राण्यांबद्दलचे नैतिक प्रेम आणि 1972चा कठोर ‘वन्यजीव संरक्षण कायदा’. या कायद्याचा मुख्य उद्देश भारतातील वन्यजीवांना संरक्षण प्रदान करणे आहे. पण, याच कायद्यामुळे समाजातील अनेक घटकांवर अन्यायदेखील होताना दिसतो. खासकरून दुर्गम भागात वास्तव्यात असलेल्या शेतकर्‍यांवर. जेव्हा रानडुकरं आणि नीलगायींसारखे प्राणी संपूर्ण शेत नष्ट करतात, तेव्हा शेतकर्‍याचे प्रचंड नुकसान होतेच आणि त्याचबरोबर मनःस्तापदेखील होतो. हे प्राणी जंगलांऐवजी शेतजमिनीकडे वळतात. कारण, तेथे अन्न मिळणे सोपे असते. बर्‍याच ठिकाणी माकडं, रानडुकरं, गवे, हरीण यांच्या संख्येत वाढ झाली आहे आणि त्याचा परिणामदेखील शेतीवर होताना दिसतो. अशावेळी, तृणभक्षी प्रजातींची नैतिक शिकार सुरू करण्याची तरतूद असणे महत्त्वाचे आहे. अत्याधिक शिकारीचा धोका कमी करण्यास वनविभागाला अशी शिकार करण्यास परवानगी द्यायला हवी. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान काही प्रमाणात कमी होईल.
 
 
जसजसे जग बदलत आहे, तसतसे जुने मार्ग सोडून वन्यजीव संरक्षण, संवर्धनाचे नवीन आणि प्रभावी मार्ग स्वीकारणे आवश्यक आहे. वन्यजीव हे आपल्या जगाचा अविभाज्य भाग आहेत. आपल्याला त्यांची केवळ त्यांच्या पर्यावरणीय सेवांसाठीच गरज नाही, तर त्यांच्या मनोरंजक मूल्यांच्या रूपात त्यांचे असणेदेखील महत्त्वाचे आहे. म्हणूनच या वन्यजीवांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सक्रिय व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. याचा सखोल विचार केल्यास, मानव आणि वन्यजीवांच्या सहअस्तित्वाचा हा प्रवास अधिक सुखकर होऊ शकतो.
 
 
-ओंकार पाटील

अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121