निलगिरीतील ‘किस्टोन फाऊंडेशन’च्या प्रमुख डॉ. अनिता वर्गीस यांच्या पुढाकाराने ‘वेस्टर्न घाट प्लांट स्पेशलिस्ट ग्रुप’ (थॠझडॠ) याला ‘आययुसीएन’ची मान्यता मिळाली. जवळपास 60 शास्त्रज्ञ, स्थानिक वनस्पतींच्या लागवडीचे तज्ज्ञ, स्थानिक ज्ञानाचे अभ्यासक आणि दहा संस्था याच्या सदस्य आहेत. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने संकटग्रस्त वनस्पतींना जीवनदान देणार्या अशा या संस्थेच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
वविविधता राखण्यासाठी जागतिक पातळीवर काम करणार्या संस्थांपैकी एक प्रमुख संस्था म्हणजे ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ (IUCN). अनेक देश आणि सामाजिक संस्था या संघटनेच्या सदस्य आहेत. नैसर्गिक अधिवास, त्यातील विविध प्रजाती आणि त्यांचा मानवासाठी होत असलेला वापर याचा अभ्यास करून, सद्यःस्थिती जाणून घेऊन त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे, हे ‘आययुसीएन’चे प्रमुख काम आहे. याच ‘आययुसीएन’चा भाग म्हणजे ‘स्पीसीज सर्व्हायव्हल कमिशन‘ अर्थात ’SSC.’ सजीवसृष्टीचे अभ्यासक आणि संरक्षक संशोधक यांचे वेगवेगळे गट या ‘एसएससी’मध्ये आहेत. हत्ती, बेडूक, मासे, कवके यावर काम करणारे गट आहेत. एखाद्या देशातील किंवा भागातील प्रजातींवर काम करणारे गटही आहेत. प्रत्येक गटाचे काम हे स्वतंत्र असले तरीही एका ठरलेल्या आराखड्यानुसार चालू असते. ‘आययुसीएन’च्या कामामध्ये लागणारी प्रजातींबद्दलची माहिती, त्या कुठे आणि कशा स्थितीत आहेत, त्यांना असलेले धोके कुठले आणि त्यांचे संरक्षण करायला काय उपाय करायला लागेल, ही माहिती ‘एसएससी’चे गट पुरवतात. या माहितीच्या आधारावर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. हत्तींच्या शिकारीला परवानगी द्यावी अथवा नाही, पर्यावरण बदलामुळे कुठल्या बेडूक प्रजाती नामशेष होत चालल्या आहेत, धोकादायक तणे कुठली अशा प्रश्नांची शास्त्रीय उत्तरे या गटांच्या संशोधनातून मिळतात.
भारतीय वनस्पतींवर काम करणारा कुठलाही स्वतंत्र गट अस्तित्वात नव्हता. एकट्या पश्चिम घाटात 5 हजार, 800च्या आसपास वनस्पती आहेत. यापैकी अंदाजे 2 हजार, 100 या प्रदेशनिष्ठ आहेत. येथील स्थानिक समाज, त्यांच्याकडून होत असलेला वनस्पतींचा शाश्वत वापर याबद्दलही माहिती एकत्रित करणे आवश्यक होते. यावर काम करणार्या अनेक उत्तम संस्था एकत्रित येऊन, राज्याच्या मर्यादा ओलांडून एकमेकांशी संवाद चालू व्हायची निकड भासू लागली होती. यासाठी निलगिरीतील ‘किस्टोन फाऊंडेशन’च्या प्रमुख डॉ. अनिता वर्गीस यांच्या पुढाकाराने ‘वेस्टर्न घाट प्लांट स्पेशलिस्ट ग्रुप‘ (WGPSG) याला ‘आययुसीएन’ची मान्यता मिळाली. जवळपास 60 शास्त्रज्ञ, स्थानिक वनस्पतींच्या लागवडीचे तज्ज्ञ, स्थानिक ज्ञानाचे अभ्यासक आणि दहा संस्था याच्या सदस्य आहेत. सह्याद्रीची खास ओळख असलेले कारवीचे फूल हा या गटाचा लोगो.पश्चिम घाटातील वनस्पतींची यादी बनवणे, प्रदेशनिष्ठ वनस्पती यादी, खेरीज येथील विशेष अधिवास, त्यातील प्रजाती यांबद्दलची माहिती सुलभ भाषेत उपलब्ध करून देणे, स्थानिक वनस्पतींचे संवर्धन करण्यासाठी रोपवाटिका तयार करणे, दुर्मीळ आणि संकटग्रस्त वनस्पतींची लागवड करायला मदत करणे, त्यांच्या वाढीसंबंधी संशोधन करणे, वनस्पतींच्या संरक्षणासाठी विशेष संरक्षित प्रदेश जाहीर करता येतील का, याचा अभ्यास करणे, आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक संशोधन यामध्ये दुवा म्हणून काम करणे, हे ‘डब्ल्यूजीपीएसजी’ या कामाचा भाग आहेत.
