छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेकाचे निमित्त साधून शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये कोणते उपक्रम राबवले जावेत, या काळात विद्यार्थ्यांसमोर शिवचरित्राचे अनेक ज्ञात-अज्ञात पैलू मांडण्यात यावेत, पण ते कशा प्रकारे मांडावे हे मी माझ्या आकलनाप्रमाणे या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रत्येक राष्ट्राला स्वतःचा एक इतिहास असतो. तो इतिहास नियमितपणे त्या राष्ट्राला प्रेरणा देत राहतो. त्या प्रेरणेमुळे ते राष्ट्र आत्मनिर्भर होते. आपला बराच मोठा इतिहास परकीयांनी लिहिला. तो म्हणावा तसा आपल्यासाठी प्रेरणादायी ठरला नाही. अनेक इतिहास संशोधक संशोधन करत असतात. आजही आपला खूप मोठा इतिहास व त्यातील अनेक संकल्पना संशोधकांच्या प्रतीक्षेत आहेत. एखाद्या घटकावर संशोधन करताना आधी त्या घटकासंदर्भात किती आणि काय काम झाले, हे समजून घेणे आवश्यक असते. एकदा का ते समजले तर त्या संदर्भात आपल्याला पुढे काय काम करायचे, ते कळू शकते, अन्यथा आधी इतरांनी जे केले तेच आपण केले, तर ते संशोधन नाही होत. त्याला मान्यताही मिळत नाही. एखादी घटना जेव्हा आपण बघतो, ऐकतो किंवा वाचतो, त्यावेळी आपल्या मनात त्या घटनेसंदर्भात जे चिकित्सात्मक भाव उत्पन्न होतात व त्यातून आपण जे निष्कर्ष काढतो त्यालाच साकल्याने ‘संशोधन’ असे म्हणतात. इतकी संशोधन प्रक्रिया सोपी असते.
विज्ञान संशोधनात पुन्हा-पुन्हा प्रयोग करून त्यात आलेले निष्कर्ष पडताळून पाहता येतात. निष्कर्षात बदलही होत नाहीत. उदाहरणार्थ, न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. हा शोध लागण्यापूर्वीसुद्धा वस्तू वरून खाली पडत होती आणि हा शोध लागल्यानंतर सुद्धा वस्तू वरून खालीच पडते. पृथ्वीतलावर कुठेही यात स्थळ, काळपरत्वे बदल नाही होत. न्यूटनने या घटनेकडे ज्या चिकित्सक दृष्टीने बघितले आणि त्यावर मंथन करून जो सिद्धांत मांडला, त्यालाच आपण गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणतो.
पण, इतिहास संशोधनात असे करता येत नाही. कारण, ऐतिहासिक घटना या पूर्वी घडून गेलेल्या असतात. आपल्याला संशोधन करायचे, म्हणून त्या पुन्हा घडवून आणता येत नाहीत. उदाहरणार्थ, १७६१ मध्ये झालेले पानिपतचे युद्ध, एखाद्या इतिहास संशोधकाला, संशोधन करायचे, म्हणून ते युद्ध पुन्हा होऊ शकत नाही.
त्यामुळे इतिहासाचे संशोधन करताना ज्या घटकासंदर्भात संशोधन करावयाचे आहे. त्या संदर्भातील उपलब्ध असलेले दस्तावेज, त्या कालखंडातील दगड किंवा धातूच्या आज उपलब्ध असलेल्या वस्तू, युद्धाच्या ठिकाणी असलेल्या खुणा, वापरलेली हत्यारे, पत्रव्यवहारासाठी वापरलेल्या कागदाचा कालखंड किंवा त्याच्या शाईचाही कालखंड, तत्कालीन सामाजिक स्थिती, राजकीय घडामोडी, भौगोलिक परिस्थिती, शेती, व्यापार, दळणवळणाची साधने, गुहाचित्रे, लोकगीते, आख्यायिका, पोवाडे, श्रुती, स्मृती, इतर संदर्भ साहित्य आदींचे चिकित्सापूर्वक निरीक्षण करावे लागते. इतिहास संशोधन करताना जसजशी नवीन ऐतिहासिक माहिती, दस्तावेज मिळत जातात, तसतसा जुन्या संकल्पना बदलून नवीन संकल्पना प्रस्थापित होत जातात. म्हणजेच जसे पुरावे उपलब्ध होत जातात, तसे इतिहास संशोधनात बदल होत जातात. वस्तुत: कोणतेही संशोधन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. कोणत्याही ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करताना, संशोधनाची वरील पद्धत वापरणे आवश्यक असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यावर्षी ३५० वर्षं पूर्ण होत आहेत. शिवराज्याभिषेक ही घटना आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी, भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी झालेली ही एक ऐतिहासिक घटना आहे.
