उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सुरू झालेले वाक्युद्ध आता वैयक्तिक पातळीवर घसरण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. ठाकरेंच्या आरोपांना फडणवीसांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर हा वाद आणखी विकोपाला जाताना दिसत आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तीन वर्षांपूर्वी झालेल्या दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणावर वक्तव्य करत संशयाच्या घेर्यात असलेल्या आदित्य ठाकरेंना जणूकाही निर्वाणीचा इशारा दिला आहे. “दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणात तपास संस्थांकडून तपास सुरू असून, आम्हाला काही भक्कम पुरावेदेखील हाती लागले आहेत. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीच्या विरोधात मग व्यक्ती कुणीही असो, त्या व्यक्तीला दोषी असल्यावर सोडणार नाही. राज्य सरकार संबंधितांवर निश्चितच पुराव्यांच्या आधारे कारवाई केल्याशिवाय राहणार नाही,” असे फडणवीसांनी म्हटले आहे. दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूतच्या कथित मृत्यू संदर्भात राणे पितापुत्रांकडून केल्या जाणार्या आरोपांमुळे अडचणीत आलेल्या ठाकरे पितापुत्रांना देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता घाम फुटण्याची वेळ आली आहे. खरं तर उद्धव ठाकरेंनी मुंबई पालिकेतील भ्रष्टाचारावर ‘एसआयटी’ची घोषणा करताच अकारण देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तिगत प्रकरणावर टिप्पणी करून नको तो वाद ओढवून घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी आजवर ज्या व्यक्तीवर आरोप केले, त्या व्यक्तीला एकदा का होईना; पण कारागृहात जावे लागलेले आहे, हा इतिहास. मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचार आणि इतर प्रकरणांमुळे अडचणीत आलेल्या उद्धव ठाकरे आणि निकटवर्तीयांना तपास संस्थांच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच जर आता दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या तपासाला वेग आला आणि त्यात ’बड्या’ धेंडांचा सहभाग असल्याचं सिद्ध झालं तर तो ’त्यांच्या’साठी सर्वांत मोठा झटका असणार आहे. त्यामुळे ठाकरे असोत किंवा इतर कुणी जर फडणवीसांच्या वैयक्तिक प्रकरणात जाण्याचे धाडस केले, तर ’बात निकलेगी तो आप की भी निकलेगी, और दूर तलक भी जाएगी,’ हा इशारा त्यांनी लक्षात ठेवणे, आवश्यक आहे.
तुमचे कुटुंब, तुमची जबाबदारी!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आणखी काही महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला असून, कायदेशीर मार्गाने दोषी असलेल्या मंडळींवर कठोर शासन करण्याचे मनसुबे स्पष्ट शब्दांत बोलून दाखवले आहेत. त्यांचा रोख अप्रत्यक्षपणे का होईना; पण तो थेट ठाकरे आणि त्यांच्या निकटवर्तीयांकडे होता, ज्यांचा कथित अनियमिततांमध्ये सहभागी असल्याचे आरोप केले जात आहेत. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कोरोनाकाळात करण्यात आलेल्या खरेदीत प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचा ठपका तपास संस्थांकडून ठेवण्यात आला आहे. विशेष चौकशी पथकाची स्थापनादेखील या प्रकरणाच्या चौकशीसाठी करण्यात आली असून, मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित हा तपास होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अंगुलीनिर्देश केलेल्या सूरज चव्हाण प्रकरणाची सध्या ‘ईडी’कडून चौकशी सुरू असून, त्यातून बरेच काही धक्कादायक खुलासा होण्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे यांच्या नावावर असलेल्या त्या १९ कथित बंगल्यांच्या प्रकरणावरही फडणवीसांनी थेटपणे पहिल्यांदाच टिप्पणी केली आहे. ज्या व्यक्तीने बेनामी किंवा गैरमार्गाने संपत्ती गोळा केली असेल किंवा बंगल्यांची खरेदी-विक्री झाली असेल, त्यांच्या विरोधात निश्चितपणे कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा फडणवीसांनी दिला. सत्ता हातून गेल्यापासून उद्धव ठाकरेंना सर्वाधिक अडचणीत आणण्याचे काम त्यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांनी केले. रश्मी ठाकरेंचे ते कथित बंगले, आदित्य ठाकरेंच्या मागे लागलेले त्या दोन प्रकरणांचे शुक्लकाष्ठ, आदित्य ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या सूरज चव्हाण यांच्यावर सुरू झालेली ‘ईडी’ची कारवाई, उद्धव यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या नवे असलेली कथित बेनामी संपत्ती आणि झालेले आर्थिक व्यवहार यांसारख्या प्रकरणांचे परिणाम सरतेशेवटी उद्धव ठाकरे यांनाच भोगावे लागतील. कारण, उद्धव यांच्याच भाषेत सांगायचे तर ते कुटुंबप्रमुख असून, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी केलेल्या गैरप्रकारांची शिक्षाही त्यांनाच भोगावी लागेल. अर्थात, ही शिक्षा राजकीय असेल; पण त्याचे परिणाम अत्यंत दूरगामी असतील, हे निश्चित!