‘रेड लिस्ट‘ या संकटग्रस्त प्रजातींच्या जागतिक डेटाबेसमध्ये भारतीय वनस्पतींची माहिती संकलित करणे ‘डब्ल्यूजीपीएसजीफ च्या कामापैकी एक प्रमुख काम आहे. नामशेष झालेल्यापासून (Extinct), होण्याची तीव्र शक्यता असलेल्या ते फारशी शक्यता नसलेल्या (Least Concern) सर्वांना इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामध्ये एखादी प्रजाती नामशेष होण्याची शक्यता किती, त्याला कुठले धोके आहेत, याचा उहापोह केलेला असतो आणि त्या प्रजातीला वाचवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, याचा आराखडाही दिलेला असतो. या माहितीच्या आधारे प्रजाती संवर्धनाचे कायदे होतात. प्रजाती संवर्धनासाठी निधी पुरवणार्या संस्था या यादीतील वनस्पतींची माहिती ग्राह्य धरून त्यानुसार निधीचे वाटप करतात. एखाद्या प्रजातील विशेष धोका आहे, असे ‘रेड लिस्ट‘ मध्ये जाहीर झाले, तर सार्या जगाचे लक्ष त्याकडे वळते. त्यामुळे हे काम अतिशय काळजीपूर्वक करणे अपेक्षित असते.यासाठी लागणारी माहिती ही विविध संस्था, पुस्तके, शोधनिबंध, संशोधकांकडे उपलब्ध असते. ती संकलित करून ‘रेड लिस्ट‘ मध्ये नोंदली जाणे, हे काम जिकिरीचे असते. यात अनेक जणांचा सहभाग, संवाद साधावा लागतो. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या शंका फीटेपर्यंत उत्तरे द्यावी लागतात. यासाठी ‘डब्ल्यूजीपीएसजी’तर्फे समन्वयक म्हणून मी (डॉ. अपर्णा वाटवे) काम पाहते. माझ्यासोबत या विषयात पारंगत झालेले दहा ‘रेड लिस्ट असेसर्स‘ काम करत असतात. प्रकाशित माहिती नसली पुरेशी नसली, तर ती गोळा करणे, नकाशे बनवणे, उत्तम फोटो काढणे अशा अनेक गोष्टींची जोड लागते. यासाठी आतापर्यंत दोन प्रशिक्षण कार्यशाळाही घेतल्या आहेत.
पश्चिम घाटात वनस्पतींचे वर्गीकरण आणि प्रादेशिक याद्या यावर मुबलक संशोधन झाले आहे. तरीही एखाद्या वनस्पतीला नामशेष होण्याचा धोका आहे अथवा नाही, हे कळण्यासाठी या माहितीची अत्यंत आवश्यकता असते. ही माहिती मिळवता मिळवता अनेक वर्षे जाऊ शकतात आणि त्यामध्ये ती वनस्पती दुर्लक्षित राहिली, तर नामशेष होण्याचा धोका वाढू शकतो.कोकणची ‘दीपकाडी‘ (Dipcadi concanense) या वनस्पतीचे मूल्यांकन करताना याचा अनुभव आला. ही वनस्पती संकटग्रस्त आहे, ही नोंद भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थेच्या ‘रेड डेटा’ पुस्तकात फार पूर्वीच केली गेली आहे. गोव्यातील मोपा या सड्यावर विमानतळाचा प्रकल्प येणार होता. तेव्हा तिथे ही वनस्पती स्थानिक संशोधकांना आढळली आणि त्यांनी तशी नोंद करणारा शोधनिबंधही प्रकाशित केला. विमानतळाविरुद्ध दाखल झालेल्या याचिकेत याचा उल्लेख होता. मात्र, याबाबाबत न्यायालयाने विचारणा केली असता, ‘भारतीय वनस्पती सर्वेक्षण संस्थे‘ने ही वनस्पती इतरत्रही आढळते, असे निवेदन सादर केले. वास्तविक ती किती ठिकाणी आढळते, यापेक्षा ती नामशेष होण्याचा धोका किती आणि तो टाळण्यासाठी गोव्यातील मोपावर सापडणार्या ‘दीपकाडी‘चे संरक्षण करणे किती आवश्यक आहे, यावर विचार करून उपाययोजना होणे आवश्यक होते. मात्र, या मुद्द्याला बगल दिली गेली आणि मोपा विमानतळ करण्यासाठी झालेल्या सड्याच्या सफाईत ‘दीपकाडी‘ दिसेनाशी झाली. हा प्रकार मी आपल्या डोळ्याने पाहिल्याने या वनस्पतीची लवकरात लवकर ‘असेसमेंट‘ गरजेची आहे हे लक्षात आले.