म्हणूनच यावर्षी आपण हा राज्याभिषेक दिन या भूतलावर ज्या ज्या ठिकाणी शक्य त्या सर्व ठिकाणी दिव्यांची रोषणाई करत साजरा करत आहोत. स्वतः महाराजांनी आपल्या राजमुद्रेत ’मुद्रा भद्राय राजते’चा उल्लेख केला आहे. याचाच अर्थ ही मुद्रा जिथे उमटेल तिथे अभद्र काही असणार नाही, असा विश्वास समाजाला दिला आहे. हे रयतेचे, रयतेच्या कल्याणासाठी स्थापलेले आधुनिक जगातील पहिले राज्य आहे. छत्रपतींचा इतिहास हा तुम्हां-आम्हां सर्वांसाठी नुसताच प्रेरणादायी नाही, तर वर्तमानकाळातील आपल्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मार्गदर्शकही आहे. शिवराज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष आपण का साजरा करायचे? हा एक मोठा प्रश्न आहे. महाराजांचे अपूर्ण राहिलेले कार्य जर आपणास खर्या अर्थाने पूर्ण करावयाचे असेल तर, त्यांच्या अपूर्ण इच्छा, संकल्पना, स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी आपण हे वर्ष मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे महाराजांचे विचार हे आज कसे मार्गदर्शक आहेत व ते अंगीकारण्यात या देशाचे कसे हित आहे, महाराजांच्या विचारातून हा देश आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून विकासाकडे कशी वाटचाल करेल. यावर प्रत्येकाने चिंतन, मनन करणे आवश्यक आहे.
प्रत्येक भारतीय नागरिकाने नमन करावे असे किंवा शाळाशाळांमधून शिक्षक व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून चिंतन व मनन व्हावे, असे शिवछत्रपतींच्या कार्यकर्तृत्वासंबंधातील विविध पैलूंचे दर्शन घडवणार्या उपक्रमांचे विषय खालीलप्रमाणे-
१) शिवराज्याभिषेकाचे अलौकिकत्त्व/शिवराज्याभिषेक दिन का साजरा करायचा?
२)शिवाजी महाराजांनी १६४५ साली केलेल्या रायरेश्वराच्या मंदिरातील प्रतिज्ञा आणि त्याच वर्षी युरोपातील राष्ट्र-राज्य निर्मितीची वेस्ट फलियामधील संकल्पना या दोन घटनांचा तुलनात्मक अभ्यास/चर्चा.
३) महाभारतात लाक्षागृहातून झालेली पांडवाची सुटका व आग्राच्या काळकोठडीतून महाराजांची सुटका या दोन घटनांमध्ये साम्य आणि भेद.
४) इतिहास संशोधन म्हणजे काय? त्याची गरज व महत्त्व
५)संशोधन म्हणजे काय?
६)इतिहास संशोधन व विज्ञान संशोधन दोघांमधील फरक - चर्चा करा.
७) इतिहासातून आपण नेमके काय शिकतो?
८) इतिहासाचा अभ्यास नेमका कसा करावा?
९) आम्ही इतिहासातून काहीच शिकत नाही, असे केव्हा-केव्हा वाटते?
१०) आमची पराभूत मानसिक मनोवृत्ती कशी झाली? त्यातून आम्हांला सर्वात प्रथम कोणी व कसे बाहेर काढले?
११) पूर्वी युद्धांमध्ये राजा किंवा सेनापती धारातीर्थी पडला, तर त्याचे सैन्य रणांगणातून माघारी पळत, यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण आणि इतर भारतीय राजांचे धोरण यावर चर्चा करा.
१२) लढाईत पराभव होत असेल, तर यशस्वी माघार कशी घ्यावी किंवा काही दगाफटका झालाच, तर पुढे काय करावे, याबद्दलचे महाराजांचे धोरण व इतर भारतीय राजांचे धोरण यावर चर्चा करावी.
१३) लोकमान्य टिळकांची शिवजयंती उत्सव का सुरू केला?
१४) छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते, तर?
१५) छत्रपतींचे प्रशासन व आजचे प्रशासन यावर चर्चा करावी.
१६) ’जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी’ ही उक्ती आजच्या संदर्भात किती परिणामकारक - चर्चा करावी.
१७) हिंदवी स्वराज्याचे उद्गाते - शहाजीराजे
१८) छत्रपती शिवाजी महाराजांचे भाषा शुद्धीकरणातील योगदान.
१९) स्वराज्यातील तिसरा डोळा बहिर्जी नाईकांची आजही गरज - चर्चा करा.
२०) छत्रपती शिवाजी महाराज - रयतेचे राजे.
२१)गड बोलू लागले तर!
२२) रायगड बोलू लागला तर!
२३) मी शिवाजी महाराज बोलतोय!
२४) राज्यव्यवहार कोश - छत्रपतींचे योगदान.
२५) शत्रूला महाराजांच्या योजनांचा अंदाज कधीच का आला नाही?
२६) आपल्या मते महाराजांचे एकमेवाद्वितीय वैशिष्ट्य कोणते?
२७) स्वराज्याच्या सीमांबद्दल महाराजांची संकल्पना.
२८) ’औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्येयापासून फारकत घेतली’ या विधानावर चर्चा करा.
२९) निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी॥
३०) अखंड असावे सावध
३१) एक मावळा म्हणून माझे कर्तव्य.
३२) आपल्या गावाचा इतिहास
वार्षिक उपक्रमांचे नियोजन----
जून-- पूर्वपीठिका (व्याख्यान) शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा
जुलै-- निबंध स्पर्धा.
ऑगस्ट-- वक्तृत्व./विद्यार्थ्यांनी स्वतः पोवाडे तयार करणे व त्याचे सादरीकरण करणे, स्पर्धा/ऐतिहासिक विषयावर निमेशन किंवा व्हिडिओ बनविणे स्पर्धा.
सप्टेंबर-- नाटक, एकांकिका, ऐतिहासिक प्रसंगांचे नाट्यीकरण/अभिवाचन स्पर्धा. (इतिहास विषयक ग्रंथांचे)
ऑक्टोबर-- चित्रफित (जाणता राजा)
नोव्हेंबर-- किल्ले बनविणे स्पर्धा. आपल्या गावाचा/परिसराचा इतिहासावर व्हिडिओ बनविणे किंवा ’पीपीटी प्रेझेंटेशन’ स्पर्धा,
डिसेंबर-- प्रदर्शन (किल्ले, ऐतिहासिक क्षेत्रे, ऐतिहासिक प्रसंग, ऐतिहासिक युद्धांची चित्रे, नेते, पोवाडे.
जानेवारी--सहली, दुर्गभ्रमंती, ऐतिहासिक किल्ल्यांवरील (प्रत्यक्ष भेटी- चित्रफित, मेकअप आर्टिस्ट.
फेब्रुवारी-- प्रश्नमंजुषा, किल्ल्यांवरील स्वच्छता मोहीम, ऐतिहासिक प्रसंगांचे (पुस्तकांचे) अभिवाचन.
एप्रिल-- समारोप श्रमपरिहार
वर्षभर आपण काय केले?
काय करायला हवे होते?
काय राहून गेले?
इतर उपक्रम---
१)शिवचरित्रावर व्याख्याने
२) शिवचरित्रावर कथाकथन
३)अल्बम बनविणे
४)पीपीटी प्रेझेंटेशन
५)शिवकालीन शस्त्र प्रदर्शन.
हे आपलं पहिलं पाऊल असेल, सर्वजण मिळून वर्षभरात आपल्या मनाला समाधान,आनंद वाटेल असं छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचं ३५१ वे वर्ष साजरे करूया. या ३५०व्या श्री शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने आपण शिक्षक म्हणून पुढच्या पिढीची दृष्टी आणि मनं घडवूया. मी या प्रवासातील आपला एक सहकारी शिक्षक.
प्रा. प्रशांत शिरुडे
(लेखक के. रा. कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, डोंबिवली येथे सहशिक्षक आणि इतिहास संकलन समितीचे सदस्य आहेत.)
prashantshirude1674@gmail.com