‘दीपकाडी‘वर संशोधन केलेले डॉ. अमित मिरगळ हे ‘डब्ल्यूजीपीएसजी’चे सदस्य आहेत. त्यांना ‘दीपकाडी‘चे सर्व बारकावे माहीत होते आणि दापोलीत त्याची यशस्वी लागवडही त्यांनी करून पहिली होती. जवळपास आठ-दहा वर्षे ते या वनस्पतीचा विविध अंगाने अभ्यास करत होते. या वनस्पतीची ‘रेड लिस्ट असेसमेंट‘ करायला त्यांनी घेतली आणि त्यासाठी लागणारी तांत्रिक मदत करायला आमची सारी टीम तयार झाली. या भागात काम करणारे इतर वनस्पती संशोधक, निसर्ग अभ्यासक, इतकेच काय तर निसर्गचित्रण करणारे फॉटोग्राफर या सार्यांना ही वनस्पती गेल्या पाच वर्षांत कुठे, किती प्रमाणात दिसली याची माहिती मागवून घेतली. शक्य त्यांना "iNaturalist" या डेटाबेसमध्ये फोटो आणि तारीख घालून याची नोंद करायला सांगितली. ‘द हॅबिटाट ट्रस्ट’च्या मदतीने ‘बॉम्बे एनव्हार्यन्मेंटल अॅक्शन ग्रुप‘चा सडे अधिवासाचा अभ्यासप्रकल्प राजापूर लांजा भागात चालू आहे. या भागात सड्यावर ‘दीपकाडी‘ मोठ्या प्रमाणात सापडते, हे स्थानिक लोकांकडून कळल्यावर आदित्य गडकरी आणि मनाली राणे या तरुण संशोधकांनी तो भाग पिंजून काढला आणि ती कुठे आणि किती आहे, याची नोंद केली. मंगेश चव्हाण, प्रतीक मोरे यांच्याकडून या वनस्पतीचा स्थानिक वापर गजरे बनवायला कसा होतो, हे कळले.
याखेरीज या भागात येऊ घातलेले प्रकल्पांची, इतर धोक्यांची माहिती गोळा केली, त्यांनी या वनस्पतीच्या स्थानावर होत असलेले परिणाम याचाही विचार झाला. कोंकणी ‘दीपकाडी ही 'Endangered' म्हणजे ‘संकटग्रस्त‘ आहे. आताच काही हालचाली केल्या नाहीत, तर पुढील पाच वर्षांत ती नामशेष होण्याच्या धोकारेषेवर पोहोचेल, हा याचा अर्थ. म्हणूनच कोकणच्या या देखण्या प्रजातीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. लोकांपर्यंत तिची माहिती पोहोचवी म्हणून देवरुखमधील निसर्गप्रेमी संस्थांनी खास ‘दीपकाडी महोत्सव‘ आयोजित केला गेला आणि त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. असे प्रयत्न आवश्यक आहेत. त्याबरोबर अशा अनेक दुर्मीळ वनस्पतींचा अधिवास असलेले सडे वाचवणे आणि ‘दीपकाडी‘च्या स्थानिक भागात पसरेल याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे.‘रेड लीस्ट‘ म्हणजे संशोधन पत्रिका नाही. त्यात प्रजातीचे नाव प्रकाशित होणे ही केवळ पहिली पायरी असते. त्यापुढे त्यांच्या संवर्धनाचा आराखडा तयार करून त्या आराखड्या बरहुकुम प्रत्यक्ष कृती करणे हे सर्वात महत्त्वाचे.गोड्या पाण्यातील वनस्पतींच्या संवर्धनासाठी काम करणार्या "IUCNSSC Freshwater Plant Specialist Group" आणि वृक्षांवर काम करणार्या ‘ग्लोबर ट्री ग्रुप’ला भारतीय वनस्पतींची ‘असेसमेंट‘ करून त्याचवर संवर्धन आराखडा तयार करणे हे ‘डब्ल्यूजीपीएसजी’चे काम चालू आहे. पर्यावरणाच्या पुनरुज्जीवनाचे काम करणार्या संस्थांशी जोडून त्यांच्याबरोबर संकटग्रस्त वनस्पतींना वाचवण्याचे प्रयत्न व्हावेत, असा ‘डब्ल्यूजीपीएसजी’चा प्रयत्न आहे.गेल्या पाच वर्षांत या गटाने हळूहळू आपल्या वनस्पती संवर्धनाच्या ध्येयाकडे वाटचाल सुरू केली आहे. या कामात हिरीरीने झोकून देणारे उत्साही तरुण-तरुणी संशोधक पुढे येत आहेत. त्यामुळे प्रयत्नांना यश येणार याची खात्री आहे.
-डॉ. अपर्णा वाटवे